Mahad : औद्योगिक वसाहतीच्या प्रदूषणामुळे टेमघर नाला फेसाळला ; सावित्री नदीही प्रदूषणाच्या विळख्यात

महाडमधील औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण जैसे थे

Pollution of Temghar Nala due to pollution of Mahad Industrial Estate
Mahad : औद्योगिक वसाहतीच्या प्रदूषणामुळे टेमघर नाला फेसाळला ; सावित्री नदीही प्रदूषणाच्या विळख्यात

महाडमधील औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण थांबण्याचे नाव घेत नसून, टेमघर नाला पुन्हा एकदा प्रदूषित झाला आहे. गुरुवारी सकाळपासूनच हा नाला रासायनिक सांडपाण्यामुळे फेसाळला असून, दूषित पाणी थेट सावित्री नदीत जात असल्याने, ही नदीही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नाल्यातील पाण्यावर पांढर्‍या रंगाचा तवंग जमा झाल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. नाल्यात रासायनिक कारखान्यांतील सांडपाणी किंवा अन्य रसायन सोडून दिले असावे, असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. नाला टेमघर गावापासून थेट सावित्री आणि काळ नदी संगम परिसरात जाऊन मिळत आहे. यामुळे या परिसरात ज्या ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जातो त्या ठिकाणी दूषित पाणी जात असल्याने निवासी वस्तीत प्रदूषित पाणी पुरवठा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. औद्योगिक परिसरात बहुतांश रासायनिक कारखाने आहेत. त्यांचे पाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सोडले जाते. तेथे त्यावर प्रक्रिया करून खाडीत सोडले जाते. मात्र गेले अनेक वर्षे काही कारखाने खर्च वाचवण्यासाठी दूषित पाणी आड मार्गाने नदीत अथवा शेजारी नाल्यात, गटारात सोडतात.

हा प्रकार वर्षोनुवर्षे निर्विघ्नपणे चालू असून, यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक अधिकार्‍यांकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. टेमघर नाल्याप्रमाणे ल्यूब स्टार कारखान्यातील ऑईल समोरील गटाराला येऊन मिळाले आहे. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली. मात्र गटारातील पाणी टेमघर नाल्यात जाऊ नये म्हणून ते गटारातच अडविले गेले आहे. सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कृपाशीर्वादाने औद्योगिक वसाहतीमधील नाले, गटारांना रंगीबेरंगी स्वरुप आले आहे.

सुट्टी अन् प्रदूषण

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये होणारे प्रदूषण बहुतांश सुट्टीच्या दिवशीच होत असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक घटनांत रविवार किंवा विशेष सुट्टीच्या दिवशी काही कारखाने पाणी सोडण्याचे काम करीत असल्याचे समोर आले आहे. गुरुवारपासून सलग ४ दिवस सुट्टी असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक कार्यालय अधिकारी सुट्टीवर गेल्यानंतर टेमघर नाला प्रदूषित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मंडळाच्या अधिकार्‍यांना स्थानिक नागरिकांनी टेमघर नाल्याबाबत सूचना देण्यासाठी दूरध्वनी केले. मात्र समोरून ते टाळण्यात आले.

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये कायम प्रदूषण होत असून, याबाबत उप प्रादेशिक कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाला कारवाईसाठी पत्रव्यवहार केला जातो. मात्र कारखान्यांवर कारवाई होत नसल्याने सांडपाणी सोडण्याचे प्रकार सुरूच आहेत.
-तुकाराम देशमुख, स्थानिक सामाजिक कार्यकर्ता

 

                                                                                    वार्ताहर – निलेश पवार


हे ही वाचा – Cruise Drug Case: आर्यन खानला आजही दिलासा नाही! २० ऑक्टोबरपर्यंत आर्यनचा आर्थररोड जेलमध्ये मुक्काम