घरताज्या घडामोडीमहाड पोलादपूर लवकरच होणार प्रकाशमय

महाड पोलादपूर लवकरच होणार प्रकाशमय

Subscribe

महावितरणच्या वीजयोद्धांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी केले अथक प्रयत्न

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या अतिवृष्टीमुळे महाड, खेड, चिपळूण व लगतच्या भागात जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. महावितरणची विद्युत यंत्रणा महाड व पोलादपूर येथे मोठ्या प्रमाणात बाधित झाली असून दोन्ही तालुक्यातील अनेक गावे अंधारात बुडाली होती. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकताच रायगड जिल्ह्यातील महाडचा दौरा केला व  वीजपुरवठा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वीज पुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करण्यासाठी महावितरण च्या विजयोध्यानी अथक परिश्रम घेत आहेत.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच मनुष्यबळाचे योग्य नियोजन तातडीने करून कामाला सुरुवात करण्यास सांगितले.  त्याप्रमाणे, संचालक (संचलन) श्री. संजय ताकसांडे यांनी दैनंदिन अहवाल मागवून सुरु असलेल्या कामाचा आढवा वेळोवेळी घेतला. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर स्वतः महाड येथे तळ ठोकून होते व जातीने लक्ष देऊन सुरु असलेल्या कामाचे निरीक्षण करीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शन दिले.
महापारेषणचे अति उच्चदाब उपकेंद्र बंद असताना ही अहोरात्र मेहनत करून महावितरणचे अधिकारी / कर्मचाऱ्यांना महाड व पोलादपूर येथील अनेक गावे प्रकाशमान करण्यात यश आले आहे.  भांडूप परिमंडलातील रायगड जिल्ह्यात वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे व पूरस्थितीमुळे दि.२२ जुलै रोजी महापारेषणच्या कांदलगाव ते महाड दरम्यान असलेले २२० के.व्ही.अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टावर कोसळल्यामुळे, महावितरणच्या पेण मंडळातील चांभारखिंड, जी. बी. एल, कोलोसे व तुर्भे हे चार स्विचिंग उपकेंद्र बंद पडले होते. परिणामी, महाड व पोलादपूर येथील महाड शहर, बिरवाडी, विन्हेरे, वहूर, नाते, नांगळवाडी, नागाव, कुंबळे येथील  ३४५ गावांचा वीजपुरवठा बाधित झाला असून महाड येथील १८४ गावांपैकी १११ गावे प्रकाशमय केली आहेत. पोलादपूर येथील ७८ गावांपैकी १५ गावांचा वीजपुरवठा  पूर्ववत करण्यात आला आहे.  महाड येथे ४० तर पोलादपूर येथे ०५ उच्चदाब फिडर्स बाधित झाले होते, त्यापैकी महाड येथील ११ तर पोलादपूर येथील ०५ उच्चदाब फीडर्स पूर्ववत करण्यात आले आहेत.  महाड येथील ५७४ तर पोलादपूर येथील ४७० वितरण रोहित्र बाधित झाले होते.त्यापैकी ३३५ वितरण रोहित्र महाड व २५ वितरण रोहित्र पोलादपूर येथे सुरु करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, महाड येथील १८७ उच्चदाब खांब तर  पोलादपूर येथे ७३ उच्चदाब खांब बाधित झाले होते. त्यापैकी महाड येथे ८४ उच्चदाब खांब तर पोलादपूर येथे १५ उच्चदाब खांब पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. तसेच महाड येथील २४७ तर पोलादपूर येथील १२२ लघुदाब खांब बाधित झाले होते.त्यापैकी महाड मध्ये ११० तर पोलादपूर येथे ३५ लघुदाब खांब पूर्ववत करण्यात महावितरण यशस्वी झाले आहे.
याशिवाय महाड व पोलादपूर येथील ३३५ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. त्यापैकी, १८९ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या ४ ही  कोविड हॉस्पिटल/ व्हॅकसीनेशन सेंटरचा वीजपुरवठा महावितरणने सुरळीत केला आहे.  यामध्ये, ७९,५०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी,३७,७०० ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेने व चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. जेणेकरून सर्व ग्राहकांचा पाणी व नियमित कामासाठी वीजपुरवठा ३ ते ४ तास आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात आला आहे.  उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अतिउच्चदाब विद्युत मनोरे उभारण्याचे काम महापारेषणकडून युद्धपातळीवर सुरु असून लवकरात लाव्कात पूर्ण करण्याचे उद्धिष्ट आहे. वितरण उपकेंद व उच्चदाब फीडर्स वरील विस्कळीत वीजपुरवठा पूर्ववत करण्याला प्राथमिकता देऊन बाधित उपकेंद्राची कामे करून ३ उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. चांभारखिंड, कोलोसे व तुर्भे हे तिन्ही स्विचिंग उपकेंद्र चालू करण्यात आले असून जीबीएल स्विचिंग उपकेंद्र बाधित आहे. दि. २९ जुलै २०२१ रोजी आंबेत फीडरवरून सापेतर्फे गोवेले ते जुई तालुका महाड येथे खाडी ओलांडून येणाऱ्या वाहिनीचे नव्याने काम युद्धपातळीवर करून कुंबले व विन्हेरे फीडरवरील ३४ गावांमधील १०,१०० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. मुख्य रस्त्या लागत असलेले उच्चदाब वितरण प्रणाली, उपकेंद्र, रोहित्र, प्राधान्याने पुढील ३ दिवसात कार्यान्वित करण्याचे उद्धिष्ट आहे.
या सर्व कामांना गती देण्यासाठी व लवकरात लवकर वीजपुरवठा सुरु करण्यासाठी पेण मंडळांतर्गत गोरेगाव विभागातील १५३ अधिकारी/ कर्मचारी व ६४ बाह्यस्त्रोत कर्मचारी असे एकूण २१७, अतिरिक्त मनुष्यबळ महाड व पोलादपूर येथील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.  याशिवाय, ११७ विद्युत ठेकेदार व त्यांचे १९३ कामगार तिथे कार्यरत आहेत. यासाठी लागणारे साहित्य मुख्य कार्यालयाकडून तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -