भारताला धक्का! Johnson & Johnsonने देशातून लस मंजूरीचा प्रस्ताव घेतला मागे

Johnson & Johnson Withdraws Speedy Covid Vaccine Approval Proposal In India
भारताला धक्का! Johnson & Johnsonने देशातून लस मंजूरीचा प्रस्ताव घेतला मागे

देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण वेगाने सुरू आहे. पण यादरम्यानच देशाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. जॉनसन अँड जॉनसन (Johnson & Johnson) कंपनीने देशातून लस मंजूरीचा प्रस्ताव मागे घेतला आहे. याबाबत आज, सोमवारी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. जॉनसन अँड जॉनसन कंपनीने लस मंजूरीचा प्रस्ताव मागे का घेतला? याबाबत अद्याप कारण दिले नाही आहे.

अमेरिकन कंपनी जॉनसन अँड जॉनसनने एप्रिल महिन्यात कोरोना लसीला भारतात ट्रायलसाठी प्रस्ताव केला होता. त्यावेळेस रक्ताच्या गुठल्या होत असल्याचा तक्रारीनंतर अमेरिकेमध्ये या लसीचे ट्रायल बंद केले होते. दरम्यान भारतात पहिल्यापासूनच नुकसान भरपाईची सूट सारख्या काही मुद्द्यावर परदेशी लस उत्पादकांशी काही कायदेशीर बाबी सोडवण्यामध्ये चर्चा सुरू आहे, त्यादरम्यान जॉनसन कंपनीने प्रस्ताव मागे घेतला आहे.

गेल्या आठवड्यात आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, ‘लस उत्पादकांसोबत सर्व मुद्दे सोडवण्यासाठी एका टीमची स्थापना केली आहे. ही टीम फायझर, मॉडर्ना आणि जॉनसन अँड जॉनसनसोबत सतत काही मुद्द्यांवर चर्चा करत आहे.’

दरम्यान मंजूरी प्रस्ताव मागे घेतल्याबाबत जॉनसन अँड जॉनसन आणि सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनने ( Central Drugs Standard Control Organisation) कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे. भारतात जून महिन्यात अमेरिकन कंपनी मॉडर्नाच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली होती.