घरदेश-विदेशनेपाळमध्ये गेल्या 12 वर्षांत 21 विमान अपघात; या घटनांमागील नेमकं कारण काय?

नेपाळमध्ये गेल्या 12 वर्षांत 21 विमान अपघात; या घटनांमागील नेमकं कारण काय?

Subscribe

नेपाळमध्ये 15 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात आत्तापर्यंत 69 जणांचा मृत्यू झाला आहे. यति एअरलाइन्सच्या या विमानात 4 केबिन क्रू आणि 68 प्रवासी मिळून एकूण 72 जण प्रवास करत होते. काठमांडूहून पोखरला जाणारे हे विमान सकाळी 10.50 वाजता लँडिंगपूर्वीच कोसळले. यात पाच भारतीय नागरिकांचा ही समावेश होता
नेपाळ सरकारने या अपघाताच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. अद्याप याठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.

पोखरा विमानतळाजवळ घडलेली ही घटना 1992 नंतरची सर्वात भीषण विमान दुर्घटना आहे. सप्टेंबर 1992 रोजी पाकिस्तानचे एअरबस ए 300 विमान काठमांडूमध्ये कोसळले. या विमान अपघातात एकूण 167 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र नेपाळमधील विमान अपघातांचा एकूणचं इतिहास हा खूप वेदनादायी आहे. 2010 पासून पाहिले तर नेपाळमध्ये सुमारे 15 विमान अपघात झाले, ज्यात शेकडोहून अधिकांचा मृत्यू झाला, एव्हिएशन सेफ्टी डेटाबेसच्या आकडेवारीनुसार, नेपाळमध्ये गेल्या 30 वर्षांत 28 विमान अपघात झाले. यापैकी 2010 सालानंतरच 21 अपघात झाले आहेत.

- Advertisement -

2010 पासून नेपाळमध्ये झालेले विमान अपघात

मे 2022 : गेल्या वर्षी 29 मे रोजी तारा एअरचे विमान कोसळले, या अपघातात विमानातील सर्व 22 जणांचा मृत्यू झाला. हे विमान पोखराहून जोमसोमला जात होते. पोखरा – जोमसोम मार्गावरील हा सातवा विमान अपघात आहे. या अपघातात चार भारतीयांचाही मृत्यू झाला होता.

एप्रिल 2019 : 14 एप्रिल 2019 रोजी लुकलामधील तेन्जिंग हिलगी विमानतळावर उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरवर कोसळले, या अपघातात को पायलटसग तिघांचा मृत्यू झाला. त्याचवर्षी फेब्रुवारीमध्ये एक हेलिकॉप्टर भीषण दुर्घटनाग्रस्त झाले होते. काठमांडूला जाणारे हे हेलिकॉप्टर टेकड्यांवर आदळले ज्यात नेपाळचे पर्यटन मंत्री रविंद्र अधिकारी यांच्यासह 7 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये यति एअरलाइन्सचे अध्यक्ष आंग शिरिंग शेरपा यांचाही समावेश होता.

- Advertisement -

मार्च 2018 – 12 मार्च 2018 रोजी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर यूएस-बांग्ला एअरलाइनचे विमान कोसळले. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 71 लोक होते. विमान धावपट्टीवरून घसरल्याने झालेल्या या अपघातात 51 जणांचा मृत्यू झाला होता.

फेब्रुवारी 2016 – 24 फेब्रुवारी 2016 रोजी पोखराहून जोमसोमला जाणारे तारा एअरचे विमान कोसळले. यामध्ये 3 क्रू मेंबर्स आणि सर्व 20 प्रवासी ठार झाले. या घटनेच्या दोन दिवसांनंतर 26 फेब्रुवारी रोजी एअर काष्ठमंडपचे विमान कोसळले ज्यामध्ये दोन्ही क्रू मेंबर्सना आपला जीव गमवावा लागला. मात्र विमानातील सर्व 9 प्रवासी बचावले.

फेब्रुवारी 2014 – अरगाखांची जिल्ह्यात 16 फेब्रुवारी 2014 रोजी नेपाळ एअरलाइन्सचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. यामध्ये विमानातील सर्व 18 जणांचा मृत्यू झाला. खराब हवामान या विमानाचा अपघाताचे सांगितले जाते.

वर्ष 2012 – 2012 वर्षी नेपाळमध्ये दोन विमान अपघात झाले. पहिली घटना 14 मे रोजी घडली. जोमसोम विमानतळाजवळ अग्नि एअरचे विमान कोसळले. यामध्ये एकूण 15 जणांचा मृत्यू झाला. विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 18 जण होते. पायलटने पटकन यू-टर्न घेतल्याने हा अपघात झाला, त्यामुळे विमान जवळच्या डोंगरावर जाऊन आदळले.

28 सप्टेंबर 2012 रोजी सीता एअरच्या विमान अपघातात विमानातील सर्व 19 जणांचा मृत्यू झाला होता. हे विमान त्रिभुवन विमानतळावरून लुक्लाला जात होते. विमानात सात ब्रिटिश आणि पाच चिनी नागरिक होते.

वर्ष 2011- या वर्षी नेपाळमध्ये तीन विमान अपघात झाले. पहिला अपघात 25 सप्टेंबर रोजी झाला होता. बुद्ध एअरचे विमान काठमांडू विमानतळावर लँड होण्यापूर्वी कोसळले. यामध्ये तीन कर्मचाऱ्यांसह सर्व 19 जणांचा मृत्यू झाला होता. विमानात 10 भारतीय नागरिकही होते.

त्यानंतर ऑक्टोबर 2011 मध्ये नेपाळी लष्कराचे एक अँब्युलन्स एयरक्राफ्ट कोसळले. यामध्ये पायलटसह सर्व 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. अब्युलन्स एयरक्राफ्ट नेपाळगंजहून काठमांडूला एका रुग्णाला घेऊन जात होते. याच वर्षी नोव्हेंबरमध्ये तालचा विमानतळावर विमान कोसळले होते. मात्र त्यातील सर्व 12 जण बचावले.

वर्ष 2010 – 15 डिसेंबर 2010 रोजी नेपाळच्या पूर्व भागात तारा एअरचे विमान कोसळले. या अपघातात क्रू मेंबरसह सर्व 22 जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश लोक हे भूतानचे यात्रेकरू होते. त्याच वर्षी 24 ऑगस्ट रोजी काठमांडूजवळ अग्नि एअरचे विमान कोसळले होते. या अपघातात चार अमेरिकन नागरिकांसह विमानातील 14 जणांचा मृत्यू झाला.

याशिवाय 2015 आणि 2013 मध्ये तीन विमान अपघात झाले. मात्र, या अपघातांमध्ये कोणाचाही मृत्यू झाला नाही.

नेपाळमध्ये विमान अपघाता मागचे नेमकं कारण काय?

नेपाळचा बहुतांश भाग डोंगराळ भागात येतो. त्यामुळे अशा ठिकाणी विमान उडवणे कठीण असते. या भागांतील धावपट्ट्या मैदानी प्रदेशात आहे तशा प्रकारच्या नाहीत. अनेक धावपट्ट्या तिरप्या आहेत. त्यामुळे पायलटला टेक ऑफ आणि लँडिंगसाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते. नेपाळमधील विमानतळांच्या धावपट्टी अत्यंत अवघड मानल्या जातात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, लुकलाचा तेनझिंग हिलरी विमानतळ जगातील सर्वात धोकादायक विमानतळ मानला जातो. येथे एकच धावपट्टी आहे जी खालच्या दिशेने झुकलेली आहे. एवढेच नाही तर धावपट्टीजवळच 600 मीटर खोल दरी आहे.

डोंगरावरील हवामानही काही वेळा अपघाताचे कारण बनते. खराब हवामान म्हणजे हवामान स्वच्छ असूनही अचानक धुके दिसते. हे कधी कधी अनपेक्षित असते. नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या (CAAN) 2019 च्या हवाई सुरक्षा अहवालात असे नमूद केले आहे की, नेपाळमधील एक कठीण क्षेत्र असण्याव्यतिरिक्त हवामानातील विविधता हे विमान चालवताना एक मोठे आव्हान आहे. हवामानामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये लहान विमानांची संख्या अधिक असते.

याशिवाय अनेक अहवालांमध्ये दिसून आले की, विमानाचे नियमन आणि देखभाल चांगली नसल्यामुळे अपघातही झाले आहेत. यति एअरलाइन्सच्या विमानातच अनेकवेळा इंजिन बंद पडल्याच्या बातम्या आल्या आहेत. 2013 मध्ये, युरोपियन युनियनने (EU) नेपाळच्या सर्व विमान कंपन्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या हवाई क्षेत्रात बंदी घातली होती. मार्च 2022 मध्ये काठमांडू पोस्टने वृत्त दिले की, नेपाळ सरकारने सुरक्षा समस्यांचे निराकरण करण्यासाठी काहीही केले नाही, ज्यामुळे EU हवाई क्षेत्रावरील बंदी अजूनही सुरू आहे.

पोखरामध्ये 15 जानेवारीला झालेल्या अपघातामागे ‘तांत्रिक बिघाड’ असल्याचे सांगितले जात आहे. परंतू संपूर्ण तपासानंतरच अपघाताचे खरे कारण समोर येईल.


नेपाळ विमान अपघातामागील कारण लवकरच येणार समोर; अखेर ब्लॅक बॉक्स सापडला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -