Coronavirus: लॉकडाऊनमधली हजामत भारी पडली; ६ लोकांना कोरोनाचा संसर्ग

salon in mp
प्रातिनिधिक छायाचित्र

लॉकडाऊन असतानाही सलूनमध्ये जाऊन हजामत करुन घेणे काही लोकांच्या अंगलट आले आहे. मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील बडगाव या गावात सहा लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे लोक गावातील सलूनमध्ये केस आणि दाढी करण्यासाठी गेले होते. मात्र सलूनमध्ये न्हाव्याने एकच कपडा सर्वांना वापरल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी आता संपुर्ण गावाला सील केले आहे.

खरगोन जिल्ह्याचे मुख्य शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. दिव्येश वर्मा यांनी सांगितले की, बडगावचा एक तरुण नुकताच इंदोर येथून गावात परत आला होता. इंदोरमध्ये तो एका हॉटेलात काम करायचा. गावात परतल्यानंतर त्याने स्थानिक सलूनमध्ये केस कापले होते. त्यानंतर सलूनमधील न्हाव्याने त्याच्यासाठी वापरलेला टॉवेल, कैची आणि वस्तरा इतर ग्राहकांना देखील वापरला. मात्र त्यानंतर हा तरुण कोरोनाबाधित असल्याचे समजल्यानंतर त्या सलूनमध्ये त्याच्यानंतर आलेल्या १०-१२ लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सहा लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत.

खरखोन जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. या जिल्ह्यात ६० लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी ६ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मागच्या दोन दिवसांत १९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात सलून, जिम, स्विमिंगपूल, मॉल बंद करण्यात आले आहेत. मात्र तरिही गावात किंवा वस्त्यांमध्ये चोरून काही सलून सुरु आहेत. तर काही ठिकाणी न्हावी घरोघरी जाऊन दाढी आणि केस कापण्याचे काम करत आहेत. विशेष म्हणजे न्हावी आणि ग्राहक मास्क घालत असले तरी कैची, वस्तरा, टॉवेल आणि कंगवा तेच वापरले जात असते. त्यामुळे लोकांनी सरकराच्या निर्देशांचे पालन करावे. कोरोनापासून वाचण्याचा तोच एक मार्ग आहे.