अमेरिकेत विमान दुर्घटनेत भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू, अन्य दोघे जखमी

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये छोटे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिची मुलगी आणि पायलट गंभीर जखमी झाले. 5 मार्च रोजी हा अपघात झाला असून विमानात 63 वर्षीय रोमा गुप्ता आणि तिची 33 वर्षीय मुलगी रीवा गुप्ता या लहान विमानात होते, अशी माहिती एनबीसी न्यूयॉर्क टीव्ही चॅनेलने दिली.

एनबीसी न्यूयॉर्क टीव्ही चॅनेलच्या वृत्तानुसार, रीवा आणि 23 वर्षीय वैमानिक फैझल चौधरी या अपघातात गंभीररीत्या भाजले असून दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘दोन रुग्ण गंभीर जखमींना एका नागरिकाने विमानातून बाहेर काढले होते. तर, या अपघातात रोमाचा मृत्यू झाला,’ असे नॉर्थ लिंडेनहर्स्ट फायर चीफ केनी स्टॅलोन यांनी सांगितले.

दुर्घटनाग्रस्त विमान डॅनी विझमन फ्लाइट स्कूलचे होते. वैमानिकाकडे त्याचे सर्व रेटिंग आणि प्रमाणपत्रे आहेत. या विमानाची गेल्याच आठवड्यात दोन सखोल तपासणी करण्यात आली होती, असे या संस्थेचे वकील ओलेह डेकायलो यांनी सांगितले. स्टोनी ब्रूक हॉस्पिटलमध्ये रीवाला दाखल करण्यात आले आहे. माऊंट सिनाई सिस्टीममध्ये रीवा फिजिशियन असिस्टंट आहे. गुप्ता कुटुंबीयांची मदतीसाठी एक GoFundMe तयार करण्यात आला असून आतापर्यंत 60,000 डॉलर्सहून जास्त निधी उभारला गेला आहे.

लाँग आयलंडवरील रिपब्लिक विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर ते पुन्हा तिथे परतत असताना हा अपघात झाला. लाँग आयलँडच्या घरांजवळ विमान कोसळण्यापूर्वी कॉकपिटमधून धूर येत असल्याची माहिती वैमानिकाने दिली होती. चार आसनी सिंगल इंजिनच्या विमानाने पेट घेतल्यावर ते खाली कोसळले. या अपघातामुळे विमानतळ परिसरातील कोणत्याही घराचे नुकसान झाले नाही, तसेच अन्य जीवितहानी झाली नाही. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड अपघाताच्या कारणांचा शोध घेणार आहे. तर, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन देखील या अपघाताची चौकशी करत आहे.