Corona: चीनमध्ये पुन्हा फोफावला कोरोना; बीजिंगमध्ये प्रवासावर लादले निर्बंध

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. जगात कोरोना महामारी पसरणाऱ्याला जबाबदार असणाऱ्या चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. चीनमध्ये ८ ऑगस्टला १२५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. याच्या एक दिवसा अगोदर ९६ नवे रुग्ण आढळले होते. याबाबतची माहिती चीनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. चीनमध्ये डेल्टा व्हेरियंटमुळे कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. दरम्यान १२५ आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी ९४ केसेस स्थानिक आहे.

चीनमधील अनेक शहरात वेगाने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे आता राजधानी बीजिंगमध्ये संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत. सरकारी माध्यम ग्लोबल टाईम्सनुसार, इतर शहरातून येणाऱ्या प्रवासांवर बीजिंगमध्ये बंदी घालण्यात आली आहे. ज्या क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्या क्षेत्रातील नागरिकांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हवाई आणि रेल्वे तिकिट देण्यास मनाई केली आहे. प्रवासाकरिता हेल्थ कोड जारी गेले आहेत. फक्त ग्रीन हेल्थ कोडच्या लोकांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे बीजिंग एअरपोर्टपासून १५ शहरात येणा-जाणाऱ्या फ्लाईट्स बंद केल्या आहेत.

इतर देशातील परिस्थिती

जपान – जपानमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्थानिक माध्यमांनुसार, गेल्या २४ तासांत जपानमध्ये १५ हजार ७५३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. जिथे ऑलिम्पिक पार पडले त्या राजधानी टोकियोमध्ये एक दिवसाला ४ हजार ६६ नव्या रुग्णांची वाढ झाली. ही कोरोनाबाधितांची संख्या जानेवारीनंतर सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे.

ब्राझिल – रायटरनुसार, ब्राझीलमध्ये दररोज ९९० लोकांचा मृत्यू होत आहे. तर एका दिवसात ४३ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.

ऑस्ट्रेलिया – सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरिया आणि क्वीन्सलंडमध्ये डेल्टा व्हेरियंटमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.

इराण – नोव्हेंबरनंतर एका दिवसात इराणमध्ये सर्वाधिक ३९ हजार ६०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५४२ जणांचा मृत्यू झाला आहे.