घरदेश-विदेशबिहारच्या सासाराममध्ये पुन्हा स्फोट; नालंदामध्ये उद्यापर्यंत इंटरनेट बंद

बिहारच्या सासाराममध्ये पुन्हा स्फोट; नालंदामध्ये उद्यापर्यंत इंटरनेट बंद

Subscribe

नवी दिल्ली : रामनवमीच्या मिरवणुकीवरून हिंसाचार उसळला असताना एका घरात बॉम्बस्फोट झाला होता. एका दिवसाच्या शांततेनंतर बिहारच्या सासराममध्ये पुन्हा एकदा स्फोट झाला असून परिसरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोमवारी (३ एप्रिल) पहाटे ४ वा ५२ मिनिटांनी समाजकंटकांनी मोची टोला बस्ती मोरजवळील घरावर बॉम्ब फेकले. लोक आपापल्या घरात असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र स्फोटामुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच रोहतासचे एएसपी, एसडीपीओ यांच्यासह अनेक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी परिसराला छावणीचे रुप दिले असून लोकांना शांतता राखण्याचे आवाहन.

महिलेने 4 हल्लेखोरांना पळताना पाहिले
आज पहाटे ४ वा. ५२ मिनिटांनी काही समाजकंटकांनी एका घरावर बॉम्ब फेकल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, दरवाजा बंद असल्यामुळे घराच्या बाल्कनीत बॉम्ब पडला आणि मोठा आवाज ऐकू आल्याने आम्ही बाहेर आलो. यावेळी एका महिलेने 4 हल्लेखोरांना पळताना पाहिले. स्फोटाच्या वेळी जवळपास 10-15 पोलीस उपस्थित होते, मात्र त्यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला नसल्याचा स्थानिक लोकांनी आरोप केला आहे. स्फोटानंतर आम्ही घाबरलो आहोत. पोलीस सुरक्षा देत आहेत, मात्र कर्तव्य बजावताना निष्काळजीपणा करत आहेत. पोलीस ड्युटीवर असताना 4 हल्लेखोर बॉम्बस्फोट करून निघून गेले आणि ते त्यांना पकडू शकले नाही हा तपासाचा विषय आहे.

- Advertisement -

बॉम्बस्फोटातील आरोपींचा शोध सुरू
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनवमीच्या घटनेनंतर आज दुसऱ्यांदा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळताच आमच्याकडून समाजकंटकांच्या शोधात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. परिसरात पोलीस सतत तळ ठोकून आहेत. काही लोकांची याप्रकरणी चौकशी केली जात आहे. एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. ड्युटीवर तैनात एएसआय राम नरेश सिंह यांनी सांगितले की, मी रविवारी (२ एप्रिल) संध्याकाळपासून या भागात ड्युटीवर आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास स्फोट झाल्यानंतर माझ्यासोबत इतर सहकारी या ठिकाणी धावत आले असता आम्हाला धूर दिसत होता. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

पुढील आदेशापर्यंत शाळा, महाविद्यालये आणि इंटरनेट बंद
बिहारमधील नालंदामध्ये ४ एप्रिलपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. बिहारचे डीजीपी आरएस भाटी शनिवारी रात्री नालंदा येथे पोहोचले. त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला असून शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. डीजीपी आरएस भाटी म्हणाले की, सासाराम आणि बिहार शरीफमध्ये ज्या काही घटना घडल्या त्याप्रकरणी आतापर्यंत एकूण 109 जणांना अटक करण्यात आली आहे. आम्ही अशा आणखी लोकांना शोधत आहोत जेणेकरून सर्व गुन्हेगारांना अटक करता येईल, त्यांना सोडले जाणार नाही. कायदा पूर्ण ताकदीने त्यांच्यावर कारवाई करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -