दिल्ली महापलिका निवडणुकीत सुमारे 50 टक्के मतदान, आपची परीक्षा

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) सर्व 250 प्रभागांसाठी रविवारी सायंकाळी 5.30 वाजता मतदान संपले. जवळपास 50 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हा अंतिम आकडा नसला तरी. 2017च्या तुलनेत मतदान तीन टक्के कमी झाले आहे. त्यावेळी एकूण 53.55 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल 7 डिसेंबरला लागणार आहे.

यावेळी भाजप आणि आप यांच्यात काट्याची लढत आहे. भाजपाने दारू आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाची कोंडी केली आहे. तर दुसरीकडे, दिल्लीतील वातावरण बिघडवायला भाजपाच जबाबदार असल्याचे आप सांगत आहे. त्याचवेळी मतदारयादीत हेराफेरीचा आरोप करत भाजपा आणि आप या दोघांनीही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

एकीकडे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या दिल्लीत महापालिका निवडणूक होत असतानाच गुजरातमध्येही विधानसभेसाठी मतदान सुरू आहे. दिल्ली महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आपने गुजरात निवडणुकीवर जोर दिला होता. पण गुजरातच्या बरोबरीनेच दिल्ली महापालिकेची निवडणूक होत आहे. गुजरातमध्ये 1 डिसेंबर 2022 रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर, या निवडणुकीचा दुसरा टप्प्याचे मतदान आज सुरू असून 93 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण 833 उमेदवार रिंगणात आहेत.

दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी काल, 4 डिसेंबरला मतदान झाले. एकूण 250 प्रभागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 1 हजार 349 उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यात 709 महिला उमेदवार आहेत. भाजपा आणि काँग्रेसने प्रत्येकी 250, काँग्रेस 247, जदयू 23, एमआयएम 15, बसपा 174, राष्ट्रवादी काँग्रेसने 29 उमेदवार आहेत. 13 हजार 638 मतदान केंद्रांवर 1.45 कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, भाजपा खासदार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, भाजपा नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासरह इतर मान्यवरांचा समावेश होता.

आता याच निवडणुकीचा निकाल बुधवारी, 7 डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यानंतर लगेचच गुरुवारी (8 डिसेंबर) गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा निकाल जाहीर होईल. गुजरातचा विचार करता, बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस आपच्या नेत्यांसाठी परीक्षेचे असतील.