CIA प्रमुखाने रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रकृतीवरून उठवला पडदा, सांगितली खरी वस्तुस्थिती

इराणमध्ये पुतिन यांनी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई, अध्यक्ष इब्राहिम रायसी आणि तुर्किए (तुर्कीचे नवीन नाव) अध्यक्ष तय्यिप एर्दोगन यांची भेट घेतली होती. त्यामुळेच ते निरोगी आणि ऊर्जेने भरलेले पाहायला मिळालेत

वॉशिंग्टन : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पाच महिन्यांपासून सुरू असून, अद्यापही ते थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीबाबत जागतिक स्तरावर अनेक चर्चा सुरू आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (CIA) प्रमुखाने पुतिन यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठा खुलासा केलाय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीबाबतच्या सर्व नकारात्मक चर्चांना पूर्णविराम देत सीआयए प्रमुख विल्यम बर्न्स यांनी त्यांना पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगितले आहे. पुतिन यांच्या तब्येतीबद्दलच्या या चर्चा गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहेत, युक्रेन युद्धादरम्यान त्या खूप खुबीनं रंगवल्या जात होत्या.

अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचे संचालक बर्न्स यांनी कोलोरॅडो येथे आयोजित अस्पेन सिक्युरिटी फोरमच्या मंचावरून ही माहिती दिली. ते म्हणाले, ही सामान्य किंवा ऐकीव माहिती नसून, ही खरी वस्तुस्थिती आहे. 69 वर्षीय पुतिन हे पूर्णपणे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवा निराधार आहेत. पुतीन यांच्या इराण दौऱ्याच्या एका दिवसानंतर सीआयए प्रमुखांनी हे वक्तव्य केले आहे. इराणमध्ये पुतिन यांनी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई, अध्यक्ष इब्राहिम रायसी आणि तुर्किए (तुर्कीचे नवीन नाव) अध्यक्ष तय्यिप एर्दोगन यांची भेट घेतली होती. त्यामुळेच ते निरोगी आणि ऊर्जेने भरलेले पाहायला मिळालेत.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने क्रेमलिनने म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे भ्रामक आणि असत्य आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. पुतिन यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, त्यांना थोडीशी सर्दी झाली आहे. तेहरानमध्ये खूप उकाडा असल्याचे सांगण्यात आले होते. तेथील तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. तर रूममधील एअर कंडिशन खूप पॉवरफूल होते. त्यामुळे वातावरण थंड राहिले. तापमानातील फरकामुळे ही थंडी जाणवत होती. काही आठवड्यांपूर्वी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पुतिन यांच्या प्रकृतीबद्दल स्पष्टीकरण दिले होते आणि ते निरोगी असल्याचे सांगितले होते.

युक्रेनमध्ये 15 हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाला

सीआयए प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, युक्रेन युद्धात रशियन सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास पाच महिने चाललेल्या या युद्धात रशियन सैन्याचे १५ हजार सैनिक मारले गेले आहेत, तर सुमारे ४५ हजार जखमी झाले आहेत. या युद्धात युक्रेनच्या लष्कराचेही मोठे नुकसान झाले.


हेही वाचाः जेईई मेन 2022 चं अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाऊनलोड