घरदेश-विदेशबनारस युनिव्हर्सिटी: मुस्लीम तरुण प्राध्यापकाला संस्कृत शिकवण्याला विरोध

बनारस युनिव्हर्सिटी: मुस्लीम तरुण प्राध्यापकाला संस्कृत शिकवण्याला विरोध

Subscribe

हिंदु-मुस्लीम ऐक्याच्या कितीही गप्पा केल्या, तरी देशात अजूनही अनेक ठिकाणी हा भेद दोन्ही समाजांमध्ये मोठी भिंत बनून राहिला आहे. मूळच्या जयपूरच्या असलेल्या फिरोझ खानला बनारस हिंदु युनिव्हर्सिटीमध्ये असाच अनुभव आला आहे. फिरोझ खान मुस्लीम असूनही त्याने आवडीमुळे संस्कृतची पदवी प्राप्त केली. संस्कृत लिटरेचरमध्ये त्याने एमएची पदवी देखील घेतली. त्या पात्रतेवर त्याला बनारस हिंदू युनिव्हर्सिटी अर्थात बीएचयूच्या संस्कृत विभागात सहाय्यक प्राध्यापक पदाची नोकरी देखील लागली. पण त्याचं एकही लेक्चर न ऐकता विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी त्याला ठाम विरोध करायला सुरुवात केली. आंदोलन करायला सुरुवात केली. कारण एकच होतं, ज्याप्रमाणे हिंदूंना मदरशांमध्ये शिकवण्याची परवानगी नाही, त्याचप्रमाणे मुस्लीम प्राध्यापकाकडून आम्ही संस्कृत शिकून घेणार नाही.’ द क्विंटने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

फिरोजचे आजोबा गावामध्ये हिंदू भावगीतं म्हणत असतं. त्यांच्याकडून त्याच्या वडिलांनी गाण्यांचे धडे घेतले. त्याचे वडील स्वत: संस्कृतचे उत्तम अभ्यासक आहेत. त्यांच्याकडूनच फिरोजने संस्कृतचे प्राथमिक धडे घेतले. अशा प्रकारे घरात संस्कृतचा वारसा असताना फिरोजने देखील संस्कृतमध्येच प्राविण्य मिळवलं. त्याच्या पात्रतेमुळेच त्याला सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी देखील लागली. पण तिथले विद्यार्थी त्याला स्वीकारायला तयार नाहीत.

- Advertisement -

‘मला संधी द्यायला हवी’

फिरोज सांगतो, ‘जेव्हा मी रुजू होण्यासाठी पहिल्या दिवशी विद्यापीठात आलो, तेव्हा तिथे कुणीही माझ्याशी काहीही बोललं नाही. संस्कृत विभाग बंद होता. मी एकही वर्ग घेतला नव्हता. पण विद्यार्थ्यांचा मला खूप विरोध होता. माझं तर अजूनही असंच म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांनी मला एक संधी द्यायला हवी. मी त्यांना शिकवेन. मला खात्री आहे की त्यांना मी हळूहळू आवडू लागेन.’

या सगळ्या प्रकारामुळे फिरोजच्या कुटुंबियांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. संस्कृतचे अभ्यासक असलेल्या त्याच्या वडिलांना देखील त्याने युनिव्हर्सिटी सोडून घरी परत यावं, असंच वाटतं. त्याचा भाऊ देखील त्याला वारंवार परत येण्याबद्दल सांगण्यासाठी फोन करत असतो. मात्र, फिरोजचा निर्णय ठाम आहे. तो म्हणतो, ‘जर विद्यार्थ्यांची तयारी असेल आणि विद्यापीठ प्रशासनाने मला सांगितलं, तर मी आंदोलक विद्यार्थ्यांशी बोलायला तयार आहे’.

- Advertisement -

खरंतर फिरोजसारख्या तरुणांनी चाकोरीबाहेर जाऊन संस्कृतचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यात प्राविण्य मिळवलं यासाठी त्यांचं कौतुक होणं आवश्यक आहे. मात्र, धार्मिक कोंदणात अडकलेल्या भारतीय समाजामध्ये अशा व्यक्तींच्या कौशल्याला काहीएक किंमत न उरावी ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -