हार्दिक पटेल यांच्या भाजप प्रवेशामागचे नेमके गणित काय?

hardik patel

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत पटेल यांनी मोठया दिमाखात पक्षप्रवेश केला. मात्र भाजपमध्ये जाण्याआधीच हार्दिक यांनी भाजपच्या विस्तारासाठी काही खास मोहीम राबवण्याचा संकल्प केला आहे. आपण मोदींच्या सैन्यातील शिपाई म्हणून काम करणार असल्याचे हार्दिक यांनी सांगितले आहे. यामुळे एकेकाळी भाजप अध्यक्ष अमित शहांना गुंड नावाने संबोधित करणाऱ्या आणि भाजपविरोधात बोलण्याची एकही संधी न सोडणाऱ्या पटेल यांना अचानक कसा काय भाजप हाच खरा देशाला पुढे नेणारा पक्ष असल्याचा साक्षात्कार झाला यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

हार्दिक यांच्या या भाजपप्रवेशामुळे राजकारणात कोणीही कोणाचा कायम शत्रू नसतो आणि मित्रही नसतो हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. यामुळे काही वर्षांपूर्वी भाजपविरोधात गरळ ओकणाऱ्या हार्दिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करणारे भाजपचे नेते आज मात्र झालं गेलं विसरून दिलखुलासपणे हार्दिक यांचे स्वागत करताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे हार्दिक यांना भाजपात सामील करून घेण्याचा निर्णय थेट दिल्लीतील नेतृत्वाने घेतला आहे. यामुळे वरकरणी जरी भाजप नेते हार्दिक यांचे खुल्यादिलाने स्वागत करताना दिसत असले तरी त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपमधील अनेक तरुण नेत्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळे हार्दिक यांच्या भाजपप्रवेशानंतर राज्यातील नेत्यांमध्ये दोन गट तयार झाले आहेत. यातील एका गटाने भाजप नेतृत्वाच्या शब्दाला मान देत हार्दिक यांचे पक्षात जल्लोषात स्वागत केले आहे. परिणामी हार्दिक यांच्या पक्षविस्ताराच्या संकल्पाला सुरुंग कसा लावता येईल यावर आतापासूनच एका गटात खलबत सुरू झाली आहेत.

दरम्यान पाटीदार समाजाचे नेतृत्व करत काँग्रेसमध्ये गेलेल्या हार्दिक यांनी त्यावेळी भाजपपक्ष, मोदी आणि अमित शहांवर कडाडून टीका केली होती. त्याचा राग अजूनही काही भाजप नेत्यांना आहे. यामुळे पटेल यांच्या पक्षप्रवेशावर भाजपमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हार्दिक पटेल यांना खुद्द राहुल गांधी यांनीच युवा पाटीदार नेता म्हणून काँग्रेसमध्ये सामील केले होते. पटेल यांना २०२० मध्ये कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले. पण त्यानंतर मात्र कांग्रेसने नरेश पटेल यांना पक्षात सामील करत विशेष अधिकार दिले. तसेच अनेकवेळा महत्वाच्या बैठकीत हार्दिक यांनी दिलेल्या सूचनांनाही पक्षश्रेष्ठींनी केराची टोपली दाखवली. यामुळे हार्दिक यांनी पक्षात आपली घुसमट होत असल्याचे अनेकवेळा प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केले. पक्षात माझी अवस्था नसबंदी केलेल्या नवरदेवासारखी असल्याचेही पटेल यांनी म्हटले होते. तेव्हापासूनच ते काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू होती. अखेर १८ मे रोजी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर आज २ जूनला त्यांनी भाजपात प्रवेश केला. पाटीदार समाजाच्या आंदोलनावेळी हार्दिक यांच्यावर गुजरात सरकारने अनेक कलमांतर्गेत गुन्हे दाखल केले होते. त्यांच्यावर राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे पटेल भाजपवासी झाल्याची टीकाही त्यांच्यावर होत आहे. तर आगामी निवडणुकांमध्ये पाटीदार समाजाच्या मतांवर भाजपचा डोळा असल्यानेच हार्दिक यांना भाजपने एन्ट्री दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.