घरदेश-विदेशभारताने अंतराळात उपग्रहाचा घेतला वेध!

भारताने अंतराळात उपग्रहाचा घेतला वेध!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ऐतिहासिक घोषणा
वकाश क्षेपणास्त्राद्वारे, अंतराळातील उपग्रह पाडण्याची मोहीम भारताने आज यशस्वी केली. ही मोहीम मिशन शक्ती या नावाने कार्यरत होती. अवकाशात अशी कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात दिली. तसेच ही मोहीम कोणत्याही देशाविरोधात नसून ती भारताची आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतूने होती, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. अवकाश क्षेपणास्त्राद्वारे भारताने अंतराळात ३०० किमी अंतरावर असलेल्या उपग्रहाला लक्ष्य करून तो पडला. ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारत अंतराळ युद्धाची क्षमता असलेला देश ठरला आहे. मात्र आमचा युद्धाचा अजिबात हेतू नाही, आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, असेही पतप्रधान मोदींनी सांगितले.

राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की, मिशन शक्ती मोहीमेतंर्गत देशातील शास्त्रज्ञांनी काही वेळापूर्वीच ३०० किमीच्या अंतरावर असलेल्या ’लो अर्थ ऑर्बिट’मधील एका उपग्रहावर हल्ला करून तो पाडला. ही मोहीम फक्त ३ मिनिटांत फत्ते झाली. ’मिशन शक्ती’ नावाचे हे अभियान अतिशय कठीण होते. याच उच्चकोटीच्या तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती. मात्र आपल्या शास्त्रज्ञांनी त्यात मोठे यश संपादीत केले.

- Advertisement -

हा क्षण सर्वच भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. हा पराक्रम भारतातच तयार करण्यात आलेल्या एसॅट-उपग्रह क्षेपणास्त्राद्वारे करण्यात आला. त्यामुळे आज पुन्हा देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. या अभियानाशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो. आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो. आमच्या उपग्रहाचे फायदे सर्वांना मिळतात. येणार्‍या दिवसांमध्ये त्याचा वापर आणि महत्त्वही वाढणार आहे. मात्र आपल्या उपग्रहांची सुरक्षाही अत्यंत महत्त्वाची आहे, असेही असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.

भारताने यशस्वीरित्या राबवलेल्या मिशन शक्तीमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झालेले नाही. आम्ही या अभियानाचा उपयोग देशातील १३० कोटी जनतेची सुरक्षा आणि शांततेसाठीच करणार आहोत. आमच्या भविष्यातील सुरक्षेसाठी आज उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे मोठं यश आहे. या अभूतपूर्व यशामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, तंत्रज्ञानाच्या बाबतही भारत प्रगतिशील राहणार आहे. यावेळी मोदींनी या क्षेपणास्त्राची निर्मिती करणार्‍या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. भारतीय क्षेपणास्त्रानं (A-SAT) पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला ’शक्ती’ असं नाव देण्यात आलं होतं.

- Advertisement -

वेळ चुकली आणि सोशल मीडियावर सुरू झाले विनोद

 8 मी ११.४५ ते १२ वाजण्याच्या दरम्यान महत्त्वाचा संदेश देणार आहे. माझा हा संदेश टीव्ही, रेडीओ किंवा सोशल मिडियावर ऐका,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी सकाळी देशातील नागरिकांना सांगितले. त्यानंतर देशातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. दाऊदला पकडले, मसूद अझहरला मारले… असे पतंग देशातील वृत्तवाहिन्यांनी उडवण्यास सुरुवात केली असताना भाजप, मोदीविरोधकांनी देशात आणीबाणी घोषित होणार, असाही अंदाज बांधला. १२ वाजण्याची वेळ टळून गेल्यावर मात्र या संदेशाबाबत सोशल मिडियावर विनोद सुरू झाल

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी, मोदी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करणार आहेत, असे ट्वीट केले. तर दाऊदला अटक करून परत आणणार? हाफीज सईद किंवा मसूद अझरला ठार मारले? असे संदेश सोशल मिडियावर फिरू लागले. तर काही संदेश, ‘निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा पार केली,’ असा संदेश मोदी देणार असल्याचे सांगणारे होते. मोदीविरोधकांनी तर इंदिरा गांधी देशाला टीव्हीवरून संबोधत असल्याचा फोटो टाकत, मोदीही देशात आणीबाणीची घोषणा करणार असल्याचे सांगून टाकले. मोदीजी देशाला संबोधणार असल्यामुळे मी अगोदरच एटीएम गाठले आहे, असेही मेसेज् सोशल मिडियावर फिरत होते. काहींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ब्लडप्रेशर तपासत असल्याचा फोटो टाकत, त्याखाली, पंतप्रधान मोदी देशाला संबोधणार असल्यामुळे इम्रान खान यांच्याकडून खबरदारीचा उपाय, अशी फोटो ओळही टाकली.
मात्र पंतप्रधान मोदींनी अवकाश क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीचे संदेश दिला आणि हे विनोद थांबले. देशातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणारे संदेश सोशल मिडियावर फिरू लागले.

काय आहे मिशन शक्ती चाचणी
भारताने २७ मार्च २०१९ रोजी मिशन शक्ती ही मोहिम राबवली. त्याअंतर्गत उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम लाँचिंग कॉप्लेक्समधून यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे तांत्रिक अभियान डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी केले. या मोहीमेत ज्या उपग्रहावर क्षेपणास्त्र डागण्यात आले तो भारताचा उपग्रह असून तो लोअर ऑर्बिटमध्ये कार्यरत होता. ही चाचणी पूर्णत: यशस्वी ठरली. त्यासाठी उच्च दर्जाची तांत्रिक क्षमता आणि तयारी आवश्यक होती. या यशस्वी चाचणीमुळे भारत अमेरिका, रशिया आणि चीनच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

कोणता उपग्रह वापरला
वापरून निकामी झालेला भारतीयच उपग्रह.

कोणते क्षेपणास्त्र वापरले
डीआरडीओने विकसित केलेले स्वयंचलित संरक्षण क्षेपणास्त्र इंटरसेप्टर वापरण्यात आले. हे क्षेपणास्त्र संपूर्णत: भारतीय बनावटीचे होते.

अवकाश कचर्‍याचे काय
ही चाचणी निम्न वातावरणात अशा प्रकारे घेण्यात आली की त्यामुळे अवकाश कचरा तयार होणार नाही. जो काही कचरा तयार होईल तो वातारणाच्या उच्च तापमानामुळे जाळला जाऊन आठवड्याभराने पृथ्वीवर पडेल.

ही चाचणी का करण्यात आली
आपल्या उपग्रहांच्या सुरक्षेसाठी ही चाचणी घेण्यात आली. कोणाला भारताची ताकद दाखवण्यासाठी ही चाचणी घेण्यात आलेली नाही.

पंतप्रधानांनी घोषणा का केली
डीआरडीओ स्वतः सज्ज नसेल तर चाचणी घेता येत नाही. या चाचणीचा निर्णय राजकीय आहे. याचे कारण असे की पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह फिरू शकतील असा एक अरूंद पट्टा आहे आणि त्यात उपग्रहांची गर्दी झाली आहे. जर चाचणी अयशस्वी झाली असती तर भलत्याच उपग्रहाला हानी पोचू शकली असती. चाचणी यशस्वी झाल्यामुळे हे हत्यार आपल्या विरोधात वापरले जाईल अशी भीती पाकिस्तान व चीनला वाटली तर ते स्वाभाविक आहे. म्हणूनच हा प्रयोग तुमच्या विरोधात नाही असे आश्वासन सर्वोच्च पदावरील व्यक्तीने या देशांना देणे गरजेचे होते म्हणून पंतप्रधानांना घोषणा स्वतः करावी लागली आहे.

डीआरडीओ शास्त्रज्ञांचा त्यांच्या कामगिरीबद्दल आम्हाला गर्व आहे! पंतप्रधानांना जागतिक नाटक दिनानिमित्त मी शुभेच्छा देऊ इच्छितो…
-राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस.

भारताचे लष्कर आणि अंतराळ क्षमतेचे हे उत्कृष्ट उदाहरण आहै. आमच्या शास्त्रज्ञांनी पुन्हा सिद्ध केले की, आमचा देश सक्षम लोकांच्या हाती आहे.
-नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.

नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज ? वैज्ञानिकांचे कर्तृत्व आहे त्यांना प्रसिद्धी मिळू द्या…
राज ठाकरे ,अध्यक्ष, मनसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -