घरदेश-विदेशहावडा स्टेशनवर 'जय श्रीराम'च्या घोषणा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा संताप

हावडा स्टेशनवर ‘जय श्रीराम’च्या घोषणा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा संताप

Subscribe

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. गांधीनगर येथे हीराबेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पश्चिम बंगालमधील कनेक्टिव्हिटीशी संबंधित विविध रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले. यानिमित्ताने हावडा स्टेशनवर आयोजित कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमसाठी त्या तिथे पोहोचताच उपस्थित भाजपा समर्थकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली, त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या.

- Advertisement -

पंतप्रधानांनी शुक्रवारी पश्चिम बंगालला 7800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट दिली. त्यांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिताना मार्गदर्शन केले. ज्या भूमीवरून ‘वंदे मातरम्’चा जयघोष झाला, तिथून ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सरकारी कार्यक्रम असतानाही त्यात उपस्थितांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने ममता बॅनर्जी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या इतक्या संतापल्या होत्या की, त्यांनी व्यासपीठावर जाण्यास नकार दिला. यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह रेल्वे अधिकाऱ्यांनी ममता यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर ममता बॅनर्जी शांत झाल्या. त्यांनी आपल्या भाषणात, पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांना श्रद्धांजली अर्पण केली. माझ्या संवेदना तुमच्यासोबत आहेत. अशा कठीण प्रसंगी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. आईपेक्षा महत्त्वाचे काहीही असू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisement -

गेल्यावर्षी देखील घोषणाबाजीवरून संतापल्या ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा पहिल्यांदाच दिलेल्या नाहीत. गतवर्षी 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात देखील ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्याने भर कार्यक्रमात ममता बॅनर्जी संतप्त झाल्या होत्या. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -