कन्नडिगांची पुन्हा कागाळी! आता तर थेट छत्रपती शिवरायांवरच सांगितला हक्क!

Karnatak Deputy Chief Minister Govind Karjol
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटू लागला आहे. यामध्ये कर्नाटककडून पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे महाराष्ट्राची खोड काढली गेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बेळगाव आणि इतर वादग्रस्त सीमाभाग सर्वोच्च न्यायालयात तोडगा निघेपर्यंत केंद्रशासित केंद्रशासित करण्याचा सल्ला दिला. यानंतर बेळगाव सीमाभागाचा वाद अधिकच वाढू लागला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सवदी यांनी मुंबई कर्नाटकला जोडण्याची भाषा केली. त्यांना महाराष्ट्रातील नेते मंडळींनी सुनावल्यानंतर आता पुन्हा एकदा दुसरे कानडी उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांची जीभ घसरली आहे. यंदा तर त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांवरच हक्क सांगितला आहे.

काय म्हणाले मंत्रीमहाशय!

छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कर्नाटकचे आहेत. गदगमधल्या सोरटूर गावात बेळ्ळीअप्पा हे त्यांचे मूळ पुरुष होते. तेव्हा कर्नाटकमध्ये दुष्काळ पडला होत. त्यावेळी शिवरायांचे पूर्वज महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. आणि तिथेच राहिले. याची माहिती उद्धव ठाकरेंनी करून घ्यायला हवी. त्यामुळे महाराष्ट्रात असलेले सगळे मराठे हे मूळचे कानडीच आहेत.

गोविंद कार्जोळ, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री

गोविंद कार्जोळ यांच्या वक्तव्याच्या महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटणं साहजिकच होतं. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारमधले शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे.

ज्यांना स्वत:च्या गावचा इतिहास माहिती नाही, ते महाराष्ट्रावर वाट्टेल ती टीका करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाट्टेल ते बोलत आहेत. इथल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी सीमावादावर भूमिका स्पष्ट करायला हवी.

उदय सामंत, शिक्षण मंत्री

कानडी मंत्र्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी देखील आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारे कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांवर हक्क सांगत असेल, तर ते वाईटच आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

कर्नाटकचा मंत्री असो वा कुणीही. एखाद्या महापराक्रमी पुरुषाला कुणीही एका चौकटीत बंदिस्त करू नये. प्रेमापोटी कुणी म्हणत असेल की छत्रपती आमचे, तर ठीक आहे. पण कुणी म्हणत असेल की ते आमचे आणि तुमचे नाही, तर ते वाईट आहे.

चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष