Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश बदलापूरच्या तरुणाची इस्त्रोत झेप

बदलापूरच्या तरुणाची इस्त्रोत झेप

ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड, भारतात ओबीसीमध्ये सर्वप्रथम

Related Story

- Advertisement -

बदलापुरातील एका रिक्षाचालकाच्या मुलाची इस्त्रोत ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. देवानंद सुरेश पाटील असे या तरुणाचे नाव आहे. देवानंदच्या या यशामुळे बदलापूरच्या लौकिकात भर पडली असून त्याबद्दल या तरुणावर व त्याच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देवानंद मेकॅनिकल इंजिनिअर असून सध्या टाटा स्टिल जमशेदपूर येथे इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी देवानंदची रेल्वे लोको पायलट म्हणून निवड झाली होती. परंतु ही नोकरी त्याने नम्रपणे नाकारली. थोडे थांबा काहीतरी वेगळे करायचेय असे त्याने कुटुंबियांना सांगितले. आणि टाटा स्टिलमध्ये नोकरी करतानाच तो वेगवेगळ्या परीक्षा देत राहिला. त्यापैकीच एक असलेल्या इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) परीक्षेत देवानंद देशात ओबीसीमध्ये पहिला आला असून त्याची ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महिन्याभरात त्याची नियुक्ती कोणत्या ठिकाणी होणार हे स्पष्ट होणार असल्याचे देवानंदचे वडील सुरेश पाटील यांनी सांगितले. देवानंदची एक बहीण इंजिनिअर म्हणून नोकरी करत आहे. तर दुसरी जळगाव शासकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. या तिन्ही मुलांनी दहावीपासूनच सुयश मिळवले आहे. देवानंदला दहावीला ९७.९ टक्के, मोठ्या बहिणीला ९४ टक्के गुण होते. तर धाकटी बहीण ९७.२० टक्के गुण मिळवून मुंबई बोर्डात तिसरी आली होती.

मुलाच्या यशाचा आनंद अवर्णनीय

- Advertisement -

सुरेश पाटील हे बदलापुरातील एक प्रामाणिक रिक्षाचालक असून दिवस-रात्र १२-१४ तास रिक्षा चालवून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या पत्नीने दररोज ७-८ तास पापड तयार करण्याचे काम करून त्यांना साथ दिली. मुलांच्या या यशाने कष्टाचे चीज झाले असून हा आंनद अवर्णनीय असल्याच्या भावना सुरेश पाटील यांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -