संसदेत विरोधकांचे माईक…, राहुल गांधींचा मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल, सोमवारी लंडनमधील संसद भवनात ब्रिटिश खासदारांना संबोधित करताना आमच्या लोकसभेतील विरोधी सदस्यांचे माईक अनेकदा बंद केले जात असल्याचा आरोप मोदी सरकारवर केला.
ज्येष्ठ भारतीय वंशाचे विरोधी मजूर पक्षाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी हाऊस ऑफ कॉमन्स संकुलातील ग्रँड कमिटी रूममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेसंबंधी त्यांचे अनुभव शेअर केले. प्रचंड गर्दीमध्ये राजकीय सराव झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोकसभेतील चर्चेदरम्यान विरोधकांचा आवाज कसा बंद केला जातो हे सांगण्यासाठी राहुल यांनी खराब माईकचा वापर केला.

आमचे माइक खराब होत नाहीत, ते काम करतात, परंतु आम्ही ते चालू करू शकत नाही. मी बोलत असताना हे माझ्यासोबत अनेकदा घडले असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी आरोप करताना सांगितले की, आम्हाला नोटाबंदीवर चर्चा करण्याची परवानगी देण्यात आली नाही, जो एक विनाशकारी आर्थिक निर्णय होता. आम्हाला जीएसटीवर तसेच चिनी सैनिक आमच्या हद्दीत घुसले, तेव्हा सुद्धा चर्चा करण्याची परवानगी मिळाली नाही. मला एक संसद आठवते, जिथे सध्याच्या विषयावर चर्चा, वादविवाद आणि मतभेद होत होते, पण आता संसदेत असे होताना दिसत नाही.

आरएसएसवरही साधला निशाणा
भारतातील लोकशाही प्रक्रियेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आरएसएस नावाची संघटना आहे, जी एक कट्टरवादी आहे. मुळात मोदी सरकारने भारतातील सर्व संस्था ताब्यात घेतल्या असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की, आपल्या देशातील विविध संस्था ताब्यात घेण्यात मोदी सरकार किती यशस्वी झाले आहे. प्रेस, न्यायपालिका, संसद आणि निवडणूक आयोग हे सर्वच या ना त्या कारणाने धोक्यात आहेत.
भारतात दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांसाठी काय काहीच केले जात नाही. हे काँग्रेस म्हणत नाही तर भारतीय लोकशाहीत एक गंभीर समस्या आहे, असे लेख परदेशी माध्यमांमध्ये सतत येत असतात, असेही राहुल गांधी म्हणाले. एजन्सी कशा वापरल्या जातात हे तुम्ही कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याला विचारू शकता. माझ्या फोनमध्ये पेगासस होते, हे तेव्हा झाले नाही जेव्हा आम्ही सत्तेत होतो.

चीनने भारताच्या 2,000 चौरस किमी भूभागावर कब्जा केला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सांगितले की, भारताची एक इंचही जमीन घेतली नाही. लष्कराला हे सर्व माहीत आहे, पण आमचे पंतप्रधान म्हणतात चीन तिथे नाही. यामुळे चीनला प्रोत्साहन मिळते आहे.

चिनी सैन्याची युक्रेनसारखी घुसखोरी लडाख, अरुणाचल सीमेवर : राहुल गांधी
रशियाने युक्रेनला सांगितले की, तुमचे युरोप आणि अमेरिकेसोबतचे संबंध आम्हाला मान्य नाहीत आणि तुम्ही हे संबंध बदलले नाहीत तर आम्ही तुमच्या प्रादेशिक अखंडतेला आव्हान देऊ. माझ्या देशाच्या सीमेवरही असेच घडत आहे, असे मला वाटत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. युक्रेनचे अमेरिकेशी संबंध असावेत असे चीनला वाटत नसल्यामुळेच अमेरिकेसोबत राहिल्यास कारवाई करू, असे सांगून ते आम्हाला धमकावत आहे. त्यामुळे चीनने अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्येही लष्करी पथके पाठवली आहेत.
चीनने लडाख आणि अरुणाचल प्रदेशात सैन्य पाठवण्यामागची मूळ कल्पना युक्रेनमध्ये घडत असलेल्या घटनांसारखीच आहे, असे माझे मत आहे. मी याचा उल्लेख परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनाही केला, पण ते माझ्याशी पूर्णपणे असहमत आहेत आणि त्यांना माझी कल्पना निरर्थक वाटते.

भाजपने दिले प्रत्युत्तर
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारतातील लुप्त होत चाललेल्या लोकशाहीवर अमेरिका आणि युरोपीय देशांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, राहुल गांधी देशाशी गद्दारी करू नका. काँग्रेस पक्षाने याआधीही स्थानिक मुद्दे संयुक्त राष्ट्रात नेले आहेत आणि आता ते इतर देशांना भारतात हस्तक्षेप करण्यास सांगत आहेत, असे ठाकूर म्हणाले.
गुलामगिरीच्या विचारातून काँग्रेसचे नेते अजून बाहेर आलेले नाहीत. देशाच्या परराष्ट्र धोरणावर त्यांनी घेतलेले आक्षेप हे या विषयावर त्यांची समज नसल्याचा पुरावा देतात. परदेशातून त्यांनी भारताविषयी पसरवलेल्या खोट्या गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असेही अनुराग ठाकूर म्हणाले. राहुल गांधींनी आपले अपयश लपवण्याच्या षड्यंत्राचा भाग म्हणून परदेशातून भारताची बदनामी करत असणारे राहुल गांधी वादाचे वादळ बनत असल्याचेही ठाकूर म्हणाले.
परदेशी एजन्सी असोत, परदेशी वाहिन्या असोत किंवा परदेशातील माती असो, राहुल गांधी भारताची बदनामी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. राहुल गांधींची भाषा, त्याची विचारसरणी, त्याची मोडस ऑपरेंडी सगळंच प्रश्नचिन्ह आहे. ही पहिलीच वेळ नाही, त्यांनी अनेकदा असे केले आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी भारतातील लसीवर प्रश्न उपस्थित केले होते, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.
तसेच राहुल गांधी हे नुसते भ्रामक नाहीत तर ते विकृत मार्गाने कुटिल आहेत. त्यांचे विचार भारताच्या सार्वभौमत्वासाठी घातक आहेत, असे भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले.