Lockdown मध्ये या देशात १ हजार महिलांचा खून; कोरोनापेक्षाही अधिक बळी

Mexican Women murder
या देशात दर चार तासाला एका महिलेचा खून होतो

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना व्हायरस आटोक्यात येत असला तरी इतर अनेक संकटे उभे राहिले आहेत. काही देशांमध्ये बेरोजगारी वाढली आहे, अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. मात्र मेक्सिकोत एक वेगळीच समस्या उभी राहिली आहे. यावर्षीच्या पहिल्या ३ महिन्यात मेक्सिकोत १००० महिलांचा खून झाला असल्याची माहिती मेक्सिकन सरकारने दिली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये महिला दुहेरी संकटात सापडल्या आहेत. ही बातमी reuters ने आपल्य संकेतस्थळावर दिली आहे.

यावर्षीच्या आकडेवारीची मागच्यावर्षाशी तुलना केल्यास ८ टक्क्यांनी हत्या वाढल्या असल्याचे समोर येत आहे. सिटिझन्स मुव्हमेंट पार्टीच्या काँग्रेस वुमन मार्था टॅग्ले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मेक्सिकोत कोरोनाच्या महामारीने जेवढे मृत्यू झालेल नाहीत, तेवढे महिलांसोबत झालेल्या हिंसेने मृत्यू झाले आहेत. सध्या हिंसा हेच राष्ट्रासमोरील सर्वात मोठे संकट आहे आणि या संकटाला ओळखूनच सरकारने काम केले पाहीजे.

मेक्सिकोत आतापर्यंत १४,००० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १,३०० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी महिलांची संख्या ४२० इतकी आहे, अशी माहिती मेक्सिकन सरकारने दिली. २०२० च्या पहिल्या तीन महिन्यात देशभरात ७२० महिलांचा खून झाला आहे. तर २४४ महिलांना केवळ त्या महिला असल्यामुळे हिंसाचाराच्या बळी पडल्या आहेत. मागच्या वर्षभरात ८९० महिलांचा खून झाला होता.

लॅटिन अमेरिकेत लिंगावर आधारीत हिंसाचार हा दूरवर पसरलेला आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रीय सांख्यिकी (INEGI) ने दिलेल्या आकडेवारीनुसार मेक्सिकोतील दोन-तृतीयांश महिला हिंसाचारात बळी जात आहेत. तर ४४ टक्के महिलांची त्यांच्याच जोडीदाराकडून छळवणूक केली जाते. मागच्या पाच वर्षात महिलांवरील अत्याचारात दुप्पट वाढ झाली आहे. यातही सामुहिक अत्याचाराच्या घटना लक्षणीय असून बऱ्याच प्रकरणांचा अद्याप उलगडाच झालेला नाही.

कोरोना व्हायरसमुळे मे महिन्याच्या शेवटपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचार आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. पीडित महिलांची कायदेशीर बाजू उचलून धरणाऱ्या वकील पॅट्रिचा ओलामेंडी यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, “हे भयानक आहे. कोरोनापेक्षाही हिंसाचारात अधिक महिलांचा बळी जात आहे.”