करोनामुक्त झालेल्या रुग्णांवर पुन्हा उलटतोय करोना?

corona patients

करोना मुक्त झालेल्या रुग्णांनी घरी गेल्यावरही काळजी घेण्यासारखी बातमी समोर आली आहे. करोना निर्मित वुहान शहरात जरी बरेच रुग्ण बरे झाल्याचे वृत्त आले असले तरी काही तुरळक रुग्णांना पुन्हा करोनाची लागण झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. यावर सध्या चाचणी सुरू असून बरे झालेले रुग्ण नक्की बरे झाले होते का, की त्यांची चाचणी चुकली यावर चीनमधील आरोग्य विभाग चाचपणी करत आहे. मात्र तरीही ही धोक्याची घंटा चीनने आता जगाला दिली आहे.

चीनमधील वुहान आणि हुबई या दोन शहरांमध्ये करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला होता. याच शहरांमध्ये ५-१० टक्के रुग्णांवर करोना उलटल्याचे वृत्त आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने चीनच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे करोना उलटण्याची प्रक्रिया नक्की कशामुळे होतेय, हे तपासण्याचे आव्हान आता चीनच्या आरोग्य विभागासमोर उभे राहिले आहे. सध्या चीनमध्ये ८० हजाराहून अधिक जण करोना ग्रस्त असून बरे होणारे रुग्णही वाढत आहेत, अशाच वेळी करोना उलटल्याच्या घटना समोर आल्यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत.

भारतातही निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. राजस्थानमध्ये इटलीचे नागरिक असलेले ६९ वर्षीय पर्यटक यांना करोनाची लागण झाली होती. २ मार्चला या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर १५ मार्चला पुन्हा रिपोर्ट काढला असता तो निगेटिव्ह आला होता. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना जयपूरच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर २० मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.