Antilia bomb scare case: एन्काउंटवर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरावर NIAचा छापा, आज अटक करण्याची शक्यता

antilia case nia raid on encounter specialist pradeep sharma ps foundation in andheri
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटका प्रकरणी आणि मनसुख हत्येप्रकरणी आता शिवसेनेचे नेते आणि माजी एन्काउंटवर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयए (NIA)च्या रडारवर आहेत. एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीत घरावर छापा टाकला आहे. या छापेमारीदरम्यान प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात नुकतीच अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एकाने चौकशीत प्रदीप शर्मा यांचे नाव घेतले. त्यामुळे आज लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये एनआयएच्या एका टीमने प्रदीप शर्मांना ताब्यात घेतले आहे. प्रदीप शर्मा यांना घेऊन टीम मुंबईकडे रवाना झाली असून आज त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.

माहितीनुसार, पहाटे ६ वाजता प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयएची टीम दाखल झाली आहे. स्वतः सीआरपीएफचे डीसीपी या छापेमारी दरम्यान उपस्थितीत आहेत. सेंट्रल रिझर्व्ह पोलिसांच्या १० ते १२ टीम प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर चहूबाजूने तैनात करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी देखील प्रदीप शर्मांची एनआयएने चौकशी केल्याचे समोर आले होते. तीन ते चार वेळा प्रदीप शर्मा एनआयएच्या कार्यालयात गेले होते. तसेच याप्रकरणी अनेक राजकीय नेत्यांकडून प्रदीप शर्मा यांच्यावर संशय घेतला गेला आणि त्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. आज सकाळी ६ वाजता एनआयएची पूर्ण टीम प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरावर पोहोचली आहे. गेल्या ३ तासांपासून त्यांच्या घराची झाडाझडती घेतली जात आहे. या छापेमारीनंतर काही मोठं घडतं का? याकडे सगळ्यांचे लक्ष्य वेधले आहे.

छापा टाकणे हे अपेक्षित – प्रविण दरेकर

या छापेमारीबाबत एका मराठी वृत्तवाहिनी बोलताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, ‘छापा टाकणे हे अपेक्षित होते. कारण सचिन वाझे प्रकरणात वाझे यांचा मार्गदर्शक प्रदीप शर्मा होत हे सर्वश्रुत होते. त्याच्यामुळे अँटिलिया प्रकरण असेल किंवा मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण असेल यामधील वाझेच्या अॅक्टिव्हीटीच्या मागे प्रदीप शर्मा यांच्या निश्चितपणे हात असल्याचा संशय होता. जरी मध्यंतरी तपास आपल्या माध्यमांना दिसत नसला तरी देखील ती प्रक्रिया सुरुच होती. त्यामुळे एनआयएची टीम आज प्रदीप शर्मापर्यंत पोहोचली आहे. या छापेमारी दरम्यान निश्चित एनआयएला हाती धागेदोरे लागतील.

उद्धव ठाकरे यांची गुंडसेना एकापाठोपाठ जेलमध्ये जाणार – किरीट सोमय्या

‘आधी शिवसेनेचे प्रवक्ता सचिन वाझे जेलमध्ये गेले आणि आता शिवसेनेचे उपनेते आणि उमेदवार प्रदीप शर्मा जेलमध्ये जाणार आहेत. आता केव्हाना केव्हा अनिल परब यांच्या घरी देखील तपास यंत्रणा पोहोचले, याचे आश्चर्य वाटणार नाही. ही उद्धव ठाकरे यांची गुंडसेना, माफिया टोळी आहे, ते सगळेच एका पाठोपाठ जेलमध्ये जाणार आहेत,’ असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.