देशाची बदनामी झाली, टीव्हीसमोर जनतेची माफी मागावी; नुपूर शर्माविरोधात SC ची कठोर भूमिका

तुम्ही देशाची बदनामी केली असून अशाप्रकारचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. त्यामुळे तुम्ही टीव्हीसमोर जनतेची माफी मागावी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

पैगंबर मोहम्मद (Prophet Mohammad) यांच्याबाबत भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरून देशभर गोंधळ उडाला होता. आखाती देशातही भारताविषयी वाईट प्रतिमा तयार झाली होती. अखेर, भाजपने नुपूर शर्मा हिची पक्षाच्या प्रवक्ता पदावरून हकालपट्टी केली. दरम्यान, या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme court) नुपूर शर्माला फटकारले आहे. तुम्ही देशाची बदनामी केली असून अशाप्रकारचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. त्यामुळे तुम्ही टीव्हीसमोर जनतेची माफी मागावी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच, विविध राज्यात सुरू असलेले तिचे खटले एकाच ठिकाणी करण्यात यावे, अशी मागणी नुपूरने केली होती. ही याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. (Nupur Sharma should come in front of the TV and apologize to the people, the tough stance of the Supreme Court)

हेही वाचा – नुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्या टेलरची तलवारीने गळा चिरून हत्या, व्हिडीओ व्हायरल

नुपूर शर्मा स्वतःला वकील समजते, त्यामुळे तिच्याक़डून अशा वक्तव्यांची अपेक्षा नाही. तिच्या या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले असल्याचंही सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उदयपूर हत्याकांड घडले होते. नुपूर शर्मामुळेच हे हत्याकांड घडल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे नुपूर शर्मांला अशाप्रकारचं वक्तव्य करण्याची गरज नव्हती असंही न्यायालय म्हणाले आहे.


नुपूर शर्माने माफी मागायला उशीर केला आहे. सत्तेच्या जोरावर अधिराज्य गाजवू नये, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच, अँकरने असं वक्तव्य करण्यासाठी भडकावले असेल तर त्यांच्यावरही गुन्हा का दाखल करू नये असं न्यायालायने म्हटलं आहे.

हेही वाचा – नुपूर शर्मांना 6-7 महिन्यात मोठ्या नेत्या बनवले जाईल; ओवैसींनी भाजपावर साधला निशाणा

काय आहे प्रकरण?

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा हिने पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे तिच्यावर जगभरातून टीका करण्यात आली. कुवैत, युएई, कतारसह अनेक आखाती देशांनी तिच्यामुळे भारताला बोल लावले. त्यामुळे भाजपने तिची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर भारतभर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईसह अनेक शहरात तक्रारी आल्या आहेत. तसेच, तिला बलात्कार आणि हत्येच्या धमक्याही येत असल्याचं तिने सुनावणीदरम्यान सांगितलं. त्यामुळे तिच्यावरील सर्व प्रकरणे दिल्लीत ट्रान्सफर करण्यात यावी अशी मागणी तिने सर्वोच्च न्यायालयाने केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने तिची ही याचिका फेटाळली आहे.