घरदेश-विदेशगरीब आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणखी किती मनुष्यबळ पाहिजे, ओवैसींचा मोदींना खोचक सवाल

गरीब आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणखी किती मनुष्यबळ पाहिजे, ओवैसींचा मोदींना खोचक सवाल

Subscribe

नवी दिल्ली : भाजपाकडे 300हून अधिक खासदारांचे पाठबळ आहे. मग गरीब, शेतकरी आणि तरुणांच्या कल्याणासाठी त्यांना आणखी किती मनुष्यबळ हवे आहे, असा खोचक सवाल एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.

वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार, सीमेवरील सुरक्षा यासह इतर प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली असून त्याचे नेतृत्व खासदार राहुल गांधी करत आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर जोरदार टीका करीत आहेत. महागाई, शेतकरी व तरुणांच्या प्रश्नांवर एमआयएमचे खासदार ओवैसी यांनीही मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

भाजपाचे जवळपास 306 खासदार आहेत. मात्र तरीही, व्यवस्था आपल्याला काम करू देत नाही, अशी तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असते. गरीब, शेतकरी आणि युवकांच्या कल्याणासाठी तुम्हाला आणखी किती संख्याबळ हवे आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यापेक्षा केंद्रात खिचडी सरकार आणि दुर्बळ पंतप्रधान आले तर चांगले होईल. त्याचा फायदा गरीबांना होईल, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.

- Advertisement -

एकीकडे ‘खिचडी’ सरकारचा उपहासाने उल्लेख करत असताना दुसरीकडे मात्र तिसऱ्या आघाडीसाठी विरोधकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर देखील त्यांनी टीका केली. वस्तुत:, विरोधकांकडून वारंवार भाजपाविरोधात एकजूट उभारण्यासाठी बैठका घेतल्या जातात. पण त्यांच्यात कधीच एकवाक्यता झाली नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना रिंगणात उतरवले. परंतु ऐन निवडणुकीच्या वेळी अनेक विरोधी खासदारांनी मुर्मू यांच्या पारड्यात मत टाकले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही तेच चित्र पाहायला मिळाले.

या विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. तर, कधी शरद पवार यांच्या नावाची चर्चा होती. आता नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपाशी पुन्हा एकदा काडीमोड घेऊन त्यांनी बिहारमध्ये सत्ता स्थापन केली आहे. तसेच भाजपामुक्त भारतासाठी विडा उचलत प्रमुख विरोधी नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यावरूनही ओवैसी यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.

भाजपाबरोबर राहूनच नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. 2015मध्ये त्यांच्या जदयूने भाजपाची साथ सोडली. पण लगेच 2017मध्ये पुन्हा त्यांच्याशी हातमिळवणी केली. 2019ची निवडणूक एकत्र लढविली आणि नरेंद्र मोदी यांच्या विजयात हातभारही लावला. आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपाशी काडीमोड घेतला आहे. ममता बॅनर्जी यांचेही तसेच झाले. त्या सुद्धा आधी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाल्या होत्या. त्यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा केली होती, असे स्मरणही त्यांनी करून दिले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -