घरदेश-विदेशनोएडा येथे IPS अधिकाऱ्याच्या घरातून ड्रग्ज साठा जप्त

नोएडा येथे IPS अधिकाऱ्याच्या घरातून ड्रग्ज साठा जप्त

Subscribe

अमली पदार्थ विरोधी पथकाने देशातील सर्वात मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. ग्रेटर नोएडा येथील एका घरातून स्यूडोफेड्राइन नामक अमली पदार्थाचा १ हजार ८१८ किलोंचा साठा जप्त केला आहे. तसेच या प्रकरणात दोन नायजेरियन आणि एक दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला अटक करण्यात आली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे ज्या घरातून हा साठा जप्त झाला, ते घर एका आयपीएस अधिकाऱ्याचे होते. याच घरात ड्रग्जची निर्मिती केली जात होती. ड्रग्जची किमंत अंदाजे १ हजार कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रादेशिक संचालक माधव सिंह यांनी या कारवाई नंतर सांगितले की, भारतातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. जगभरात सर्वात जास्त घेतल्या जाणाऱ्या स्यूडोफेड्राइनचा एवढा मोठा साठा जप्त करण्याची मागच्या तीन वर्षातील ही पहिलीच वेळ आहे.

- Advertisement -

गुरुवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दक्षिण आफ्रिकेच्या ३१ वर्षीय महिला प्रवाशाला अटक केली होती. या महिलेच्या बॅगेत २४ किलोंचा स्यूडोफेड्राइन मिळाले होते. सदर महिला हे जोहान्सबर्गला जाण्यासाठी निघाली होती. जेव्हा अधिकाऱ्यांनी या महिलेची चौकशी केली तेव्हा ग्रेटर नोएडा येथील दोन नायजेरियन नागरिकांनी तिला हे ड्रग्ज जोहान्सबर्गला पोहोचवण्यास सांगितले होते. या बदल्यात चांगली रक्कम देऊ, असेही या महिलेला सांगण्यात आले होते. या महिलेच्या चौकशीतूनच अमली पदार्थ विरोधी पथकाला ग्रेटर नोएडाच्या सेक्टर पी४ येथील घराचा पत्ता मिळाला होता.

माधव सिंह यांनी सांगितले की, हेन्री आयडोफर (३५) आणि महिला आरोपी चिमांडो ओकारा (३०) यांना अटक केली आहे. तसेच घरातून मोठ्या प्रमाणात ड्रम आणि बॉक्स जप्त केले असून त्यामध्ये तब्बल १ हजार ८१८ किलोचा स्यूडोफेड्राइनचा साठा आणि १.९ किलोचा कोकेनचा साठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींनी हे घर २०१५ साली भाड्याने घेतले होते. आयपीएस अधिकारी देवेंद्र पांडे यांचे हे घर असून ते सध्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.

- Advertisement -

देवेंद्र पांडे यांना जेव्हा याबद्दल कळले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. एका प्रॉपर्टी एंजटच्या माध्यमातून आपण हे घर भाड्याने दिले होते. त्यामुळे तिथे काय चालायचे याची कल्पना नसल्याचे ते म्हणाले. तसेच मला मागच्या एका वर्षापासून घराचे भाडेही मिळालेले नाही, त्यामुळे मी स्थानिक पोलिसांत तक्रार देखील केली आहे, अशी प्रतिक्रिया पांडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -