देशात पहिल्यांदाच धावणार पाण्याखालून जाणारी मेट्रो

पाण्याखालून जाणारी पहिली मेट्रो कोलकाता शहरात धावणार असल्याने हे शहर पुन्हा एकदा अव्वल ठरणार आहे. कोलकाता येथील हुगळी येथे पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

देशात पहिल्यांदाच धावणार पाण्याखालून जाणारी मेट्रो

देशातली पहिली मेट्रो सेवा सुरू करणारे शहर म्हणून ओळख असलेले कोलकाता शहर आता पुन्हा एकदा आणखी एक नवा विक्रम रचणार आहे. पाण्याखालून जाणारी पहिली मेट्रो कोलकाता शहरात धावणार असल्याने हे शहर पुन्हा एकदा अव्वल ठरणार आहे. कोलकाता येथील हुगळी येथे पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

कोलकाता शहरात १९८४ साली पहिल्यांदा मेट्रो धावली होती. या मेट्रोचा विस्तार २०१४ पर्यंत होणे अपेक्षित होते.पण, नियोजित मार्गांवरील अडथळ्यांमुळे काम रखडले होते. मात्र, प्रकल्पाला विलंब झाल्याने या प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. कोलकाता मेट्रोच्या विस्तारासाठी शेवटचा हप्ता पुढील दोन वर्षात मिळणार असल्याचे, कोलकाता रेल्वे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापक मानस सरकार यांनी सांगितले आहे. या प्रकल्पाचा खर्च दुप्पटीने वाढला असून सुरुवातीस १४ किमी लांबीच्या मार्गासाठी ४,९०० कोटी लागणार असताना हा अर्च आता १७ किमीसाठी ८६०० इतका झाला आहे.

वाहतूक कोंडी कमी होणार – 

सर्वात आधी पाण्याखालून मेट्रो सेवा सुरू करणारे कोलकाता शहर आता ४० टक्के वाहतुकीचा भार उचलणार आहे, असे मत मानस यांनी व्यक्त केले आहे. यामुळे प्रदूषणाला आळा घालण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सर्वात कमी भाडे असणारी मेट्रो –

या पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोचे तिकीट केवळ पाच रुपये असणार आहे. दरपत्रकानुसार, दोन किमीसाठी पाच रुपये, पाच किमीसाठी १० रूपये, दहा किमीसाठी २० रूपये त्यानंतर शेवटच्या स्थानकापर्यंत ३० रुपये इतक भाडं असणार आहे. देशातील पहिल्या पाण्याखालून धावणाऱ्या या मेट्रोमध्ये प्रवाशांना विविध सोयीसुविधांचा लाभही घेता येणार आहे. या मेट्रोद्वारे दररोज ९० हजार प्रवासी वाहतूक करू शकणार आहेत. या मेट्रोचा ५२० मीटर लांबीचा पाण्याखालून जाणारा बोगदा असून, हा बोगदा एका मिनिटाहून कमी वेळात पार करता येणार आहे. सध्या हुगळी नदी ओलांडण्यासाठी फेरीबोटीने २० मिनिटे, तर हावडा पूल ओलांडण्यासाठी एक तास लागतो.