घरदेश-विदेशराजघाटावर २०१९ पर्यंत उभारणार, वाजपेयी यांचे 'स्मारक'!

राजघाटावर २०१९ पर्यंत उभारणार, वाजपेयी यांचे ‘स्मारक’!

Subscribe

राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, २०१९ च्या निवडणुकांपूर्वी वाजपेयींचे स्मारक उभे राहिल्यास भाजप नक्कीच त्याचा फायदा करुन घेईल

दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे एक भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. हे स्मारक दिल्लीतील राजघाटावर असलेल्या गांधीजींच्या समाधीजवळ उभारण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार १५ सप्टेंबरनंतर वाजपेयींच्या स्मारक उभारणीला सुरुवात होईल. येत्या २५ डिसेंबरला वाजपेयी यांचा ९४ वा वाढदिवस असल्यामुळे तोपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण व्हावे अशी काही भाजप नेत्यांची इच्छा होती. मात्र, समाधी उभारणाऱ्या टीमच्या सांगण्यानुसार पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत (२६ जानेवारी २०१९) समाधीचं काम पूर्ण होईल. त्यामुळे सूत्रांनुसार, वाजपेयी यांच्या स्मारकाचे उद्घाटनही २०१९ च्या प्रजासत्ताक दिनी केलं जाईल. दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार २०१९ च्या निवडणुकांपूर्वी स्मारक उभारणी झाल्यास भाजप नक्कीच त्याचा फायदा करून घेईल आणि या स्मारकाच्या निमित्ताने पूर्ण राजघाटच भारतीय जनता पक्षाचा होऊन जाईल. दुसरीकडे वाजपेयींच्या दिल्लीतील निवासस्थानाचं रुपांतर एका ‘मेमोरिअल’मध्ये करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : वाजपेयी डोंबिवलीकरांच्या स्मरणात…

गांधीजींसोबत आता अटलजींनाही श्रद्धांजली

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे अतिथी, दरवर्षी न चुकता राजघाटावरील गांधींजींच्या समाधीला श्रद्धांजली वाहण्यासाठी हजोरी लावतात. आता पुढील वर्षीपासून गांधीजींच्या समाधीसोबतच अटल बिहारी वाजपेयींच्या स्मारकावरही अतिथी श्रद्धासुमनं अर्पण करू शकतात. उपलब्ध माहितीनुसार, २०१९ च्या प्रजासत्ताक दिनासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रमुख अतिथी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमत्रित केले आहे. मात्र, अमेरिकेकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत उत्तर आलेले नाही. ज्याप्रमाणे काँग्रेससाठी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी तसंच राजीव गांधी यांची स्मृतीस्थळे महत्वाच्या वास्तू आहेत, त्याचप्रमाणे वाजपेयींचे स्मारकही भाजपसाठी अभिमानाची बाब ठरेल यात शंका नाही.

हेही वाचा : ‘ड्रीम गर्ल’चे चाहते होते वाजपेयी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -