घरदेश-विदेशAssembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा कहर; ममता बॅनर्जींची EC कडे 'ही'...

Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा कहर; ममता बॅनर्जींची EC कडे ‘ही’ मागणी

Subscribe

एकीकडे देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे तर दूसरीकडे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान निवडणूक प्रचार सभेत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसतंय. त्यामुळे बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उर्वरीत सर्व टप्प्यांसाठी एकाच वेळी मतदान घेण्यात यावं, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

बंगालमध्ये चार टप्प्यांचे मतदान पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान शनिवारी होणार असून त्यानंतर २२, २६ आणि २९ एप्रिल रोजी अशा तीन टप्प्यात होणार आहेत. उर्वरित टप्प्यातील मतदान हे एकत्रित व्हावे, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी आयोगाकडे केली होती मात्र ही मागणी आयोगाने फेटाळून लावली आहे. यावेळी बॅनर्जी किंवा टीएमसीकडून कोणताही औपचारिक संवाद झालेला नाही, अशी माहिती आयोगाने दिली. अपील फक्त सोशल मीडियावर करण्यात आले होते, असे आयोगाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

यासह देशात कोरोनाच्या रुग्णांत देखील चिंताजनक वाढ होत आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार सभेत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जाताना दिसतेय. प्रचारसभेदरम्यान मोठ्या संख्येने गर्दी केली जात असल्याने कोरोनाचा संसर्ग फैलण्यास सुरूवात झाली आहे. या दरम्यान, पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी आरिज आफताब यांनी आज निवडणूक प्रचाराशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. यावेळी आयोगाने सर्व राज्य आणि राष्ट्रीय राजकीय पक्षांना एकच प्रतिनिधी हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

या बैठकीत निवडणुकीच्या उर्वरीत टप्प्यांबाबत सर्व राजकीय पक्षांकडून त्यांचे मतं, विचार जाणून घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ४ टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. मात्र चौथ्या टप्प्यात हिंसाचार झाला होता. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता. तृणमूल काँग्रेसने यावरून निवडणूक आयोग आणि सुरक्षा दलांवर आरोप केला होता. तर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर २४ तासांची बंदी घातली आहे. दिलीप घोष यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही प्रचारबंदी लागू असणार आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -