Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Wrestlers Protest : कुस्तीपटू आणि पोलीसांमध्ये धक्काबुक्की; व्हिडीओ व्हायरल

Wrestlers Protest : कुस्तीपटू आणि पोलीसांमध्ये धक्काबुक्की; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटूं दिल्लीतल्या जंतरमंतरवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात धरणे आंदोलन करत आहेत. शांतपणे चाललेल्या या आंदोलनामध्ये कुस्तीपटू आणि दिल्ली पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी (3 मे) रात्री झालेल्या धक्काबुक्कीत विनेश फोगाटच्या भावाच्या कपाळावर मोठी जखम झाली आहे.

बुधवारी रात्री दारुच्या नशेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. दिल्लीत पडणाऱ्या पावसामुळे आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंसाठी फोल्डिंग बेड्स आणले होते, पण पोलिसांनी या बेड्सवर आक्षेप घेत कुस्तीपटूंना धक्काबुक्की केली आहे. दिल्ली पोलीस कर्मचारी आणि आंदोलक कुस्तीपटू यांच्यातील गोंधळाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. बजरंग पुनिया याने आरोप केला आहे की, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली, त्यांना मारहाण केली. मात्र कुस्तीपटूंच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

- Advertisement -

भारतीय कुस्तीपटूंपैकी महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करत अटक करण्याची मागणी केली होती. बृजभूषण सिंह यांना कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात यावं आणि त्यांची चौकशी व्हावी यासाठी पैलवान दिल्लीतील जंतरमंतर या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दिल्ली पोलिसांनी पॉस्कोसह विविध कलमे लावत गुन्हा दाखल केला, मात्र बृजभूषण यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू ठेवले आहे.

- Advertisement -

आरोपी म्हणून मी राजीनामा देणार नाही
बृजभूषण सिंह माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “माझा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जवळपास संपला आहे. त्यामुळे जोपर्यंत दुसऱ्या अध्यक्षची निवड होत नाही, तोपर्यंत मी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देणार नाही. यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. या तीन लोकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. राजीनामा देणे ही फार मोठी गोष्टी नाही. पण, आरोपी म्हणून मी राजीनामा देणार नाही. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देणे म्हणजे कुस्तीपटूंनी केलेले सर्व आरोप मान्य केल्यासारखे होईल. कुस्तीपटू हे माझ्याविरोधात लोकांना भडकविण्याचे काम करत आहेत”, अशी टीका त्यांनी कुस्तीपटूंवर केली आहे.

 

- Advertisment -