फटाके विक्रेते टेन्शन मध्ये

दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांची मागणी घटण्याची शक्यता

फटाके विक्रेते

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावलीसाठी सर्वत्र बाजारपेठ सज्ज झाली आहे. पण दुसरीकडे मुंबईसह देशभरातील फटाके बाजारात मात्र धाकधुकीचे वातावरण आजही कायम असल्याचे चित्र दिसून आले आहे. न्यायालयाने फटाके वाजविण्यासंदर्भात वेळेचे बंधन घातल्याने फटाके विक्रेत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. यामुळे मुंबईसह देशभरातील फटाके विक्री घसरण्याची शक्यतादेखील अनेक विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, वाढत्या प्रदूषणामुळे लोकांमध्ये जनजागृती वाढल्याने मर्यादित फटाके घेण्याचा नवा ट्रेंड वाढत आहेत. यामुळे यंदा अनेक स्थानिक व्यापार्‍यांनी गतवर्षीच्या तुलनेत कमी फटाके खरेदी केल्याची माहिती देण्यात आली आहे.

दिवाळी अवघ्या काही दिवासांवर येऊन ठेपलेली असताना फटाके वाजवण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चर्चेचा विषय ठरला होता. दिवाळीदरम्यान संध्याकाळी फक्त ८ ते १० या वेळेतच फटाके वाजण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर अनेकांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली होती. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलासा दिला आहे. फटाके वाजवण्याच्या वेळेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सूट दिली आहे. आता दिवसाच्या कुठल्याही वेळी फटाके वाजवता येणार आहेत. मात्र, ही वेळ दोन तासांपेक्षा जास्त नसावी, अशी अट न्यायालयाने घातली आहे. त्यामुळे आता दिवसाच्या कोणत्याही वेळी फटाके वाजवण्याची सूट जरी मिळाली असली, तरी दिवसाला दोनच तास फटाके वाजवता येणार आहेत.

त्यामुळे देशभरातील फटाके विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण मुंबईतील अनेक फटाके विक्रेत्यांना मात्र विक्रीसाठी परवानगी न मिळाल्याने त्यांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडे लाखो रुपयांचे फटाके पडून असून परवानगी नसल्याने विक्री सुरु केली नसल्याची माहिती या विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे. तर अनेक सोसायट्यांनी त्यांच्या आवारात नो क्रॅकर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा परिणाम देखील होण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली आहे.

गेल्या २० वर्षांपासून लालबाग परिसरात फटाके विक्री करणार्‍या स्वप्नील कसाबे यांच्याशी यासंदर्भात आपलं महानगरने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सध्या फटाके विक्रेत्यांची नक्की स्थिती काय आहे याबाबत कल्पना दिली.

अगोदरच कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे म्हणावी तशी फटाके विक्री झालेली नाही. कोर्टाने दिलासा दिला असला तरी त्याने कितपत फायदा होईल, हे आताच सांगणे कठीण आहे. सध्या फटाक्यांमध्ये प्रदूषण कमी करणारे फटाके द्या, अशी मागणी जास्त होत आहेत. तर अनेक ग्राहकांकडून फुलबाजे, पाऊस आणि चक्र या पारंपरिक फटाक्यांनाच पसंती दर्शविली जात आहेत. बाजारात नवीन आलेल्या फटाक्यांना काही ठराविक जणांकडूनच मागणी येत आहे. सध्या फटाक्यांमुळे प्रदूषण होते, याबाबात जनजागृती करण्याचे प्रमाणही वाढलेले आहेत. त्याची जाणीव आमच्याकडे येणार्‍या ग्राहकांशी बोलल्यानंतर दिसून येत आहे.
– स्वप्नील कसाबे, फटाके विक्रेता