Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय अग्रलेख भाजप, काँग्रेस दोघेही गोमूत्रभोक्ते!

भाजप, काँग्रेस दोघेही गोमूत्रभोक्ते!

Subscribe

सध्या राजकारणाची दिशा काय आहे, हेच समजत नाही. आज या पक्षात आहोत, तर उद्या कोणत्या पक्षात असू, हे जनसामान्य तर सोडाच, पण प्रत्यक्षात संबंधित नेत्यालाही सांगता येणार नाही. सर्वच पार्टीचे झेंडे आणि गमछे बाळगणार्‍या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विचारसरणी, पक्षनिष्ठा या केवळ ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ ठरले आहेत. फक्त काही विशिष्ट बाबतीत बहुतांश नेत्यांचे सूर जुळतात, ते म्हणजे भ्रष्टाचार, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे आणि अंधश्रद्धा. धार्मिकता आणि जातीयवादाचा पुरस्कार करणारे म्हणून ओळख असलेल्या भाजपा आणि त्याच्या सहयोगी संघटना अनेकदा अंधश्रद्धेला खतपाणी घालताना दिसतात, पण पुरोगामी असल्याचा झेंडा नाचवणार्‍या काँग्रेसनेही आपले ‘वैचारिक शुद्धिकरण’ केल्याचे दिसते.

कर्नाटकमध्ये दहा-अकरा दिवसांपूर्वीच निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या. अपेक्षेप्रमाणे काही दिवस मुख्यमंत्रीपदावरून दळण सुरू होते. अखेर सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर सोमवारी विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले, पण त्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विधान सौध अर्थात विधानसभेचे कथित शुद्धिकरण केले. त्यासाठी कार्यकर्त्यांनी विधानसभा परिसरात गोमूत्र आणि गंगाजल शिंपडले. हनुमान चालीसा म्हटली. का तर म्हणे, भाजपाने भ्रष्टाचार केल्याने विधानसभा प्रदूषित झाली होती. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी तसा शब्दच दिला होता! यातून काँग्रेस आणि भाजप हे दोघेही गोमूत्रभोक्ते असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

पण ही रामकथा एवढ्यावरच थांबत नाही तर विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कुणी बसायला तयार नव्हते. कारण या खुर्चीवर जो बसतो, तो पुढील निवडणुकीत हरतो आणि हे २००४ पासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. सगळेच हास्यास्पद. असा समज मनात ठेवणे म्हणजे थेट सर्वसामान्य मतदारांचा अपमानच म्हणावा लागेल. मुळात असे कार्य दिसले पाहिजे की संबंधित आमदाराला त्या मतदारसंघातून कोणी हरवूच शकणार नाही. आपल्यातच खोट असेल तर खुर्चीवर ठपका ठेवून काय उपयोग. दुसरे म्हणजे खेळ असो वा निवडणूक जय-पराजय तर असणारच. प्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेनुसार ‘डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील ते पायातळी; त्याला तयारी पाहिजे…’ पण या राजकारण्यांनी सर्वसामान्यांच्या आयुष्याचाच खेळ करून ठेवला आहे.

कर्नाटक झाले शेजारचे राज्य. महाराष्ट्रातील चित्र यापेक्षा वेगळे नाही. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांनी कथितरीत्या घुसण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार ब्राह्मण महासंघाने पोलिसांकडे दिली. यावरून वादळ उठले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी थेट एसआयटी चौकशीचे आदेश दिले. वस्तुत: त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या पायरीजवळ येऊन श्रद्धेने धूप दाखवण्याची मुस्लीम बांधवांची जुनी परंपरा असल्याचे तेथील स्थानिक जुन्याजाणत्या रहिवाशांनी सांगितले. दरवर्षी ही धूप दाखवण्यात येते तेव्हा वाद होत नाहीत. यंदाच असा वाद का घातला जात आहे, असा प्रश्न आता तेथील सर्वांनाच पडला आहे.

- Advertisement -

असे असतानाही हिंदू महासभेने लगेचच मंदिराच्या उत्तर दरवाजाचे ‘शुद्धिकरण’ केले. महाराष्ट्रात या शुद्धिकरणाचा प्रकार फार पूर्वीपासून होत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेत असताना हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. सन १९८७ साली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रिडल्स ऑफ हिंदुइझम’ या पुस्तकातील हिंदू देवतांविषयी असलेल्या उल्लेखावरून शिवसेनेने आंदोलन पुकारले होते. शिवसेनेला विरोध करताना मुंबईतील हुतात्मा चौकात ‘रिडल्स’वरून मोर्चा काढला होता. मोर्चानंतर त्यावेळी मुंबईचे महापौर असणार्‍या छगन भुजबळ यांनी ‘हुतात्मा चौकाचे’ शुद्धिकरण केले होते.

शिवसेनेने घालून दिलेला हा पायंडा आजही कायम आहे. २०२१ मध्ये भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले. तेव्हादेखील असाच प्रकार घडला. यावर्षी एप्रिल महिन्यात संभाजीनगरमध्ये झालेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनंतर असेच घडले. एकीकडे जी-२०चे अध्यक्षपद भारताला मिळाले असल्याचे गौरवाने सांगायचे आणि दुसरीकडे असे बुरसटलेले विचार घेऊन जनतेसमोर जायचे, याला काय म्हणणार. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतराळात भारताचा वेगळा ठसा उमटवत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्यांचे प्रमुखपद भारतीय भूषवित आहेत.

इतकेच काय जवळपास २०० वर्षे भारतीय उपखंडात राज्य करणार्‍या ब्रिटनचा पंतप्रधान भारतीय असल्याचा सार्थ अभिमान सर्वांनाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकाची करण्याचा तसेच भारताला ‘विश्वगुरू’ करण्याचा संकल्प सोडलेला असताना त्यांच्या भाजपासह इतर पक्षांतील राजकारणी बुरसटलेल्या विचारसरणीला चिकटून बसलेले पाहायला मिळत आहेत. आपण नक्की कुठे जात आहोत? शेतकर्‍यांच्या, सर्वसामान्य नोकरदारांच्या, गरिबांच्या अडीअडचणींशी काहीएक देणेघेणे या राजकारण्यांना नाही. नागरिकांना गृहीत धरले जाते. ‘तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार? त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय; जुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के…’ असे विंदांनी म्हटले असले तरी आता सर्वसामान्य मतदारांनी जागृत होऊन अशा बुरसटलेल्या विचारांच्या राजकारण्यांचेच ‘शुद्धिकरण’ केले पाहिजे.

- Advertisment -