घरसंपादकीयअग्रलेखएकतर्फी कारवाईचा बाउन्सर

एकतर्फी कारवाईचा बाउन्सर

Subscribe

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी वार्षिक करारात समावेश झालेल्या क्रिकेटपटूंची नावे जाहीर केली. या वार्षिक कराराच्या यादीतून मिडल ऑर्डर बॅटर श्रेयस अय्यर आणि विकेट किपर बॅटर इशान किशन या दोघांची नावे वगळण्यात आली आहेत. बीसीसीआयच्या आदेशाचे पालन न केल्याचा फटका या दोघांनाही बसला आहे. बीसीसीआयने श्रेयस आणि इशान या दोघांनाही रणजी स्पर्धेत आपापल्या स्थानिक संघांकडून खेळण्याचे आदेश दिले होते, परंतु या दोघांनीही बीसीसीआयच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वीच रणजी स्पर्धेत न खेळणार्‍या क्रिकेटपटूंवर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईवरून क्रिकेट विश्वात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. अनेक बुजूर्ग खेळाडूंनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काहींनी स्टार क्रिकेटपटूंना वगळत बीसीसीआयने केवळ श्रेयस, इशानवर कारवाईचा एकतर्फी बाउन्सर मारल्याचा सूर आळवला आहे. कारवाई करायची असेल तर नियम सगळ्यांना सारखेच लागू झाले पाहिजेत, असे म्हणणार्‍यांचा अंगुलीनिर्देश प्रामुख्याने हार्दिक पंड्या, रोहित आणि विराटकडे आहे.

- Advertisement -

सत्तर-ऐंशीच्या दशकात पांढर्‍या चेंडूने 50-50 षटकांच्या एकदिवसीय क्रिकेटचा खेळ सुरू झाल्यापासून लाल चेंडूने खेळल्या जाणार्‍या कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी होत गेले. 5 दिवस खेळला जाणारा कसोटी सामना म्हणजे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची कौशल्ये, सहनशक्ती, खेळण्याच्या क्षमतेची सर्वसमावेशक चाचणी मानली जाते, परंतु एका दिवसात निकाल देणार्‍या एकदिवसीय क्रिकेटने कसोटी क्रिकेटची क्रेझ कमी केली. टी-20 क्रिकेटचा शिरकाव झाल्यापासून तर क्रिकेटला मनोरंजनाची फोडणी मिळाली. 4 तासांत झटपट निकाल आणि त्यानंतर नाईट पार्ट्यांची धमाल.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) धुवाँधार गेमसोबत नेम आणि फेम मिळवा हे नव्या पिढीतील क्रिकेटपटूंचे नवे सूत्र बनले आहे. एखादा बॅटर किंवा बॉलर कितीही नवखा असला तरी त्याला कुठल्याही संघाकडून किमान 25 लाखांची बेस प्राईज मिळतेच मिळते. त्याउपर जर त्याच्यावर बोली लागली तर सोने पे सुहागा. हा खेळाडू थेट कोटी कोटींचे इमले रचू लागतो. देशांतर्गत क्रिकेट संघात संधी मिळो न मिळो आयपीएलचे एक-दोन सीझन जरी खेळायला मिळाले तरी आयुष्य सार्थकी लागले. बँक खात्यात पैसा, गाडी-बंगला सर्वकाही आले, अशी भावना उदयोन्मुख क्रिकेटपटूंमध्ये रूजत चालली आहे. त्यातूनच रणजी स्पर्धा, मुश्ताक अली किंवा विजय हजारे आदी स्पर्धांमधून खेळण्यास हे क्रिकेटपटू नाक मुरडतात.

- Advertisement -

मुंबई इंडियन्स या आयपीएल संघातून थेट भारतीय संघाची कवाडे उघडलेल्या अनेक खेळाडूंपैकी इशान किशन हा एक. आंतरराष्ट्रीय टी-20, एकदिवसीय आणि कसोटीतही उत्तम प्रदर्शन करूनही अंतिम अकरात संधी मिळत नसल्याने तो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा सोडून मायदेशी परतला. खरेतर त्याच्यावर तेव्हाच बेशिस्तीची कारवाई होणे अपेक्षित होते, परंतु बीसीसीआयने त्याच्या वैयक्तिक कारणांचा हवाला देत वेळ मारून नेली, मात्र तेव्हापासून इशान क्रिकेटपासून दूरच आहे, तर सातत्याने दुखापतींना सामोरा जाणार्‍या श्रेयस अय्यरवर काही दिवसांपासून बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) उपचार सुरू होते. उपचारानंतर श्रेयसने देशांतर्गत क्रिकेट खेळून आपला फिटनेस आणि परफॉर्मन्स सिद्ध करावा, अशी बीसीसीआयची अपेक्षा होती. त्यानुसार बीसीसीआयकडून श्रेयससह इशानलादेखील रणजी स्पर्धेत खेळण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार इशानने झारखंड आणि श्रेयसने मुंबई संघातून रणजी सामने खेळणे अपेक्षित होते, परंतु दोघांनीही त्याला बगल दिली.

इशानने तर थेट अहमदाबादमध्ये जात आगामी आयपीएलच्या तयारीसाठी हार्दिक पंड्यासोबत सराव सुरू केला. आता बघा बीसीसीआयने २०१८ पासून भारताच्या कसोटी संघाचा भाग नसलेल्या हार्दिक पंड्याला अ श्रेणीत कायम राखले आहे. आपले शरीर कसोटीसाठी साथ देत नसल्याने कसोटी संघ निवडताना आपल्या नावाचा विचार करू नये, अशी विनंती यापूर्वी हार्दिकने बीसीसीआयला केली होती. हे ठीक मानले तरी हार्दिक किंवा त्याच्यासारख्या इतर क्रिकेटपटूंना लाल चेंडूंचे (रणजी स्पर्धा) सामने खेळायचे नसतील, तर किमान त्याने पांढर्‍या चेंडूंच्या (मुश्ताक अली किंवा विजय हजारे) स्थानिक स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला काय हरकत आहे? दुखापतीतून सावरल्यावर हार्दिकलाच थेट आयपीएलमध्ये खेळण्याची मुभा का? ही जय शहांची कृपा की अमित शहांचा वरदहस्त असल्याचा परिणाम? याचाही उलगडा व्हायला हवा.

सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, युझवेंद्र चहल यांसारख्या काही अनुभवी खेळाडूंनाही वार्षिक करारातून डच्चू मिळाला आहे, परंतु हे तिघेही आपापल्या संघाकडून रणजी सामने खेळत आहेत. तब्बल 3 मोसम देशांतर्गत क्रिकेट गाजवल्यानंतर आता कुठे सर्फराज खानला भारतीय संघाची दारे उघडली आहेत. अशा वेळी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांसारखे प्रमुख खेळाडू विश्रांतीवर असताना त्यांनाही संघात परतण्यासाठी रणजीत अथवा स्थानिक स्पर्धेत खेळणे सक्तीचे का केले जात नाही, असा प्रश्नही उपस्थित होतो. बीसीसीआयने भारतीय संघाचा भाग नसताना रणजी किंबहुना देशांतर्गत स्पर्धा खेळणे प्रत्येकासाठी अनिवार्य केले पाहिजे. स्टार खेळाडूही यातून अपवाद नसावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -