राणे-शिंदे संघर्षाची नांदी !

संपादकीय

भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने महाराष्ट्र पुन्हा ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले असले तरीदेखील आज ज्याप्रकारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते व सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे कान उपटले आहेत ते पाहता राज्यात शिंदे गटाची आणि भाजपची वाटचाल जेवढी दाखवण्यात येत आहे तेवढी आलबेल आणि सुखकर नक्कीच नाही हे यातून स्पष्ट होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊन आठवडा होत नाही तोच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्चस्वातून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि भाजपचे मातब्बर नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव यांच्यात वादाच्या ठिणग्या झडू लागल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच त्यांचे दोन्ही चिरंजीव निलेश राणे आणि नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेशी कट्टर हाडवैर आहे. नारायण राणे आणि मातोश्री यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे.

किंबहुना, याच शिवसेना विरोधावर अथवा उद्धव ठाकरे यांच्या कडव्या विरोधामुळेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नारायण राणे यांना केंद्र सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्रीपद बहाल केले आहे. राणे यांच्या अत्यंत कडव्या ठाकरे विरोधाबद्दलची ही बक्षिसी असल्याचे म्हटल्यास ते अतिशोयोक्ती वाटू नये. त्यात नोव्हेंबर २०१९ पासून महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून नारायण राणे यांचा भाजपमधील आवाज हा चांगलाच वाढला होता. मात्र राणे यांचे दिल्ली दरबारी वाढलेले वजन महाराष्ट्र भाजपमधील चाणक्यांना पचनी पडलेले दिसत नाही. त्यातच आता शिवसेनेतून बाहेर पडून अथवा उठाव करून भाजपबरोबर युती करून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या थेट मुख्यमंत्रीपदावर जाऊन बसले आहेत. नारायण राणे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते मराठा समाजाचे आक्रमक आणि फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. मात्र राणे यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे हे अजून तरुण आहेत आणि त्यात आता भाजपच्या तसेच केंद्रीय नेतृत्वाच्या पाठबळावर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील आहेत.

नारायण राणे हे केवळ ठाकरे विरोध जाहीरपणे करत आले, मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच राहून शिवसेनेचेच तब्बल ३९ आमदार आठ दहा खासदार तसेच ठाणे जिल्ह्यातील महापालिका अशी संस्थाने एकापाठोपाठ एक खालसा करण्याचा धडाकाच लावला आहे. त्यामुळे दिल्लीच्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास सद्य:स्थितीत नारायण राणे यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिक जवळचे आहेत. शिवसेनेची तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातील ताकद कमी करायची तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला नारायण राणे यांच्याऐवजी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अधिक उपयुक्त ठरत आहेत.

तसेच नारायण राणे यांना जरी कोकणचा राजा असे समजण्यात येत असले तरी प्रत्यक्षात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये राजकीय वर्चस्वात शिवसेना ही नारायण राणे यांच्या होम पिचवरच त्यांच्यापेक्षा अधिक पटीने पुढे आहे. एकनाथ शिंदे यांना जरी ठाणे जिल्ह्याचे नेते म्हणून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शिंदे यांनी केवळ ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र येथील आमदार आणि खासदारदेखील स्वतःच्या गटात घेऊन भाजपला स्वतःची उपद्रवक्षमता सिद्ध करून दाखवली आहे.

आज नारायण राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार निलेश राणे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते व सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेत अप्रत्यक्षपणे केसरकर यांच्या माध्यमातून शिंदे गटाला त्यांच्या लिमिटमध्ये राहण्याचा सूचक इशारा दिला आहे. त्याचबरोबर केसरकर यांना उद्देशून तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात आमचे म्हणजेच भाजपचे नाहीत असे स्पष्टपणे सुनावून भाजप आणि शिंदे गट यांची या पुढची वाटचाल ही दोन्ही पक्षांमध्ये सत्तेसाठी युती असली तरी देखील स्वतंत्रपणे राहील असेच सुचित करणारे आहे.

अगदी मोजक्या शब्दात सांगायचे झाले तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर संपुष्टात आणण्याच्या मोबदल्यातच एकनाथ शिंदे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद दिले असावे, असा संशय बळवण्यास येथे बराच वाव आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्याबरोबर उठाव करणार्‍या शिवसेनेच्या ३९ आणि अपक्ष ११ अशा ५० आमदारांच्या पाठबळाचा वारंवार उल्लेख करत असले तरीदेखील भाजपच्या ११५ आमदारांच्या भक्कम पाठबळावरच एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद टिकून आहे हे देखील यातून भाजपच्या नेत्यांनी शिंदे यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. त्यामुळे राणे यांचे चिरंजीव आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यात आजचा वाद हा वरकरणी वाटत असला तरी देखील भविष्यातील राणे-शिंदे यांच्यातील उघड संघर्षाची ही नांदी समजायला हरकत नाही.

केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी आपल्याच पक्षातील प्रमुख आणि प्रभावशाली असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना दुय्यम पद देऊन बाहेरून आलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले, याला अनेक कारणे आहेत. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून रोखले. त्यामुळे स्वत: फडणवीस आणि त्यांना मानणारे सहकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले. नागपुरात फडणवीसांच्या होम पिचवर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची विजययात्रा काढण्यात आली, त्यावेळी फडणवीसांच्या अभिनंदनाचे जे बॅनर्स लावण्यात आले, त्यातून भाजपचे चाणक्य अमित शहा यांचा फोटो गायब होता. त्यातून फडणवीसांचा अमित शहा यांच्यावरील राग दाखवून देण्यात आला होता.

महाराष्ट्रात राजकारणात मराठा जातीच्या व्यक्तीचा मोठा प्रभाव असतो, ती व्यक्ती जनमत आपल्याकडे खेचू शकते. त्यामुळे त्यांचा आपल्याला हवा तसा उपयोग करून घेता येईल, याची कल्पना भाजपच्या केंद्रातील नेत्यांना आहे. पण हे करताना त्यांच्याच पक्षांतील नेत्याला त्यांना नाराज करावे लागत आहे. त्यात पुन्हा आता बाहेरून भाजपमध्ये आलेले राणे आणि शिंदे यांच्यातील स्पर्धा वाढत जाणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपच्या केंद्रीय नेत्यांना महाराष्ट्रातील हा राजकीय जांगडगुत्ता हाताळणे वाटत तितके सोपे नाही, हेच राणे यांनी केसरकर यांच्यावर केलेल्या बोचर्‍या टीकेतून दिसून येत आहे. फडणवीसांना डावलल्यामुळे आपले दुखावले आहेत आणि त्याचसोबत आता बाहेरून आलेले डोईजड झाले तर परिस्थिती अधिक अवघड होऊन बसेल.