घरसंपादकीयअग्रलेखहिंदुत्वाच्या मुद्यावरून राजकीय आक्रोश!

हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजकीय आक्रोश!

Subscribe

महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी रविवारी मुंबईत हिंदुत्ववादी संघटनांकडून हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागातही हिंदू जनआक्रोश मोर्चे निघाले होते. त्यानंतर मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. मोर्चात भाजपसह शिंदे गटातील अनेक बडे नेते आघाडीवर असल्याने हिंदुत्ववादी संघटनांना भाजपकडून बळ दिलं जात असल्याचं दिसून आलं असून हिंदुत्वाच्या मुद्यावर राज्यात विशेषतः मुंबईत उद्धव ठाकरे गटाला अडचणीत आणण्याची भाजपची खेळी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर खरं हिंदुत्व कुणाचं यावरून ठाकरे गट विरुद्ध भाजप आणि शिंदे गटात चढाओढ सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपशी साथ सोडून महाविकास आघाडीच्या सहकार्याने मुख्यमंत्रीपद घेतल्यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात हिंदुत्वाच्या मुद्यावरून नेहमीच आक्रमक भूमिका घेतली होती. सत्तेसाठी ठाकरेंनी हिंदुत्वाला बगल दिल्याचा भाजपकडून सातत्याने आरोप होत आहे. सत्तांतर झाल्यानंतर तर शिंदे गटाकडूनच ठाकरेंवर हिंदुत्वाच्या मुद्यावर नेहमीच टीका होऊ लागली. त्यामुळे भाजपला ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी एक समर्थ गट मिळाला. सत्तेवर आल्यानंतर भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. वसईतील श्रद्धा वालकर हत्यांकाडाने त्याला बळकटी मिळाली.

- Advertisement -

भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तर राज्यात आंतरधर्मीय विवाहांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे जाहीर करून भाजपचे मनसुबे उघड केले होते. श्रद्धा वालकर हत्याकांडाची घटना ताजी असताना वसईत टीव्ही मालिका अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या घडली. तिचा प्रियकर आणि सहकारी कलाकार शिजान खानला आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास दिल्ली पोलिसांनी केला. तपासात लव्ह जिहादचा कुठलाही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. भाजप नेत्यांनी श्रद्धा वालकरच्या वडिलांना सोबत घेऊन लव्ह जिहादमुळेच तिची हत्या झाल्याचा दावा करत तपासाची मागणीही केली होती, पण लव्ह जिहादचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. तुनिषा शर्मा आत्महत्येतही लव्ह जिहादचा कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही.

असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढू लागल्या आहेत. या मोर्चांमध्ये भाजपचे नेतेच अग्रभागी असल्याचं दिसत आहे. रविवारी मुंबईत जोरदार मोर्चा निघाला. त्यात भाजपसोबत शिंदे गटाचे नेते प्रामुख्याने अग्रभागी होते. राज्यात लव्ह जिहाद प्रकरणे वाढत आहेत. हिंदू मुलींचं धर्मांतर करून फसवणूक आणि शोषण केले जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांचा आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठोर कायदा करून लव्ह जिहाद आणि सक्तीने धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची आग्रही मागणी आहे. हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून हिंदुत्वाचे खरे पुरस्कर्ते आपणच असल्याचं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मोर्चात बहुतेक नेत्यांनी ठाकरेंनाच टार्गेट केल्याचं दिसून आलं. हिंदू जनआक्रोश मोर्चापासून ठाकरे गटाने दूरच राहणं पसंत केलं. त्यावरूनही भाजपकडून ठाकरेंवर टीका केली गेली.

- Advertisement -

भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा नेमका आगामी मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोरच ठेवून उकरून काढल्याचा आरोप आहे. केंद्रात गेली आठ वर्षे भाजपचं सरकार आहे. राज्यातही शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं, पण तरीही राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा अंमलात आला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. गेल्या आठ वर्षांत केंद्रात नरेंद्र मोदी-अमित शहा यांचं प्रखर हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहे. आता राज्यातही भाजपचं सरकार आहे. तरीही हिंदुत्व खतरे में म्हणण्याची वेळ हिंदूंवर आली आहे, पण एखाद्या निवडणुकीचे बिगुल वाजले की भाजपशासित राज्यांमध्ये अचानक हिंदू खतर्‍यात येण्याची हालचाल सुरू होते.

गुजरात, उत्तराखंड, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांमध्ये हिंदुत्व खतर्‍यात येत असेल तर तेथील सत्ताधार्‍यांचा दोष आहे, असा थेट आरोप ठाकरे गटाने केला आहे. हिंदू जनआक्रोश हा प्रकार फक्त निवडणुका किंवा राजकीय फायद्यासाठीच असेल तर ती हिंदुत्वाशी बेईमानी ठरेल, असा टोलाही ठाकरे गटाने भाजपला लगावला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना मोदी सरकारने प्रजासत्ताक दिनी पद्मविभूषण पुरस्कार दिल्यानंतर ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला आहे. राम मंदिरासाठी कारसेवक गेले त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी हिंदू कारसेवकांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. त्या मुलायमसिंह यांना तेव्हा मौलाना मुलायम अशी उपमा दिली गेली होती. त्याच मुलायमसिंह यांचा केलेला गौरव हिंदुत्वाचा आणि कारसेवकांच्या बलिदानाचा अवमान असल्याची टीका करत ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधण्याचं काम केलं आहे.

मुंबईतील हिंदू जनआक्रोश मोर्चानंतर आता भाजप-शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात हिंदुत्वाच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे. हिंदू जनआक्रोश मोर्चात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे नेते अग्रभागी होते. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांची लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी प्रत्यक्षात मान्य होईल का हे येत्या काही दिवसांत दिसून येईलच. ही फक्त राजकीय खेळी आहे का हेही त्यावेळी समोर येईल. लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टानेही काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. धर्मांतराचा मुद्दा गंभीर आहे. आमिष दाखवून धर्मांतर करण्याचे निरनिराळे मार्ग आहेत, पण त्याबाबत राजकारण करू नये, असे मत गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं होतं. सक्तीचे धर्मांतर हा फक्त गंभीर मुद्दाच नाही, तर त्यामुळे देशाच्या सुरक्षेवरही परिणाम होत असल्याची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली होती. या पार्श्वभूमीवर हिंदू जन आक्रोश मोर्चानंतर सरकारची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -