पोटनिवडणुकीचा धडा…

संपादकीय

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत अनुक्रमे काँग्रेस आणि भाजप, तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. चिंचवडची जागा ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आले असले तरी हा विजय निर्भेळ मानता येणार नाही. महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली नसती तर ही जागा सहजपणे खिशात घालणे शक्य झाले असते. कसबा या आपल्या पारंपरिक मतदारसंघात झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असल्यास आश्चर्य वाटणार नाही. सन १९९५ पासून ते २०१९ पर्यंत सलग अडीच तप कसबा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिला आहे. विद्यमान खासदार गिरीश बापट सलग पाचवेळा, तर २०१९ मध्ये मुक्ता टिळक चांगल्यापैकी मताधिक्याने तेथून निवडून आल्या आहेत.

त्यांच्या निधनामुळे कसबा आणि भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवडची पोटनिवडणूक झाली. प्रथेप्रमाणे या दोन्ही जागा बिनविरोध निवडून देण्यासाठी भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीकडे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा दाखला देत रदबदली करण्याचा प्रयत्न केला, परंतु राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्याला प्रतिसाद न देता उलट पंढरपूर पोटनिवडणुकीचा दाखला दिल्याने दोन्ही ठिकाणी निवडणुका झाल्या. भाजपकडून चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना रिंगणात उतरविण्यात आले, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने नाना काटे (राकाँ) यांना तिकीट दिले. गतवेळी लक्ष्मण जगताप यांना जोरदार लढत देणारे राहुल कलाटे अपक्ष म्हणून उभे राहिले. या ठिकाणी भावनिक मुद्दा फारसा उपयोगी पडला नसल्याचे काटे आणि कलाटे या पराभूत उमेदवारांच्या एकत्रित मतांमुळे लक्षात येते.

कसबा मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या पतीला तिकीट दिले जाईल अशी भाजपसह या मतदारसंघावर प्रभाव असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची अटकळ होती. प्रत्यक्षात तेथे हेमंत रासने या फारसा जनसंपर्क नसलेल्या उमेदवाराला निवडणुकीत उतरविण्यात आले. येथे विजय मिळणार अशा आविर्भावात असणार्‍या भाजपची महाविकास आघाडी समोर उभी ठाकल्यावर तारांबळ उडाली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांनी कसबा मतदारसंघ ढवळून काढण्यास सुरुवात केली, मात्र महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (काँग्रेस) यांना विजयापासून रोखण्यास भाजप आणि शिंदे यांची शिवसेना सपशेल अपयशी ठरली. या मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटण्याबरोबर दहशत माजवत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला गेला.

एका सुशिक्षित मतदारसंघात मतदारांना हा अनपेक्षित अनुभव असल्याची चर्चा सुरू होती. भाजपचे नेते गाफील राहिले आणि मतदारांच्या नाराजीचा फटका या पक्षाला बसला. रुग्णशय्येवर असलेल्या गिरीश बापट यांच्यासारख्या नेत्यालाही प्रचारात उतरविण्याचा घडलेला प्रकार मतदारांच्या पचनी पडला नाही. या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालेला असताना भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षापुढे महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळविण्याचे उद्दिष्ट असल्याचे कोल्हापुरातील सभेत ठणकावून सांगितले. प्रत्यक्षात अवघ्या काही दिवसांतच भाजपला हक्काच्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीतील कुरबुरी पथ्यावर पडल्याने ती जागा राखता आली इतकेच काय ते समाधान! यापुढे आपल्याला कुणालाही गृहीत धरता येणार नाही हा या पोटनिवडणुकीने भाजपला घालून दिलेला धडा असल्याचे मानले तर ते चुकीचे ठरणार नाही.

भाजपच्या बालेकिल्ल्यात कसब्यात त्या पक्षाला धूळ चारल्याचा आनंद निश्चितच महाविकास आघाडीला झाला असेल. त्यात उभारीसाठी संघर्ष करीत असलेल्या काँग्रेससाठी तर आपल्या उमेदवाराचा विजय दिलासा देणारा ठरला आहे. गेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात दोन जागा जिंकण्याची करामत काँग्रेसने केली होती. दोन्ही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र किंवा एकदिलाने लढले तर चमत्कार घडू शकतो हेही या पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे शत प्रतिशत भाजप या समजुतीत असलेल्या त्या पक्षाच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करणे भाग पडणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणाने अक्षरश: खालची पातळी गाठलेली असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह खेचून घेण्याचे केलेले राजकारण कट्टर शिवसैनिकांप्रमाणे भाजप आणि शिंदे विरोधकांनाही पसंत पडलेले नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत.

त्यापूर्वी कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. लागोपाठच्या विजयाने आत्मविश्वास दुणावलेली महाविकास आघाडी त्वेषाने रिंगणात उतरणार याबद्दल कुणाच्या मनात शंका नसेल. ‘विजयासाठी वाट्टेल ते’ या मानसिकतेत असणार्‍या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून महाआघाडीला सुरूंग लावण्याचा प्रयत्न होणार ही शक्यता नाकारता येणार नाही. महाविकास आघाडीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आतुर झालेली आहे. शिंदे आणि ठाकरे गटातील वाद सर्वोच्च न्यायालयात असल्याने तेथे कोण बाजी मारणार यावरही महाराष्ट्रातील पुढील राजकारण अवलंबून आहे. चिंचवड आणि कसबा येथून निवडून आलेल्या आमदारांना जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळणार आहे, परंतु भाजपला हक्काच्या घरात घुसून दिलेली धोबीपछाड महाविकास आघाडीचे मनोबल वाढविणारी असून यापुढे एकोप्याने निवडणूक लढवावी लागेल हा धडाही महाविकास आघाडीला चिंचवडमधून मिळाला आहे.