शिक्षणप्रसारक, समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील

Karmveer Bhaurao Patil

भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांमध्ये झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.

नंतर 1९३२ मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ भाऊरावांनी पुणे येथे ‘युनियन बोर्डींग’ची स्थापना केली. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. १९३५ मध्ये ‘महात्मा फुले अध्यापक विद्यालय’ त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते.

त्यानंतर सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्वाचे सदस्य होते. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी त्यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला.

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतीगृहामध्ये विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरीत्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत यातून भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता याचा संदेश दिला. शिक्षण क्षेत्रात राज्याचे नाव सातासमुद्रापलीकडे नेण्याचा पहिला मान त्यांनाच जातो. अशा या थोर समाजसुधारकाचे 9 मे १९५९ रोजी निधन झाले.