Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड डास बोध : डेंग्यूपेक्षा व्यवस्थेचा डंख घातक!

डास बोध : डेंग्यूपेक्षा व्यवस्थेचा डंख घातक!

Subscribe

राज्यभरात डेंग्यूने थैमान माजवले आहे. डासांचे निर्मूलन करण्यात महापालिकांची व्यवस्था अपयशी ठरत आहे, तर दुसरीकडे रुग्णांचा खर्च वाचवण्यात वैद्यकीय व्यावसायिकांना रस नाही. किंबहुना डेंग्यूच्या नावाने काही डॉक्टरांनी तर अक्षरशः ‘धंदा’ मांडला आहे. सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या काही डॉक्टर्समुळे रुग्णांचा वैद्यकीय व्यवसायावरील विश्वास टिकून आहे, पण त्या विश्वासावर पाणी फिरवत काहींनी वैद्यकीय व्यवसायाची वाट लावणे सुरू केले आहे. अशा अपप्रवृत्तीविरुद्ध आता वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांनीच पुढे येणे गरजेचे आहे.

डेंग्यूच्या रुग्णांनी जवळपास सगळीच रुग्णालये व्यापली आहेत. महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींच्या लेखी जेवढे डेंग्यूचे रुग्ण आहेत, त्यापेक्षा किमान दहा पट जास्त रुग्ण शहरासह ग्रामीण भागात आहेत. प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अजूनही ठिकठिकाणचा कचरा हटलेला नाही आणि जागोजागी घाण पाण्याची डबकी, उघडे ड्रेनेज दिसतात. त्यातच पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेने ज्या काही प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे केल्या पाहिजे, त्या कधीच होत नाहीत आणि अर्थातच यंदाही तसेच झाले. हे सर्व वातावरण डासांच्या फार मोठ्या प्रमाणातील निर्मितीला, जंतूसंसर्गाला व रोगराईला पोषक आहे. त्याचा कमी-अधिक फटका दरवर्षी असंख्य नागरिकांना बसतो.

सद्यस्थितीत जेवढे डेंग्यूचे रुग्ण आहेत, त्याच्या २५ टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांची नोंद पालिकेकडे होत आहे. अजूनही डेंग्यू रुग्णांची परिणामकारक नोंदणी शहरातील रुग्णालयांमार्फत पालिकेकडे होत नाही व पालिकेकडूनही त्याची अपेक्षेप्रमाणे पोच मिळत नाही. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ‘डेंग्यू रिपोर्टिंग’ होऊनही त्याचा पालिकेकडून फारसा उपयोग करून घेतला जात नाही. डेंग्यूचे रुग्ण ज्या भागात, वस्त्यांमध्ये वाढल्याचे स्पष्ट होते, त्या भागात पालिकेकडून प्रभावी व तत्पर उपाययोजना न होता केवळ औपचारिकता पार पाडली जाते. अनेक ठिकाणी तर धूर फवारणीची चमकेगिरी केली जाते. मुळात धूर फवारणीला शास्त्रीय आधारच नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या अहवालानुसार मोकळ्या ठिकाणी धूर फवारणी केल्यास त्याचा परिणाम डास मरण्यावर होत नाही.

- Advertisement -

अशा फवारणीनंतर डास इतरत्र निघून जातात. धूर फवारणी केवळ बंदिस्त हॉलमध्येच यशस्वी होऊ शकते. असे असतानाही सर्रासपणे धूर फवारणी करून राज्यभरात कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येते. माहिम रेसिडेंट्स ग्रुपने केलेल्या सर्व्हेतूनही धूर फवारणीमुळे डास आणि डासांच्या अळ्या नष्ट होत नसल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. याउलट धूर फवारणीमुळे मेंदू व श्वसनाचे आजार उद्भवू शकतात, असाही चिंताजनक निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील महापालिकांनी धूर फवारणी पूर्णत: बंद करून औषध फवारणीवर जोर दिल्यास त्याचा चांगला परिणाम दिसू शकेल.

डासांचे निर्मूलन करण्यासाठी डास उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आल्यास उत्पत्तीला अटकाव होऊ शकतो. एक गप्पी मासा २४ तासांत २५ ते ५० डास फस्त करतो. त्यामुळे गप्पी मासे हे डास निर्मूलनासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. अर्थात डास निर्मूलन ही केवळ पालिकेचीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी व्हायला हवे. स्वत:च्या घरासह परिसर स्वच्छ ठेवणे, डासांपासून संरक्षण करणे, पाणी साचू न देणे, कोरडा दिवस पाळणे या बाबी प्रत्येकानेच पाळायला हव्यात.

- Advertisement -

डेंग्यू निर्मूलनात पालिकांची यंत्रणा कार्यरत असताना दुसरीकडे खासगी रुग्णालयांनी डेंग्यूला ‘कॅश’ करण्यास सुरुवात केली आहे. खरेतर डेंग्यूचे रुग्ण आढळल्यास त्याची माहिती वैद्यकीय विभागाला कळवणे गरजेचे असते, मात्र ती कळवण्यास डॉक्टरांकडूनच टाळाटाळ केली जाते. दुसरीकडे हेच डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना रक्ताच्या अहवालाचा दाखला देत पेशींची संख्या कमी झाल्याने डेंग्यूची शक्यता असल्याचे ठामपणे सांगताना दिसतात. डेंग्यूचा डास केवळ माणसाच्या शरीरालाच चावतो, पण काही डॉक्टर्स डेंग्यूच्या नावाने माणसाच्या खिशाला आणि विश्वासालाच चावा घेत असल्याचे दुर्दैवी चित्र राज्यात सर्वत्र दिसतेय.

अनेक ठिकाणी डेंग्यू विषाणूंची चाचणी करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. तरीही काही डॉक्टर एनएस-१ ही प्राथमिक रक्त तपासणी अवघ्या पाच मिनिटांत करून मोकळे होतात. नियमानुसार डेंग्यूबाबतच्या रक्ततपासण्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतच केल्या जातात. त्यानंतर रुग्णाला डेंग्यू झाला किंवा नाही याचे निदान होते. प्रत्यक्षात मात्र या तपासणी अहवालाची वाट न पाहताच बहुतांश डॉक्टर एनएस-१च्या आधारेच डेंग्यूचे निदान करतात. साधा ताप आला तरी डेंग्यूच्या भीतीपोटी रुग्ण गरज नसतानाही रुग्णालयात दाखल होतात. पहिल्या पाच दिवसांत एनएस-१ चाचणी घेतली की अहवाल पॉझिटिव्ह मिळतो. त्या आधारे डेंग्यू झाल्याचे जाहीर करून उपचार केले जातात. या चाचणीसाठी पाचशे ते आठशे रुपये आकारले जातात. खरेतर एनएस-१ चाचणीच्या आधारे कुणी डेंग्यूचे निदान करत असेल तर तो गंभीर गुन्हा ठरू शकतो, पण रुग्णांच्या वैद्यकीय अज्ञानाचा फायदा घेत अशा चाचण्यांच्या आधारे थेट निदान केले जाते.

आयजीएम चाचणीत सॅम्पल पॉझिटिव्ह आल्यास आणि प्लेटलेट्स ५० हजारांपर्यंत आल्यास डेंग्यूचे निदान होऊ शकते, मात्र डेंग्यूविषयी समाजात निर्माण झालेल्या भीतीला ‘कॅश’ करण्याचे काम अनावश्यक तपासण्यांतून होत आहे. या आजारावरील उपचाराचा या मंडळींनी अक्षरश: ‘धंदा’ मांडला आहे. पैशांचा धंदा झाला की नीतीमत्तेची गणिते कोलमडून पडतात. पैसा कमावणे हेच एक ध्येय ठरते आणि ते गाठण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब निषिद्ध ठरत नाही. डेंग्यूच्या बाबतीतही तसेच होत आहे. डेंग्यूची शंका येताच संबंधित वैद्यकीय व्यवस्था रुग्णाच्या प्लेटलेट्सवर लक्ष केंद्रित करते. निरोगी व्यक्तींमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण दर प्रतिघनमिली लिटरमागे दीड ते चार लाख असते. ते घसरल्यास एक-दोन दिवसांआड तपासावे लागते. हे प्रमाण अचानक एक लाखांखाली गेले तर रोज हे प्रमाण बघावे लागते. हे प्रमाण सहसा सातव्या दिवसापासून बघावे लागते. साधारणत: सातव्या दिवसापासून प्लेटलेट्सची संख्या वाढू लागते. गंभीर लक्षणे नसतानाही प्लेटलेट्स-काऊंट ५० हजारांपेक्षा कमी झाला तर रुग्णालयात दाखल होणे अपेेक्षित असते.

प्लेटलेट्सचे प्रमाण १० हजारांखाली घसरले तर प्लेटलेट्स दिल्या जातात. हे प्रमाण महत्त्वाचे असले तरी सर्व लक्ष केवळ त्यावरच केंद्रित करणे हेही चुकीचे आहे, मात्र प्लेटलेट थोड्याफार घटल्या की लगेचच रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याचा सल्ला दिला जातो. गंभीर बाब म्हणजे रुग्णाचा आरोग्य विमा असला तर बहुतांश डॉक्टर्सकडून त्याला दाखल करून घेतले जाते. किंबहुना अशा रुग्णांवर डेंग्यूच्या नावाने उपचार करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अर्थात आरोग्य विमा असल्यावर रुग्णही अ‍ॅडमिट होण्यासाठी स्वत: इच्छुक असतो. रक्त तपासणीनंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेचा अहवाल २४ ते ७२ तासांच्या विलंबाने प्राप्त होत असल्यामुळे रुग्ण अ‍ॅडमिट होऊन मोकळे होतात. हा अहवाल तातडीने प्राप्त होणे गरजेचे आहे. ई-मेलवर जरी हा अहवाल प्राप्त झाला तरी रुग्णावर त्या दिशेने उपचार सुरू करता येतात. डेंग्यूच्या अनेक रुग्णांना अशक्तपणा येतो, पण भरपूर पाणी, द्रवपदार्थ व विश्रांती यामुळे काही दिवसांनी अशक्तपणा दूर होतो.

काही डॉक्टर्स अशा रुग्णांना सलाईन लावतात. काही रुग्ण, आप्तेष्ट यांचा तसा दबाव असतो. खरेतर सलाईन म्हणजे फक्त मिठाचे निर्जंतुक पाणी असल्याने अशक्तपणा जात नाही, पण सलाईनने अशक्तपणा जातो, या गैरसमजाचा काही डॉक्टर्सही गैरफायदा घेताना दिसतात. तसेच आप्तेष्टांचा दबाव, विमा कंपन्यांचा कारभार यामुळेही काही डॉक्टर्स गरज नसताना सलाईन लावतात. रक्तदाब कमी होण्यासारखी गंभीर लक्षणे वा चिन्हे आढळली तर सलाईनची गरज असते, मात्र रुग्णांमधील गैरसमज निघून गेल्यास आपले खिसे कसे भरतील? हाही त्यामागील विचार असतो. हे सर्व थांबण्यासाठी याबाबतची समाजाची मानसिकता बदलायला हवी. डेंग्यूत एक टक्काच रुग्ण दगावतात हे प्रत्येकानेच लक्षात घ्यावे. किंबहुना डॉक्टरांनी अशा वेळी अधिक समजूतदार पालकाची भूमिका बजावणे अपेक्षित असते.

वैद्यकीय पेशाला समृद्ध असा इतिहास आहे. सेवाभावी वृत्तीच्या लोकांनी या व्यवसायाला समाजात आदराचे स्थान प्राप्त करून दिले आहे. आजही सेवाभावी वृत्तीने काम करणारे काही डॉक्टर्स या पेशाची प्रतिष्ठा उंचावत आहेत. त्यातूनच वैद्यकीय पेशाविषयीचा विश्वास दृढ आहे, मात्र काही खिसेेभरू डॉक्टर्स या विश्वासाला तडा देण्याचे, रुग्णांचे शोषण करण्याचे काम पद्धतशीरपणे करत आहेत. त्यामुळेच डेंग्यू डासाच्या डंखापेक्षा वैद्यकीय व्यवसायाचा आर्थिक डंख रुग्णांना धोक्याचा वाटत आहे. कोणतीही व्यवस्था शोषणावर आधारित असली तर त्या व्यवस्थेचे भवितव्य कधीच उज्ज्वल असू शकत नाही. त्यामुळेच पैसा मिळवताना आपण कुणाचे अधिकार, कुणाचे हक्क अथवा कुणाला न्याय तर नाकारत नाही ना, याची काळजी घेतली जाणे आवश्यक ठरते, अन्यथा विनाश जवळ आलाच म्हणून समजा!

डास बोध : डेंग्यूपेक्षा व्यवस्थेचा डंख घातक!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -