घरसंपादकीयओपेडड्रग्ज तस्करी: पोलीस, डॉक्टर्स अन् राजकारणी

ड्रग्ज तस्करी: पोलीस, डॉक्टर्स अन् राजकारणी

Subscribe

प्रभू रामाची नगरी म्हणून नावलौकीक असलेले नाशिक आता सर्व प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यासाठी ओळखले जातेय. या शहरात जितक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची राजरोसपणे विक्री होत असते, तितक्याच मोठ्या प्रमाणात एमडी, चरस, गांजा यांसारख्या अमली पदार्थांचीही विक्री होते. येथे केवळ अमली पदार्थांचा साठाच नव्हे, तर अमली पदार्थ तयार करणारे कारखानेच असल्याचे अलीकडे झालेल्या काही कारवायांवरून स्पष्ट होते. मुळात मुंबई पोलिसांना नाशिकमधील एमडीच्या कारखान्याचा छडा लागतो, मग नाशिक पोलिसांना हा अड्डा का माहिती असू नये? कोणाच्या आशीर्वादाने असे अवैध व्यवसाय चालतात, याचेही उत्तर आता प्रशासनाला द्यावे लागणार आहे.

गुलशनाबाद अशी एकेकाळी ओळख असलेले नाशिक फुलासारखेे शहर राहिलेले नाही. प्रशासकीय अनागोंदी आणि बरबटलेल्या भ्रष्टाचारामुळे हे शहर आता बकाल होऊ पाहत आहे. मुंबई आणि पुण्याला जोडणारे हे शहर असल्यामुळे सुवर्ण त्रिकोणातील महत्वाचा कोण म्हणून या शहराकडे बघितले जात होते, परंतु दोन मोठ्या शहरांमधील हाच सुवर्ण कोण आता नाशिककरांना बोचू लागलाय. द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिकचा लौकीक असल्यामुळे स्वाभाविकपणे वाईनरीजची संख्याही त्या प्रमाणात वाढली आहे. ही चांगली गोष्ट आहे की वाईट या प्रश्नाचे उत्तर नाशिकमध्ये राहणारेच सांगू शकतात. या वाईनरीजमध्ये तरुण- तरुणींचे जे घोळके झिंगत पडलेले दिसतात, ते बघता ‘वाईन कॅपिटल सिटी’ हे बिरुद नसून शाप आहे असा ग्रह होऊ शकतो.

‘एज्युकेशन हब’ म्हणूनदेखील आता नाशिककडे बघितले जात असल्याने सर्व शाखांचे विद्यार्थी येथे बघायला मिळतात. मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी यांसह अन्य महाविद्यालयांची मांदियाळी या शहरात आहे. त्यामुळे स्वाभाविकच, शिक्षणासाठी वसतिगृहांमध्ये वा खासगी रूम घेऊन राहणार्‍या मुला-मुलींची संख्याही मोठी आहे, पण या मुलांवर मर्यादा ठेवणारे, बंधने घालणारे त्यांचे आई-बाप येथे नसल्याने सर्रासपणे चारचाकी वाहनांमध्ये बसून ओल्या पार्ट्या रंगताना दिसतात. या पार्ट्या झाल्यानंतर लॉजेस बुक होतात. नदीकिनारी सिगारेटचे झुरके ओढणारे तरुण- तरुणी बघता ही खरंच कधी काळी रामाची नगरी असेल का, असा प्रश्न पडतो.

- Advertisement -

हे व्यसन केवळ सिगारेटपुरते मर्यादित राहत नाही. महाविद्यालयाचे आवार, मोकळे पटांगण अथवा उद्यानांमध्ये काही तरुण पांढर्‍या पावडरची भुकटी जीभेवर ठेवताना दिसतात. काही लोक नाकाने ती ओढताना दिसतात. हे ड्रग मेफेड्रॉन (एमडी) नावाचे असते. असे ड्र्ग्ज घेणार्‍यांचे डोळे आपसुक बारीक होतात. म्हणून या ड्रगला मॅव मॅव असा शब्द तरुणांमध्ये प्रचलित आहे. गंभीर बाब म्हणजे, शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडूनही हे रॅकेट चालवले जाते. हे ड्रग मुंबईत सर्रासपणे उपलब्ध असायचे, परंतु त्याचे प्रमाण वाढल्याने ते नाकोॅटीक्समध्ये गणले जाऊ लागले. परिणामी मेफेड्रॉनच्या अड्ड्यांवर मुंबई पोलिसांनी छापे टाकले. त्यानंतर संबंधित तस्करांनी नाशिकसारख्या छोट्या शहरांकडे आपला मोर्चा वळवला.

नाशिकमध्ये अशा ड्रग्जचे प्रमाण इतके वाढले की, त्याचा ‘वास’ मुंबई पोलिसांना आला. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नाशिकमधील एमडी निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत तब्बल ३०० कोटींपेक्षा अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. मुंबई पोलिसांना नाशिकच्या एमडीचा ‘वास’ येतो मग नाशिक पोलिसांना तो का येऊ नये? पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक, अमली पदार्थांचा शोध घेणारे श्वान, गुप्तवार्ता विभाग, गुन्हे शाखा, विशेष शाखा, राज्य गुप्त वार्ता विभाग हे काय करत होते? ‘अर्थपूर्ण’ संबंध हेच याचे उत्तर म्हणावे का? हे आणि असे अनेक प्रश्न पोलिसी व्यवस्थेला उघडे पाडतात. महत्त्वाचे म्हणजे राज्यभरात ड्रगचे रॅकेट चालवणारा माफिया ललित पाटील नाशिकचा आहे ही बाब नाशिक पोलिसांच्या लेखी नसणे हेदेखील नवल!

- Advertisement -

नाशिकमध्ये ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा शिंदे गावात ड्रग्ज कारखाना चालवत होता. भूषण पाटील हा केमिकल इंजिनीयर असून मेफेड्रॉन तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्यावर तो नाशिक एमआयडीसीमध्ये मेफेड्रॉन तयार करण्याचे काम करत होता. भूषण मेफेड्रॉन तयार करायचा, त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे त्याची वाहतूक करायचा, तर ललित पाटील प्रत्यक्ष डील करायचा, असा सगळा कारभार सुरू होता. ललितने व्यवसायाचे ठिकाण अतिशय सुरक्षीत निवडले होते. पुण्यातील ससून रुग्णालयातील कोठडीतून तो ड्रग्ज रॅकेट चालवत होता.

विशेष म्हणजे तो तब्बल ९ महिन्यांपासून ससूनमध्ये उपचार घेत होता. त्याला असा कोणता आजार झाला होता की, ९ महिन्यांपासून त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते? या प्रश्नाचे उत्तर आता ससून रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला द्यावे लागणार आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे ससूनची वैद्यकीय व्यवस्थादेखील याच रॅकेटचा एक भाग आहे हे येथे स्पष्ट होते. ललितची ऐयाशी बघता त्याच्याकडे इतका पैसा कोठून येत होता, असा साधा प्रश्नही व्यवस्थेतील कुणालाही पडू नये? आपल्याला सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी तो तब्बल ७० हजार रुपये दिवसाला खर्च करत होता. कैदी असतानाही त्याला ज्या सुविधा मिळत होत्या ते बघता पोलीस आणि वैद्यकीय विभाग हे दोन्ही त्याच्या कटकारस्थानात सहभागी होते, हे सांगण्यासाठी आता कुणा तज्ज्ञाची गरज नाही.

काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हे ड्रग्ज रॅकेट उघड करताना ललित पाटीलच्या दोन साथीदारांना २ कोटी रुपयांच्या मेफेड्रॉनसह अटक केली होती, मात्र त्याच्या दुसर्‍याच दिवशी ललित पाटील रुग्णालयातून पळून गेला, मात्र या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहता ललित हा ससून रुग्णालयातून पळत नाही, तर आरामात चालत निघून जाताना दिसत आहे. त्यामुळे तो पोलिसांना हिसका देऊन पळून गेला या पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्याचबरोबर ससून रुग्णालयातील अधिकार्‍यांची पळून जाण्यात त्याला मदत झालीय का, असाही प्रश्न विचारला जात आहे. ललितची त्याच वेळा चौकशी झाली असती, तर नाशिकमध्ये ड्रगचे रॅकेट चालवणारा त्याचा भाऊ भूषण आणि त्याचे साथीदार येथून सटकू शकले नसते. आज भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेला पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीतून अटक केली आहे. या अटकेनंतर या गुन्ह्याचे पाळेमुळे खोदून काढण्यात यश आले तर खाकीची इभ्रत वाचणार आहे. अन्यथा खाकीला लागलेला हा डाग यापुढे कधीही पुसला जाणार नाही, हे निश्चित!

ललितला ‘बळ’ देणार्‍यांचीही चौकशी व्हायला हवी. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे ललितच्या निवासस्थानी जाऊन गणपतीची आरती करून आले होते म्हणे. महापालिकेत जकातीचे खासगीकरण झाले तेव्हा हे काम ललितला देण्यात आले होते. त्यानंतर त्याने अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला होता. माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी महापौर विनायक पांडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगत ललितने सर्वत्र दहशत निर्माण केली होती. ही दहशत त्याला ड्रग माफिया होण्याच्या मार्गावर घेऊन गेली. ललित पाटीलचा मंत्री दादा भुसेंशी संबंध होता, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. इतका गंभीर आरोप जर अंधारे करत असतील, तर त्यातील बारकावे त्यांनी पोलिसांना द्यायला हवेत. तसेच ललित पाटीलला पळवून नेण्यात शिंदे गटाच्या मंत्र्याचा हात आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे. ललित ज्या पद्धतीने पोलिसांच्या तावडीतून सटकला ते बघता धंगेकरांच्या आरोपात तथ्य असल्याचे जाणवते.

ललितने आजवर असंख्य तरुणांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार, एमडीची नशा केल्यानंतर कमालीची उत्तेजना मिळते. या नशेत कुठलीही गोष्ट अशक्य नाही, असा आत्मविश्वास निर्माण होतो. अन्य कोणत्याही कारणाने एमडी उपलब्ध होत नाही, तेव्हा टोकाच्या नैराश्यातून व्यसनाधीन व्यक्तींनी आत्महत्याही केल्याच्या नाशिकमध्ये यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. हायप्रोफाई नशेबाजांना ड्रग्ज पुरवठा करण्यासाठी पेडलरचे रॅकेटही कार्यरत येथे कार्यरत आहे. यातील पुरवठादार एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घेते किंवा तेथील मुलींशी मैत्री करते. हळूहळू ती तिच्या इतर मित्रांशी संबंधित मुलींशी ओळख करून देते. मग या मित्रांबरोबर पार्ट्या चालतात. अनेकदा नशेमध्ये मुलींबरोबर लैंगिक संबंधही प्रस्थापित केले जातात. ही सगळी चंगळ करण्यासाठी मुलींना पैशांची गरज असते. अशा वेळी त्यांना अक्षरश: वेश्या व्यवसायालादेखील लावले जाते. शिवाय ड्रग्जचा पुरवठा करून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात.

एमडीचा कारखाना मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी नाशिकच्या पोलिसांनी वडाळा गाव परिसरातून एमडी, गांजा हे पदार्थ जप्त केले. ‘छोटी भाभी’ नावाने कुख्यात असलेल्या महिलेसह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही मंडळी नेमकी कुणाच्या आशीर्वादाने कार्यरत होती, याचाही छडा आता लागला पाहिजे. त्याचप्रमाणे यापूर्वी इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्ट्यांवर वेळोवेळी जे छापे टाकले गेले आणि या कारवाईत ज्यांना अटक केली, त्यांचे काय झाले, या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज कोण पुरवत होते, याचाही छडा यानिमित्ताने लावायला हवा. हे सगळेच ललित पाटील कनेक्शन असू शकते. ज्यांच्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे ते पोलीस, ज्यांना लोक देव म्हणून ओळखतात ते डॉक्टर आणि ज्यांना आपले प्रतिनिधी म्हणून लोक निवडून देतात ते लोकप्रतिनिधी यांची ड्रग तस्करांशी अभद्र युती कशी झालेली आहे हे या प्रकरणातून स्पष्ट होते. ही अभद्र युती तोडायची असेल, तर आता जनतेनेच निषेधाचे शस्त्र हातात घ्यायला हवे.

ड्रग्ज तस्करी: पोलीस, डॉक्टर्स अन् राजकारणी
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -