घरसंपादकीयओपेडएकतेला तडा जाताना महात्मा फुलेंच्या विचारांची गरज

एकतेला तडा जाताना महात्मा फुलेंच्या विचारांची गरज

Subscribe

सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्व या मूल्यत्रयीवर आधारित नवसमाज निर्मिती हे महात्मा फुले यांच्या जीवितकार्याचे एकमेव आणि सर्वंकष उद्दिष्ट होते. यासाठी सर्व हयात जनसामान्यांच्या कल्याणासाठी महात्मा फुले यांनी अर्पित केली. डॉ. जनार्दन वाघमारे यांनी जोतीरावांना क्रुसेडर म्हटले आहे. महात्मा फुले हे मार्टिन ल्युथरप्रमाणे धार्मिक व सामाजिक क्रुसेडर होते. अन्याय आणि विषमतेविरुद्ध त्यांनी लढा पुकारला होता आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या उदात्त तत्त्वांवर त्यांनी सामाजिक पुनर्रचनेचे कार्य हाती घेतले होते. दीडशे वर्षानंतरसुद्धा महात्मा फुलेंच्या विचारांची गरज आम्हाला का वाटते? याचा विचार करता आजच्या परिस्थितीत सामाजिक मूल्ये आणि एकतेला तडा देण्याचे काम सुरू आहे. अशा काळात महात्मा फुले यांचे विचार प्रेरणादायी आणि मार्गदर्शक वाटतात. महात्मा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या विचारांचे केलेले चिंतन.

-मोहन माळी

आजच्या टेक्नोसॅव्ही आणि आधुनिक युगात दीडशे वर्षांपूर्वी काहीतरी काम केलेल्या या व्यक्तीला इतकं महत्त्व का द्यायचं? त्यांच्या असण्या-नसण्याची इतकी मीमांसा का करायची? लोक येतात कार्य करतात अन् जातात तेव्हा महात्मा फुले यांचे विचार, शिकवण आणि कार्याची आजची उद्याची गरज महत्त्व यावर इतकी चिंताचिंतन का? म्हणून आजच्या आमच्या पिढीसमोर इतर अनेकानेक अडचणी आव्हाने असताना फुल्यांचा इतिहासजमा झालेला काळ उगळायचा? या महामानवाच्या कार्याची मीमांसा करतानाच आधुनिक शतकात या महामानवाच्या विचारांची कार्याची गरज काय? याचा जर विचार केला तर बदलत्या परिस्थितीनुसार मार्गदर्शकाच्या भूमिकेत महात्मा फुले यांचे विचार आजही कार्यप्रवण करतात.

- Advertisement -

भविष्याची दिशा आणि वाटचाल गतकाळात शोधावी लागते. काल काय झालं किंवा काय नाही झालं हेच उद्या कसं आणि कुठे जायचं आहे हे निश्चित करतं म्हणून तर इतिहासाचं अध्ययन करायचं असतं. त्या त्या काळातल्या लढवय्यांचं शौर्य, महामानवांचे विचार, सुधारकांचे कार्य आत्मसात करायचं असतं. त्यातच कुठेतरी भविष्याची पाऊलवाट सापडते. आजची आणि येणारी पिढी कोण महात्मा फुले? कुठले? काय केले त्यांनी, असे प्रश्न विचारू नयेत किंवा महात्मा फुले यांचे कार्य पुस्तकातल्या पानात बंदिस्त न होता येणार्‍या पिढ्यांच्या कृतीत दिसावं त्यासाठी त्यांच्या कार्याचा आढावा घेणं वेळोवेळी अत्यावश्यक ठरतं.

अनेक रूढी परंपरांवर त्यांनी हल्ला चढवल्यामुळे अनेकांच्या पोटात आजही शुळ उठतो. महात्मा फुल्यांना चूक किंवा दुर्लक्षित करण्याची प्रवृत्ती आजही काही सनातनी आस्था असणार्‍या लोकांमध्ये आहे. तेव्हा फुल्यांच्या कार्यांवर वेळोवेळी लिखाण करणं क्रमप्राप्त ठरतं. त्यांच्या कार्याचे, विचारांचे पाईक होऊन त्यांच्या कार्याची मशाल पुढच्या पिढीच्या हवाली करताना आपली ही पिढी प्रकाश घेत वाटा शोधू शकेल, हे महत्त्वाचे.

- Advertisement -

स्री शिक्षणाचा प्रणेता, दलितांच्या उत्थानाचा उद्घाता आणि शेतकर्‍यांसाठी शेतीचं तत्वज्ञान मांडणारा पहिला हाडाचा कृषीतज्ञ माणूस म्हणजे महात्मा फुले. एकाच वेळी अनेक क्षेत्रात काम करून प्रस्थापित मूल्यांची परंपरांची चिकित्सा करत न पटणार्‍या रुढींना नाकारणारा सत्याचा अखंड शोध घेणारा समाज प्रवर्तक विचारवंत म्हणजे महात्मा फुले. प्रस्थापित मूल्यांना आणि पुरोहितशाहीनं निर्माण केलेल्या पोथीनिष्ठ समाज रचनेला सर्वप्रथम सुरुंग लावून उद्ध्वस्त करणारा बुलंद माणूस म्हणजे महात्मा फुले. सत्यमेव जयते हे त्यांचे नित्य व्यवहाराचे ब्रीद होते, ते म्हणजे महात्मा फुले. हेच ब्रीद पुढे भारताचं ब्रीदवाक्य झालं.

समाजाची सूत्रं पुढील पिढीच्या हवाली करताना गतकाळाचा इतिहास वैभव, घटना, कार्य, व्यक्ती या येणार्‍या पिढीला सांगणं आणि त्यांची त्या पिढीच्या शब्दात मांडणी करणं त्यांना व्हिजन देणे हेच मागच्या पिढीचं कर्तव्य ठरतं. यातूनच नवी पिढी आपापल्या वाटा शोधून घेते. इतिहासाच्या पाऊलखुणावरच नवी पिढी आपली नवी वाट शोधते. फुलेदेखील कधीतरी तत्कालीन नव्या पिढीचे प्रतिनिधी होते, त्यांनीही इतिहासाचा अभ्यास करून आपली स्वत:ची नवी वहिवाट शोधली म्हणूनच कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, त्यांचा इतिहास, त्यांच्या कार्यावर पोवाडा रचावा असं त्यांना वाटलं. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास त्यांनी सुरुवात केली.

शिवाजी महाराजांचं कार्य नव्या पिढीला कळावं त्यांनी त्यातून बोध घ्यावा हाच फुल्यांचा त्यामागील हेतू होता. अस्पृश्यांसाठी काम, पहिली मुलींची शाळा, पुस्तक लेखन व प्रकाशन, उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक ते अनेक उद्योगांची आदर्श उभारणी अशा अनेक कार्यांच्या प्रेरणांतून त्यांची सत्याचा शोध घेण्याची वृत्ती दिसून येते. आज जातीच्या बेड्यात अडकवलेल्या सर्व महामानवांना त्यातून मुक्त करत त्यांचं कार्य अखिल समाजासाठी प्रेरक मार्गदर्शक कसं होतं, हे आमच्या पिढीला कळावं त्यासाठी फुल्यांच्या कार्याचा आढावा घेणं आवश्यक ठरतं.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत म्हणतात, महात्मा फुले सर्व अर्थाने समाजाचे नेते होते. नेतृत्वाच्या अंगी लागणारे सर्व गुण त्यांच्यात होते. सर्वांगीण समाज क्रांतीचे उज्ज्वल ध्येय ते साकार करण्याकरता अविरत परिश्रम करत असत. त्याग आणि कष्ट सोसण्याची त्यांची तयारी होती. आघाडीवर राहून सर्व धोक्यांना सर्वप्रथम सामोरे जाण्याची धैर्यशील वृत्ती त्यांच्यामध्ये होती. कृती आणि वाणीमध्ये अजोड मेळ होता. त्यांनी हाताळलेल्या सर्व समस्या वंचित, दलित पीडित बहुजन समाजाच्या दु:खाची मूलगामी कारणे होती.

समाज चौकटीवरच प्रहार करून ती मोडून टाकून नवसमाज निर्मितीचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. हजारो वर्षे जे नियम ज्या श्रद्धा, परंपरा आणि रितीरिवाज समाजाने धार्मिक भावनेने तथाकथित परमेश्वरी आदेशानुसार आणि धर्मग्रंथाच्या आधारानुसार जोपासल्या होत्या त्यांच्यावर आघात करून अज्ञानी समाजाला जागृत करायचे आणि त्यांनी मानेवर घट्ट पकडून ठेवलेले जू फेकून द्यायला त्यांना प्रवृत्त करायचे हा त्याकाळी समाजद्रोहच होता. स्वत:च्या स्वार्थाकरिता ज्यांनी बहुजनांच्या मानेवर जे जू ठेवले त्याचा तर कडाडून विरोध होणारच, परंतु ज्यांनी यातून सुटका करायची त्या पीडित समाजाचाही त्याला प्रखर असहकार होता.

ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे म्हणतात, हा माणूस तत्कालीन इंग्रजी शास्त्राप्रमाणे केवळ लिहिणारा वाचणारा नसून सर्वस्वी नव्या प्रकारच्या जीवघेण्या चळवळीसाठी पायपीट करणारा, नाना तर्‍हेच्या माणसांमध्ये मिसळणारा, दुष्काळी कामे हाती घेणारा, त्या काळातल्या बुरसटलेल्या लोकांकडून एक-दोन आण्यांपासून वर्गण्या गोळा करून त्यांचा चोख हिशोब ठेवून लोकोत्तर व लोकांत अप्रिय अशी स्री व शूद्र यांच्या शिक्षणाची कामे करणारा, स्वतः पुस्तके लिहून छापणारा, शूद्रास न्याय मिळवून देण्याकरता किंवा शूद्रांच्या हुशार मुलांपैकी गरिबांची मुले फुकट शिक्षण घेण्याकरता अर्ज करून खेटे घालून कामे यशस्वी करून घेणार्‍या अशा प्रकारचा हा माणूस असल्यामुळे त्यांच्या लेखनात पंडिती कमकुवतपणा नाही. जोतिबा फुले यांनी पहिल्यांदाच मराठी गद्यात श्रमिकांची व शूद्रांची भाषा उमटवली आहे. खेड्यापाड्यातील लोकांच्या भाषेत त्यांनी लेखन केले आहे.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले पु. ल. देशपांडे म्हणतात, ज्या दुर्दैवी ब्राह्मण विधवांना कधी फूस लावून कधी जबरदस्तीने त्यांच्या शरीराचा उपभोग घेऊन केरेपोतार्‍यासारखे फेकून दिलेले होते, त्यांच्यावर महात्मा फुले नुसत्याच विलापिका लिहित बसले नाहीत, तर त्या अभागी स्त्रियांची सावित्रीबाईंकडून बाळंतपणे केली. एवढेच नव्हे, तर अशी बाळंतपणे केली जातील, अशी पाटी स्वतःच्या घराबाहेर लावली. त्या माऊलींची सुटका करणार्‍या सावित्रीबाई फुलेंचे कार्य अधिक जोखमीचे होते, कारण त्यांच्या या कार्याचा विरोध करून त्यांचे जीवन असह्य करणारे कोणी परकीय राज्यकर्ते नव्हते, तर ते धर्मांध स्वकीय होते.

पु. ल. देशपांडे असे म्हणतात की, फुले मानायचे म्हणजे पूर्वजन्म आणि कर्म सिद्धांत ही दरिद्री जनतेने गरिबीविरुद्ध बंड करून उठू नये म्हणून केलेली फसवणूक आहे, हे मान्य करावे लागेल. देवळातला देव दीनांचा वाली आहे, या श्रद्धेने सारे काही आपोआप चांगले होईल, ही भावना टाकून द्यावी लागेल. जोतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल, तर जात वर्णवर्चस्व मृर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करावा लागेल. ज्यांचा उद्धार करायचा, त्यांची उदासीनता ही फुल्यांना आपल्या कार्यातला सर्वात मोठा अडसर अन् दुःखही ठरले आहे.

महात्मा फुले यांच्या १९७ व्या जयंतीच्या निमित्ताने हे दुःख कायम आहे. आजच्या पिढीने त्यांची ही सत्य धर्माची आणि सामाजिक समतेची ज्योत हाती घेऊन समतेवर आणि शाश्वत मूल्यांवर आधारलेल्या नवसमाज निर्मितीसाठी पुढे सरसावणं अत्यंत आवश्यक आहे, या महात्म्यांच्या विचारांची मशाल आम्ही पुढे नेऊ शकू का, ज्यांनी हे विचार रुजवण्याचा तहहयात प्रयत्न केला. आम्ही ते समजून तरी घेणार आहोत का, की आपण याबाबत कपाळ करंटे ठरणार आहोत. याचाही विचार करणे गरजेचे आहे. शेवटी बदलत्या काळाच्या ओघात सामाजिक क्रांतीसाठी आजही महात्मा फुलेंचे विचार हे प्रेरणादायी आहेत, याचा विचार आपल्याला करावाच लागेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -