घरसंपादकीयओपेडविठ्ठलाच्या पंढरपुरात साने गुरुजींचे सत्याग्रह स्मारक !

विठ्ठलाच्या पंढरपुरात साने गुरुजींचे सत्याग्रह स्मारक !

Subscribe

साने गुरूजी यांच्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिर प्रवेशाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने साने गुरूजी यांनी ज्या तनपुरे महाराजांच्या मठात विरोध होऊनही उपोषण केले, त्या पंढरपूरमध्ये साने गुरूजींचे सत्याग्रह स्मारक उभे राहत आहे. त्या स्मारकाचे लोकार्पण आज ८ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थित होते आहे. त्या निमित्ताने विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी गुरुजींनी आपल्या प्राणांची बाजी लावली. शेवटी विठ्ठल मंदिराची दारे दलितांना खुली झाली. त्या ऐतिहासिक सामाजिक आंदोलनाचा घेतलेला हा आढावा.

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर प्रवेशासाठीच्या साने गुरूजींनी केलेल्या उपोषणाला यावर्षी पंच्याहत्तर वर्षं पूर्ण झाली आहेत. वर्तमानात जातीभेद पाळला जात नाही. आपल्या सामाजिक जीवनात जातीभेदाचे प्रतिबिंब उमटताना दिसत नाही. मात्र ७५ वर्षापूर्वी दलितांना मंदिर प्रवेश ही मोठी घटना होती. भारताला स्वातंत्र्य मिळत होते आणि दलितांना मंदिर प्रवेश नाही. त्यामुळे या स्वातंत्र्याला काय अर्थ आहे, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र गुरूजींनी स्वतःच्या जीवावर उदार होत आरपारची लढाईचा केलेला निर्धार, त्यातून मंदिरात दलितांना मिळालेला प्रवेश ही घटना महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासातील महत्वाची घटना होती. या लढ्याने साने गुरूजी वारकर्‍यांचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे नेते बनले होते. त्यांच्या या लढ्याने स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून दिला होता. गांधीजीच्या स्वप्नातील स्वातंत्र्याचे सुराज्य करण्याच्या स्वप्नासाठी ही वाट निर्माण करण्यात गुरूजी यशस्वी झाले होते. त्या लढ्याच्या स्मृती जतन करणार्‍या स्मारकाचे लोकार्पण आज होत आहे ही गोष्ट आनंददायी असली तरी त्यासाठी ७५ वर्षं लागली ही गोष्टही पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही हेही लक्षात घ्यायला हवे.

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असे म्हणत धर्माचा खरा विचार रूजविणारे साने गुरूजी हे मातृहदयीच होते. धर्माधर्माने माणसात उभ्या केलेल्या विषमतेच्या भिंती, धर्म कर्मठांनी माणसांनाच नाकारणे होते. जातीभेदाच्या घट्ट भिंती उभ्या करण्यात अनेकांना यश आले होते. त्या भिंती अत्यंत दृढ होत होत्या हे आपला इतिहास सांगत आला आहे. त्यामुळे स्वातंत्र्य मिळूनही मानवी हक्क दलितांना मिळणार होते का, असा प्रश्न विचारला जात होता. स्वातंत्र्यात आपल्याच बांधवाना जर हक्क मिळणार नसतील तर ते स्वातंत्र्य वाझोंटेच होते. सर्वांना समान अधिकार प्राप्त होणे हे खरे स्वातंत्र्य होते.

- Advertisement -

त्यामुळे इंग्रजांनी येथील आपली सत्ता सोडून भारतीयांच्या हाती कारभाराची सूत्रे देणे हे राजकीय स्वातंत्र्य होते, पण स्वातंत्र्याला परिपूर्णत: प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने या मंदिर प्रवेशाला अनन्य साधारण महत्व होते. अनेकदा मंदिर प्रवेशाने काय घडणार होते, असाही प्रश्न केला जात होता. मात्र पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश ही सामाजिक क्रांती ठरणार होती. विठोबा हा अवघ्या बहुजन समाजाचे आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रातील कष्टकरी, श्रमजीवी आणि अगदी दीन दलितांचे लोकदैवत आहे. त्यामुळे तेथील मंदिरात प्रवेशाला अनन्य साधारण महत्व होते. सामान्यासाठी पंढरपूरचा विठोबा हे दैवत जगण्यासाठीचा आधार होता. त्यामुळे येथील मंदिरात प्रवेशाला महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात मोल होते.

मंदिरातील प्रवेश याचा अर्थ माणसांच्या हदयाचे परिवर्तन असा होता. मंदिरात दलितांना प्रवेश मिळाला तर समाजातील इतर घटकांनी मनाने स्वीकारणे घडणार होते. ते एकदा घडले की पुढील सामाजिक व राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होणार होता. एका अर्थाने तो हक्क मिळवून देणे ही मानवी हक्काची लढाईदेखील होती. प्रत्येक माणूस समान आहे. त्याला जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला समानतेने जगण्याचे अधिकार आहेत. माणसांमाणसात कोणताही भेद होता कामा नये.
सवर्णांना जे हक्क आहेत तेच दलितांना मिळायला हवेत. ही लढाई समतेची आणि समानतेची होती. त्यात दलितांच्या मानवी हक्काची भाषा होती. त्यामुळे केवळ मंदिर प्रवेश असा विचार नाही तर त्यात असलेले मानवी हक्क महत्वाचे आहेत हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे ही लढाई हक्कांची होती हेही लक्षात घ्यायला हवे. समाजात राहूनही समाजापासून दूर अशा समाज घटकांच्या न्यायहक्कांसाठी कुणी तरी जाणत्याने उभे राहण्याची गरज असते. ज्या जाणत्यांना दूरदृष्टी असते, ती मंडळी असा विचार घेऊन अगदी प्राणपणाने स्वत:ला झोकून देतात. दलितांना विठ्ठल मंदिर प्रवेश मिळावा म्हणून गुरुजींनी प्राणपणाने लढा दिला.

- Advertisement -

एका बाजूला विठ्ठलाचे भक्त हे समाजाच्या सर्व स्तरातील होते, तर मग विशिष्ट जातीच्या लोकांना विठ्ठलापासून दूर का ठेवण्यात येत होते, असा प्रश्न उपस्थित झालेला होता. काही आस्थापना आपल्या ताब्यात असल्या की, त्यावर आपली कायम स्वरुपी मक्तेदारी असावी, असा मानणारा एक वर्ग असतो. त्यात पुन्हा तो काळ सोवळ्या ओवळ्याचे स्तोम माजवणार्‍या लोकांचा होता, त्यातूनच जात आणि आर्थिक विषमतेच्या कारणावरून हा भेद केला जात होता. खरे तर सर्वांंसाठी समान असलेल्या देवाच्या दारी हा भेद केला जात होता? ही चूक होती, पण ती सुधारायला कुणी तयार नव्हते. त्यासाठीच गुरुजींनी पुढाकार घेतलेला होता. स्वातंत्र्याबरोबर समता नसेल तर ते स्वातंत्र्य हे विशिष्ट लोकांची मक्तेदारी होऊन बसते. आणि मोठा वर्ग पुन्हा या मक्तेदारांचा गुलाम बनतो, त्यामुळे स्वातंत्र्याला तसा काही अर्थ उरत नाही. गुरुजींना स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा होता, त्यासाठीच त्यांची सगळी धडपड सुरू होती.

ही लढाई लढली जाऊ नये म्हणून समाजातील अनेकांनी प्रयत्नही केले. साने गुरूजींवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. साने गुरूजी गांधीभक्त होते. त्यांची गांधी विचारावर निस्सिम श्रध्दा होती. गांधी हे साने गुरूजींचे आराध्य दैवत होते. गुरूजींच्या उपोषणाने दोन समूहात जातीभेदाच्या भिंती उभ्या राहणार आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कायद्याने सारे काही मिळेल तेव्हा आज उपोषणाची मुळीच गरज नाही हे गांधीना पटवून देण्यात विरोधकांना यशही आले होते. गांधीजीनी उपोषण मागे घेण्यासाठी पाठविलेल्या तारेचे भांडवल करत साने गुरूजींवर दबाव टाकण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.

एवढेच नाही तर पंढरपूरात गुरूजींना उपोषणासाठी जागा मिळू नये म्हणूनदेखील मोठ्या प्रमाणवर प्रयत्न झाले होते. ज्या ज्या मार्गाने दबाव टाकता येईल आणि उपोषण होणार नाही यासाठी काळजी घेतली जात होती. मात्र गुरूजींच्या उपोषणामागे तात्विक आणि मानवी दृष्टिकोनाची पक्की विचारदृष्टी होती. त्यामुळे त्यांनी माघार घेणे शक्य नव्हते. उपोषणाला मोठ्या प्रमाणावर समाजमनातून पाठिंबा मिळत होता. त्याचवेळी समाजातील विचारवंत, पत्रकार, नेतेदेखील आंदोलनाच्या मागे उभे राहिले होते. आता हे आंदोलन सुरू राहिले तर उद्या काय होईल याचा अंदाज बांधला जात होता. त्यात पुढील धोका विरोधकांना स्पष्टपणे दिसत होता. त्या दबावाचा सकारात्मक परिणाम विरोधकांवरती झाला होता. हळूहळू त्यांच्या विरोधाची धार कमी होत चालली होती.

लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब माळवणकर हे पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तो उपोषणाचा चौथा दिवस होता. त्यांना सर्व अंदाज आला होता. ही लढाई महत्वाची आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आतल्या गाभार्‍यात जाऊन दर्शन घेण्याचे नाकारले. जेथून दलितांना विठोबाचे दर्शन मिळते तेथूनच आपण दर्शन घेऊ असे त्यांनी जाहीर केले. त्यांनी तशी कृती करणे पसंत केले. त्यांच्या या निर्णयाने गुरूजींच्या उपोषणाला ताकद मिळाली होती. लोक आंदोलनाची भाषा त्यांना कळू लागली होती. त्यामुळे विठ्ठल मंदिर पंचकमिटीतील सदस्यांचा आरंभी असलेला विरोध मावळत चालला होता. एक एक पंच आपला विरोध मागे घेत होता. त्यामुळे अखेर पंच कमिटी सदस्यांनी दलितांना मंदिर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी न्यायालयास हवी असलेली सर्व कागदपत्रे सादर केली. प्रवेश मिळण्याचा मार्ग सुलभ झाला. या लढ्याच्या निमित्ताने संत विचारापासून दूर गेलेले वारकरी संप्रदायातील अनेक महंत उघडे पडले होते. समाजातील काही लोक वरवर भूमिका घेत होते तेही समोर आले होते. ज्या संतानी समाजात जातीयता संपुष्टात यावी म्हणून प्रयत्न केले होते.

वारकरी संप्रदायाचे पुरोगामित्व संताच्या मुळच्या विचारधारेत होते. वारकरी संप्रदायाच्या मूळ विचाराला दूर सारत काही मंडळी जातीभेदाचे समर्थन करत होती. संताचे विचार केवळ सांगण्यात रममाण होणारी मंडळी या निमित्ताने समोर आली होती. मात्र त्याचवेळी दादासाहेब सातारकर, विठोबा अण्णा आजरेकर फडांनी गुरूजींच्या मागे उभे राहत पाठिंबा दिला. साने गुरूजींनी खर्‍या अर्थाने संताचे विचार मस्तकी घेत पाऊलवाट निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न हा महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे मोठेपण दर्शित करणारा होता. ही लढाई म्हणजे वारकरी संप्रदायाने पेरलेल्या समतेच्या विचाराची कास धरून जगण्याला उन्नत करणारी होती. त्यामुळे साने गुरूजी हे वारकर्‍यांसाठी देखील नेतृत्व देऊ शकले. साने गुरूजींचा विचारांचा सार्वत्रिक स्वीकार केला गेला होता. संताचा विचार हा समतेचा होता याची जाणीव होऊनही त्याला पंढरपूरात होणारा विरोध अनाकलनीय होता असे नाही, तर त्यामागे स्वार्थ दडलेला होता.

साने गुरूजींनी उपोषणापूर्वी राज्यात फिरून पावनेचार महिन्यात सुमारे ४०० सभा घेतल्या होत्या. जाती निर्मूलनाच्या लढाईसाठी हे आंदोलन म्हणजे मोठी चालना होती. जनजागृतीचा हा केलेला प्रयत्न महाराष्ट्रातील पहिलाच पण अत्यंत मोठा प्रयत्न होता. त्याचा परिणाम म्हणून गुरूजींच्या या भूमिकेला सुमारे सहा लाख लोकांनी सह्या करून पाठिंबा दर्शविला होता. हे जनमत गुरूजींच्या मागे असल्याने हा लढा लढला गेला होता. त्यास मिळालेल्या प्रतिसादाने ही लढाई जिंकली गेली होती. मात्र इतक्या सहजतेचा हा लढा नव्हता हेही सत्य होते. या लढ्याने मिळविलेले यश म्हणजे स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यासाठी टाकलेले पाऊल होते.

स्वातंत्र्य हे समतेशिवाय प्रस्थापित होत नाही. त्यामुळे गुरूजींचा हा लढा म्हणजे स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त करून देणे होते. समाजात जातीपातीच्या भिंती, विषमता दूर सारण्यासाठी आपल्याला साने गुरूजींच्या विचाराची कास धरावी लागणार आहे. साने गुरूजींचा लढा सोपा नव्हता हे तेव्हा म्हटले जात होते. आजही तसा लढा निर्माण करणे सोपे नाही हेही खरे आहे. मात्र त्यावाटेच्या प्रवासात समाजाचे भले आहे. त्यांच्या एका लढ्याने गावोगावची मंदिरे आणि पाणवठे खुले झाले. त्यातून समतेचा विचार गावोगावात रूजला. आज ती घटना इतिहास झाली आहे, मात्र इतिहास विसरला गेला तर त्या समाजाला भविष्य राहत नाही. त्यामुळे इतिहासाची साक्ष देणारे स्मृती स्मारक ७५ व्या वर्षात होते आहे. ही गोष्ट पुरोगामी महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे. या लढ्यातून प्रेरणा घेऊन लोकहिताची आंदोलने पुन्हा उभी राहतील हे निश्चित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -