घरसंपादकीयओपेड‘चारसो पार’साठी नितीश कुमारांनंतर कोणाचा नंबर...

‘चारसो पार’साठी नितीश कुमारांनंतर कोणाचा नंबर…

Subscribe

राम मंदिराच्या लोकार्पणानंतर भक्तांना वाटायला लागले की, आता मोदींना कोणीही अडवू शकत नाही. तिथे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती दाखवत होती की, मोदींच्या तिसर्‍या टर्मसाठीही संघाचा आशीर्वाद आहे. मोदींच्या ‘तिसरी बार’साठी भाजपने ‘चारसो पार’चा नारा दिला आहे, मात्र ३०३ वरून चारसो पार जाण्यासाठी देशात कुठेच विरोधक राहणार नाही, याची काळजी भाजपला घ्यावी लागत आहे. तशी काळजी ते मध्य प्रदेश, महाराष्ट्रापासून बिहार आणि बंगालपर्यंत घेताना दिसत आहेत. नितीश कुमारांनंतर भाजपचा डोळा बंगालवरच आहे, पण ममतादीदी तिथे अजूनतरी खंबीरपणे त्यांच्या विरोधात उभ्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये स्वतंत्र लढण्याचे सूतोवाच केले आहे. त्यांच्यामागेही ईडी लागलेलीच आहे, मात्र तेही भाजपला शरण जाण्याच्या मानसिकतेत नाहीत, पण चारसो पार करण्यासाठी भाजपच्या सर्वतोपरी खटपटी आणि लटपटी सुरू आहेत. नितीश कुमार यांच्यानंतर कुणाचा नंबर लागतो ते पहावे लागेल.

बिहारी बाबू नितीश कुमारांना भाजपने सोबत घेतले आहे. नितीश कुमार यांची ही वैचारिक युती आहे की सत्तेसाठीची तडजोड हे लपून राहिलेले नाही. हा संधीसाधूपणा आहे, हे जनतेच्या लक्षात आलेले आहे. आता फक्त सत्तेचीच एकमेव विचारधारा जिवंत आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे. तुम्ही कोणत्याही विचारांचे असा, कोणत्याही विचारधारेचे असा, पण तुम्ही सत्तेसोबत आहात, सत्ताधारी आहात हीच तुमची विचारधारा झालेली आहे. (Whos number after Nitish Kumar for Charso Par)

राष्ट्रवादी काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा पक्ष असल्याचे किमान जाहीररित्या सांगितले तरी जाते. अजित पवार संधी मिळेल तिथे शिवाजी महाराज-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही चाललो आहोत, सांगत असतात. आता त्यांनी सोबतीला यशवंतराव चव्हाणांचा वारसा आम्ही चालवत आहोत, असेही सांगायला सुरुवात केली आहे, मात्र पहाटेचा शपथविधी घेताना त्यांना ही विचारधारा आठवत नाही.

- Advertisement -

दुसर्‍यांदा पुन्हा भाजपसोबत जाताना त्यांना हा विचार लक्षात राहात नाही. काकांचा पक्ष स्वत:च्या नावावर करून घेताना त्यांना हा विचार, वारसा आठवत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात आपले राजकारण उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सत्तेचा संसार कसा करायचा हे महाविकास आघाडी स्थापन करताना विसरलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस आमदार यांना ईडीची पिडा मागे लागल्यानंतर लगेच बाळासाहेबांचे विचार आठवायला लागतात. सगळे विचार, सगळे ‘वाद’, सगळे ‘इझम’ आता सोयीसोयीने माना टाकत आहेत.

जनता दलातून राजकारणाला सुरुवात करणारे नितीश कुमार यांनी १९९४ पासून २०२४ पर्यंत नऊ वेळा पलटी मारलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वापरण्यात आलेला ‘पलटूराम’ हा शब्द अगदी योग्य आहे. सत्तेची ऊब मिळायला लागल्यानंतर विचारधारा हा शब्दच नेत्यांच्या डिक्शनरीतून गायब होतो. हे २०१४ पासूनच्या राजकारणात पहायला मिळत आहे. भाजपला शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून सगळेच पुरोगामी झिडकारत होते, तेच आता मोदी-शहांना मिठ्या मारत आहेत.

- Advertisement -

आंबेडकरवादी तर कट्टर भाजप विरोधक म्हणून ओळखले जात होते, मात्र तेही आता गोळवलकर-हेडगेवार हेच आमचे ‘तात’ आहेत, एवढंच म्हणणं फक्त रामदास आठवले आणि तत्सम नेत्यांनी बाकी ठेवलं आहे. भाजपसोबत घरोबा करण्यात सर्वात आघाडीवर राहिलेल्या दलित नेत्यांमध्ये दिवंगत रामविलास पासवान यांचे नाव आघाडीवर राहिलेले. ते भाजपसोबत गेले की, त्यांना ‘राजकीय हवामान तज्ज्ञ’ म्हणून तेव्हाच्या मीडियाने गोंजारलेलं होतं, तेच आता रामदास आठवलेंबाबत सुरू आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत जे झालं, त्याही आधी बिहारमध्ये ते चिराग पासवान यांच्याबाबत २०२१ मध्ये झाले आहे. रामविलास पासवानांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचे दोन गट झाले. ज्या पक्षाकडे संसदीय ताकद आहे, त्यालाच रामविलास पासवान यांनी स्थापन केलेला लोक जनशक्ती पक्ष देण्यात आला. रामविलास पासवान यांनी २००० मध्ये लोक जनशक्ती पक्षाची स्थापना केली. २०१९ मध्ये पासवान यांनी मुलगा चिरागला आपला उत्तराधिकारी घोषित केले. २०२० मध्ये रामविलास पासवान यांचे निधन झाले आणि २०२१ मध्ये चिरागचे काका, रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती पारस यांनी बंडखोरी केली.

प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर बंडखोर पशुपती पारस यांना लोक जनशक्ती पक्ष बहाल केला गेला, तर चिराग पासवान यांनी लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)ची स्थापना केली. पक्षाचे दोन गट झाल्यानंतरही दोन्ही गट एनडीएमध्येच राहिले हे विशेष. या गटबाजीत पक्षाचा जनाधार असलेला पासवान समाज, दलित समाज मात्र विखुरला गेला. भाजपच्या विरोधात आणि मोदी-शहांच्या एकाधिकारशाही विरोधात नितीश कुमारांनी ‘इंडिया’ आघाडीसाठी पुढाकार घेतला. पहिली बैठक पाटना येथे घेतली. त्याच नितीश कुमारांनी आता इंडिया आघाडीची साथ सोडली आणि ते पुन्हा भाजपच्या वळचणीला जाऊन बसले.

नितीश कुमार यांनी आघाडी सोडल्याने काँग्रेस किंवा लालू यादव आणि तेजस्वी यांचे काहीही बिघडणार नाही. ते आजही सत्तेच्या बाहेर आहेत आणि उद्याही राहतील, पण फक्त सत्तेचीच विचारधारा घेऊन निघालेल्यांना येणार्‍या पिढ्यांना उत्तर द्यावे लागेल. इंडिया आघाडीची मुहूर्तमेढ बिहारमध्ये रचली गेली. नितीश कुमारांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी देशभरातील एक-एक खासदार असलेल्या पक्षालाही एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला, मात्र जेव्हा लढाईची वेळ आली, तेव्हा नितीशबाबू पलटूराम ठरले.

बिहारच्या चाळीस जागांपेक्षा मोठा आकडा आहे महाराष्ट्रातील ४८ जागांचा. त्यामुळे भाजपला चारसो पार करायचे असेल आणि नेहरू-गांधींचा विक्रम मोडायचा असेल, तर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रावर त्यांचा डोळा असणारच. स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम पंडित नेहरुंचा आहे. सतरा वर्षे ते पंतप्रधान होते. त्यानंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रमही काँग्रेसच्याच नावावर आहे. १९८४ च्या लोकसभेत राजीव गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला लोकसभेच्या ५४२ पैकी ४११ जागांवर दणदणीत विजय मिळाला होता. २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत.

या शताब्दी सोहळ्यात देशात संघ-भाजपची एकहाती सत्ता आणि स्वत:च बनवलेल्या संसदेत सर्वाधिक बहुमत, हे खरं मोहन भागवतांचं आणि त्यांचे प्रचारक असलेल्या मोदींचं स्वप्न आहे. महाराष्ट्रात संघ-भाजपला हे तेवढं सोपं नाही. त्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र शरद पवारांवर याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही.

शरद पवारांनी १० जून १९९९ ला स्थापन केलेला पक्ष त्यांच्या हयातीत त्यांच्याकडून निवडणूक आयोगाने काढून पुतण्या अजित पवारांच्या झोळीत टाकला. पक्षाचं रौप्य महोत्सवी वर्ष असं ‘साजरं’ करावं लागेल याचा विचार शरद पवारांनी कधी केला नसेल, पण त्यांना हे काही नवीन नाही. पन्नास-पंचावन्न वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत त्यांनी विविध पक्ष आणि चिन्हांवर निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यांचा विश्वास हा जनतेच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आहे.

राष्ट्रवादीच्या आधी महाराष्ट्रात असाच प्रयोग शिवसेनेवर झाला. शिवसेना फोडून, तोडून त्यांना ती मोडता मात्र अजून आलेली नाही. जो विचार भाजप-संघाचा आहे, तोच अधिक गडद हिंदुत्वाचा विचार शिवसेनेने अजून टिकवून ठेवलेला आहे. मोदी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन करत असताना उद्धव ठाकरे त्याचवेळी जिथे रामायण घडले त्या नाशिकमध्ये होते. काळाराम मंदिरात महाआरती, गोदा-गंगा आरती त्यांनी केली.

केवळ राम-राम हे आमचे हिंदुत्व नाही तर ‘रामासोबत हाताला काम’, हे आमचे हिंदुत्व असल्याचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सांगत आहेत. त्यांना इंडिया आघाडीतून फोडणं ही खरी भाजपची कसोटी असणार आहे आणि त्यांनीही पुन्हा भाजपसोबत का जावं, हेही कारण मोठं गंभीर असणार आहे. नुकत्याच झालेल्या कोकण आणि तळकोकणाच्या दौर्‍यात उद्धव ठाकरेंनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडलेली नाही.

ममता बॅनर्जी यादेखील एनडीएमध्ये राहिलेल्या आहेत, मात्र तेव्हा भाजप वाजपेयी-अडवाणींची होती. आताच्या मोदी-शहांच्या भाजपसोबत त्यांचे सूत जुळण्याची शक्यता कमी आहे, पण ईडीच्या फेर्‍यात ममता बॅनर्जींचे अनेक नेते, मंत्री आणि खासदार अडकलेले आहेत. बंगालमध्ये डाव्यांशी त्यांचा संघर्ष आहे, त्यामुळे तिथे डाव्यांसोबतच निवडणूक लढण्याची त्यांची तयारी नाही. त्यांची काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा फिसकटलेली आहे. नितीश कुमारांनंतर भाजपचा डोळा बंगालवरच आहे, पण ममतादीदी तिथे अजूनतरी खंबीरपणे त्यांच्या विरोधात उभ्या आहेत.

२२ जानेवारीला मोदी जेव्हा अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिराचे लोकार्पण करत होते, तेव्हा ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये सर्वधर्मीय रॅली काढली. सर्व धर्मांच्या धर्मगुरूंना सोबत घेऊन बंगालमध्ये एकतेचा संदेश दिला. त्या अजूनपर्यंत तरी संविधानिक संस्थांच्या रक्षणासाठी लढत असल्याचे दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये स्वतंत्र लढण्याचे सूतोवाच केले आहे. त्यांच्यामागेही ईडी लागलेलीच आहे, मात्र तेही भाजपला शरण जाण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे नितीश कुमारांनंतर भाजपच्या गळाला लागेल, असा एकही नेता सध्या ‘इंडिया’त नाही.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -