घरसंपादकीयअग्रलेखगोमूत्र मनावर शिंपडण्याची गरज!

गोमूत्र मनावर शिंपडण्याची गरज!

Subscribe

कोरोनाची अनलॉक प्रक्रिया सुरू झालेली असताना आधी हिंदूंची मंदिरे उघडा, असा धोशा त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपकडून लावण्यात येत होता. हिंदू भाविकांचा कंठशोष सरकारच्या कानी पडत नाही काय? उगीच नको ते पुरोगामित्व दाखवू नका, नियम आखा आणि देवांची पूजा-अर्चना करण्यासाठी मंदिरे सुरू करा, अन्यथा आम्ही जबरदस्तीने मंदिरे उघडू, असा इशारा देण्यात येत होता. एवढे कमी की काय सत्तासंघर्षाच्या लढाईत सर्वोच्च न्यायालयाने सत्ताधार्‍यांची तळी उचलणार्‍या ज्या राज्यपालांवर नियमबाह्य वर्तन केल्याचा ठपका ठेवला, त्या राज्यपालांकडूनही त्यावेळच्या सरकारवर मंदिरे सुरू करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. इथे मुद्दा केवळ आस्थेचा नव्हता, तर मंदिरांच्या माध्यमातून चालणार्‍या अर्थचक्राचादेखील होता. त्यामुळे भाजपकडून सरकारला सातत्याने धारेवर धरण्यात येत होते. मुद्दा योग्य होता पण वेळ चुकीची होती. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात धार्मिक पर्यटनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध धर्म कुठलाही असो प्रत्येक धर्मस्थळांभोवती लहानमोठ्या उद्योगांचे जाळे विणलेले आपल्या नजरेस पडते.

वाहतूक व्यवस्था, लॉजिंग-बोर्डिंग, खानपान सेवेपासून मिठाईवाला, हारतुरे ते अगदी चप्पल सांभाळण्यापर्यंत असंख्य पोटार्थी भाविकांच्या आस्थेमार्फत झिरपणार्‍या धनद्रव्याचे लाभार्थी असतात. हेच भाविक दानधर्म करून एकाच वेळी मंदिरातील सेवेकरी आणि मंदिरांबाहेरील भिक्षेकरूंची क्षुधा शमवण्याचे परमभाग्याचे कार्य करत असतात. असा हा अर्थचक्रातील दाता म्हणवणार्‍या भाविकालाच सध्या मंदिरात येण्यापासून अटकाव केल्याच्या दोन घटना सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहेत. त्यातील एक म्हणजे त्र्यंबकेश्वर येथील आणि दुसरी घटना आहे ती तुळजाभवानी मंदिर येथील. नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, तर दुसरे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानीचे मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ इतर धर्मियांनी धूप दाखवल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच वादाला खतपाणी मिळाले. हा वाद इतका टोकाला पोहचला की तथाकथित हिंदू धर्माचे रक्षणकर्ते मंदिराभोवती ज्योतिर्लिंगाच्या रक्षणार्थ एकवटले. मंदिर परिसर गोमूत्र शिंपडून स्वच्छ केला. मंदिरात हिंदू धर्मियांव्यतिरिक्त इतर कुणालाही प्रवेश नाही, असे फलक लागले, तर दुसरीकडे शिवसेना-भाजप सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमून सरकार किती संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. अशी कुठली घटना घडली की धर्माचा बाजार मांडणार्‍यांना अधिकच चेव चढतो. मंदिरात उत्तेजक कपडे घालून येण्यास मनाई करणारे फलक लागतात. तसाच फलक तुळजाभवानी मंदिराबाहेर लावण्यात आला. बर्म्युडा, शॉर्ट, स्कर्ट, भारतीय परंपरेला साजेसे कपडे न घालणार्‍यांना प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर तो निर्णय मागेही घेण्यात आला, परंतु हे काही पहिल्यांदा घडलेले नाही. याआधीही अनेक धार्मिक स्थळांच्या प्रशासनाने असे फतवे काढून समाजाला धार्मिक, नैतिक आचरणाचा पाठ पढवण्याचा प्रयत्न केला आहे.

देशाच्या कानाकोपर्‍यात हिंदू धर्मियांनी डोक्यावर रूमाल ओढून एखाद्या मजारीवर चादर चढवणे, भक्तिभावाने हारफुले अर्पण करणे, मुस्लीम वा इतर कुठल्याही धर्मियाने हिंदू देव-देवतेच्या मंदिरात नैवेद्य अर्पण करणे हे काही नवीन नाही. ही परंपरा प्राचीन आहे. मुंबईचेच उदाहरण द्यायचे झाल्यास प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर असो, माहीमची मकदूम बाबांची दर्गा असो किंवा वांद्य्रातील माऊंट मेरी चर्च असो इथे तुम्हाला सर्वकाळ सर्वधर्मियांचा हमखास वावर दिसून येतो. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील प्रवेशास जशी कुणालाही आडकाठी नाही, तशीच अजेमर शरीफच्या दर्ग्यावर माथा टेकवण्यासही कुणाचे बंधन नाही. आडकाठी करतात ते देवाच्या चरणाला स्पर्श करण्याआधी वा त्याच्यापुढे माथा टेकण्याआधीच आपल्याला जबरदस्तीने ओढून बाजूला करणारे अर्धनग्न अवस्थेतील बडवे. त्यामुळे कुठलाही फतवा काढण्याआधी ही अर्धनग्न बडवी मनोवृत्ती आधी दूर करायला हवी.

- Advertisement -

देव हा कुठल्याही हारतुर्‍यांनी नव्हे, तर मनातील भाव सच्चे असतील तरच दखल घेतो, असे आपले थोर साधूसंत सांगून गेले आहेत. देवाचा वास ज्या ठिकाणी असतो, तेथील परिसर हा पवित्र मानला जातो, असे आपल्या पाोथीपुराणातही लिहून ठेवले आहे. अशा वेळी निर्मळ आणि स्वच्छ मनाने देवाची आराधना करण्याऐवजी गोमूत्र शिंपडून देवाचा परिसरच पवित्र करण्याचा सपाटा सध्या काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी लावला आहे. त्याची कीव करावी तेवढी थोडीच आहे. एका बाजूला भारतात अखंड हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडायची, हिंदुस्थानातील सर्व धर्मिय हे मूळचे हिंदूच असे तत्त्वज्ञान सांगायचे आणि दुसरीकडे तूप ओतून सामाजिक सखोला बिघडवण्याचा किंबहुना भडकवण्याचा प्रयत्न करायचा, अशा गोमूत्रधारी राजकारणाला जनता कंटाळलेली आहे.

माजी खासदार हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देऊन अशा गोमूत्रधारी राजकारणाच्या नादी न लागल्याबद्दल स्थानिकांचे आभार मानले, पण हे प्रकरण एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. अगदी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकात निवडणूक रंगात आलेली असताना प्रचारयुद्धात बजरंग बलीला उतरवण्यात आले होते. तसा शिरकाव कुठल्याही वेळी कुठल्याही क्षणी कुठल्याही देवीदेवतेचा होऊ शकतो. यासाठी सर्वसामान्यांनी सजग राहायला हवे, अन्यथा राजकारणाच्या हवनकुंडात सर्वकाही भस्मसात झाल्यानंतर ओम शांती शांती म्हणायला आपण शिल्लकच राहणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -