घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जरी वधु करोनि गोत्रजांचा। तरी वसौटा होऊनि दोषांचा। मज जोडिलासि तूं हातींचा। दूरी होसी //
कारण, जर मी गोत्रजांचा वध केला, तर मी दोषास पात्र होऊन मला अनायासाने सापडलेला तू हातचा दूर होशील.
कुळहरणीं पातकें। तियें आंगीं जडती अशेखें। तयें वेळी तूं कवणें कें। देखावासी? //
कुलक्षय केला असता अनंत पातके लागतात. अशा प्रसंगी तुम्हाला कोणी आणि कोठे शोधावे?
जैसा उद्यानामाजीं अनळु | संचरला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु | स्थिरु नोहे //
ज्याप्रमाणे बागेत आगीचा मोठा भडका झाला असता कोकिळ पक्षी एक क्षणभरही तेथे राहत नाही.
का सकर्दम सरोवरु। अवलोकूनि चकोरु। न सेवितु अव्हेरु | करूनि निघे //
किंवा एखादे सरोवर चिखलाने भरले आहे, असे पाहून चकोर पक्षी तेथे राहत नाही तर त्याचा तिरस्कार करून निघून जातो.
तयापरी तूं देवा । मज झकवूं न येसी भावा | जरी पुण्याचा वोलावा | नाशिजैल //
त्याप्रमाणे देवा, माझे पुण्यसंचय नाहीसे झाले तर तू मला आपल्या मायेने फसवून दुरावशील.
म्हणौनि मी हें न करीं | इये संग्रामीं शस्त्र न धरीं । हें किडाळ बहुतीं परी | दिसतसे //
म्हणून मी ही गोष्ट कधी करणार नाही व या समरांगणात हातात शस्त्रही धरणार नाही; कारण, हे कृत्य अनेक प्रकारे निंद्य आहे, असे मला वाटते.
तुजसीं अंतराय होईल | मग सांगें आमुचें काय उरेल? | तेणें दुखें हियें फुटेल | तुजवीण कृष्णा //
कृष्णा, तू आम्हाला दुरावलास तर, मग आमचे महत्व काय राहणार ! तुझ्यावाचून आम्हाला जे दुःख होईल त्याने आमचे हृदय विदीर्ण होईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -