घरसंपादकीयअग्रलेखबिनविरोधाचा बोभाटा...

बिनविरोधाचा बोभाटा…

Subscribe

गेल्या जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीनं शिवसेनेत मोठं बंड करून राज्यात सत्तांतर घडवून आणलं. त्यानंतर त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तेव्हापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष आणि फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं. त्यात मुख्यत्वे ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य करण्याचं काम भाजपकडून शिंदे गटाच्या माध्यमातून केलं जात आहे.

गेल्या जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीनं शिवसेनेत मोठं बंड करून राज्यात सत्तांतर घडवून आणलं. त्यानंतर त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तेव्हापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष आणि फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं. त्यात मुख्यत्वे ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य करण्याचं काम भाजपकडून शिंदे गटाच्या माध्यमातून केलं जात आहे. विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं छोटे पक्ष आणि अपक्षांना हाताशी धरून वर्चस्व मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हा सत्तासंघर्ष आणि फोडाफोडीचं राजकारण नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही सुरूच राहिले. यावेळी मात्र भाजपलाच त्याचा फटका बसला, तर काँग्रेसमध्ये दुहीची बिजं रोवण्यात भाजप यशस्वी झाला असून सत्तासंघर्षाचा दुसरा अंक आता महाराष्ट्रात सुरू झाला आहे. रायगड शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपने शेतकरी कामगार पक्षाकडून खेचून आणली. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद भाजपला धक्का बसला. नागपूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार ना. गो. गाणार आणि अमरावतीत माजी मंत्री डॉ.रणजित पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसने उभे केलेले नागपूरमधील नवखे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला, तर अमरावतीत काँग्रेसच्याच नवखे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी विजय खेचून आणला. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विक्रम काळे विजयी झाले. याठिकाणी काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील यांचे समर्थक किरण पाटील यांना भाजपने मैदानात उतरवले होते, पण त्यांचा पराभव झाला.

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीने राज्यातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. काँग्रेसने आमदार सुधीर तांबे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती, पण सुधीर तांबे यांनी स्वतः उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवलं होतं. तेव्हापासून काँग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला होता. निकाल लागेपर्यंत बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबेंनी मौन धारण केलं होतं, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह इतर नेते तांबे, थोरात यांच्यावर आरोप करत होते. काँग्रेसमध्ये दुही निर्माण करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले होते. भाजपच्याच मदतीने तांबे विजयी झाले. रविवारी तांबे आणि थोरात यांनी आपली बाजू मांडली. काँग्रेसचे नेते करत असलेल्या कोंडीमुळे दोघांचीही अस्वस्थता लपून राहिली नाही. बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकत नाही, असा निर्वाणीचा इशाराच दिला आहे. सत्यजित तांबे अपक्षच राहणार असं सांगत असले तरी देवेंद्र फडणवीस मोठे भाऊ असून त्यांची भेट घेऊ असे सांगायला विसरले नाहीत. फडणवीसांनाही भेटीच्या वृत्ताला दुजोराच दिला आहे.

- Advertisement -

मामा बाळासाहेब थोरात आणि भाचे सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीच्या राजकारणातील एक साम्य नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आलं आहे. बाळासाहेब थोरात यांना 1985 साली काँग्रेसने संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती. तेव्हा थोरात यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय खेचून आणला होता. त्याचीच पुनरावृत्ती सत्यजित तांबेंच्या रूपाने झाली आहे, पण बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस सोडली नाही. आता तांबे नेमका काय निर्णय घेतात यावर थोरातांचीही राजकीय भूमिका स्पष्ट होईल. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला दणका देण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न सत्यजित तांबेंच्या रूपाने सफल झाला असला तरी महाविकास आघाडीने नागपूर, अमरावती, औरंगाबादच्या जागा जिंकत भाजपला धक्का दिला आहे. आता कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला अंतर्गत नाराजीचाही फटका बसण्याची शक्यता आहे, कसबा विधानसभेचं तिकीट मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना देणं अपेक्षित होतं, पण भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानं टिळक कुटुंबीय नाराज झाले आहेत. तशी उघड नाराजी टिळक कुटुंबीयांकडून व्यक्तही झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप कुटुंबातच उमेदवारीवरून वाद आहेत.

भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जगताप कुटुंबीयातील नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान भाजपपुढे असणार आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा सुरू झालेला अंक कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपर्यंत पोहचला आहे. यावेळी भाजपमध्येच सत्तासंघर्ष उफाळून आला आहे. या दोन्ही पोटनिवडणुका परंपरेनुसार बिनविरोध व्हाव्यात असा भाजपचा आटापिटा सुरू झाला आहे, पण गेल्यावर्षी अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आग्रही असलेल्या महाविकास आघाडीला भाजपने घाम फोडला होता. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना निवडणूक लढवता येऊ नये यासाठी मुंबई महापालिकेचा पुरेपुर वापर केला गेला. त्यासाठी शिवसेनेला हायकोर्टात दाद मागावी लागली. कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे ऋतुजा लटके यांना निवडणूक लढवता आली, पण त्यातही भाजपने केलेल्या कुरघोडीमुळे निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. हा अनुभव गाठीशी असल्याने महाविकास आघाडीने कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी अद्याप तरी अनुकूल प्रतिसाद दिलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -