घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी । तेवीं मी चराचरीं । माताही होय ॥
अर्धनारी नटेश्वर स्वरूपात ज्याप्रमाणे पुरुष तोच स्त्री व स्त्री तोच पुरुष असतो, त्याप्रमाणे स्थावरजंगमाची माताही मी.
आणि जाहाले जग जेथ राहे । जेणें जीवित वाढत आहे । तें मी वांचूनि नोहे । आन निरुतें ॥
आणि उत्पन्न झालेले जग ज्या ठिकाणी राहते व ज्या योगाने प्राणिमात्राचे रक्षण होते, ते निःसंशय माझ्याशिवाय दुसरे कोणी नाही.
इयें प्रकृतिपुरुषें दोन्हीं । उपजलीं जयाचिया अमनमनीं । तो पितामह त्रिभुवनीं । विश्वाचा मी ॥
प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या अंतःकरणोपाधिरहित स्वरूपात म्हणजे निर्गुणस्वरूपात उत्पन्न होतात, तो या त्रिभुवनात विश्वाचा आजा मीच.
आणि आघवेया जाणणेयाचिया वाटा । जया गांवा येती गा सुभटा । वेदांचिया चोहटां । वेद्य जें म्हणिजे ॥
अर्जुना, सर्व ज्ञानाच्या वाटा ज्या गावात येऊन मिळतात व चारी वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य असे म्हणतात.
जेथ नानामतां बुझावणी जाहली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटलीं । चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं । जें पवित्र म्हणिजे ॥
ज्या ठिकाणी पुष्कळ प्रकारची मते ऐक्यतेस आली. शास्त्रांची एकमेकांशी ओळख झाली व चुकलेली ज्ञाने जेथे एकत्र मिळाली, असे जे स्थान त्याला पवित्र असे म्हणतात.
पैं ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनीनादाकारु । तयाचें गा भुवन जो ॐकारु । तोही मी गा ॥
हे पाहा, ब्रह्मबीजाला परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या चार वाचा हेच अंकुर फुटल्यावर त्यांचे मंदिर जो ॐकार तोही मीच होय.
जया ॐकाराचिये कुशीं । अक्षरें होतीं अउमकारेंसीं । जियें उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं ॥
ज्या ॐकाराच्या पोटी अ, उ व म् (अकार, उकार व मकार) अशी अक्षरे उत्पन्न होतात व जी उपजल्याबरोबर तीन वेद उत्पन्न झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -