घरसंपादकीयअग्रलेखकोंडीत सापडलेली काँग्रेस!

कोंडीत सापडलेली काँग्रेस!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा भाजपला बहुमताची सत्ता मिळवून दिल्यानंतर काँग्रेसच्या पाडावाला सुरुवात झाली. २०१४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेस जिंकणार आणि पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीएचे सरकार केंद्रात येणार, असा ठाम विश्वास काँग्रेसश्रेष्ठींना वाटत होता, कारण विरोधात असलेल्या भाजपकडे राष्ट्रीय पातळीवर कुणी प्रभावी नेता नव्हता. अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविण्यात आली होती, पण दोन्ही वेळा भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे पुन्हा आम्हीच येणार, असे काँग्रेसला वाटत होते. पुन्हा मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवायची, असा काँग्रेसचा इरादा असला तरी पंतप्रधान मात्र राहुल गांधी यांना बनवायचे होते. पण पुढे परिस्थिती बदलली. त्यावेळी गुजरातचे विकास पुरुष झालेले नरेंद्र मोदी यांना भाजपच्या प्रादेशिक पातळीवरील नेत्यांकडून समर्थन मिळू लागले, त्याला सुरुवातीला भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचा विरोध होता, पण तुमच्यामध्ये ताकद नाही, तर मग ज्यांच्याकडे ती आहे, त्यांना संधी द्या, असा दबाव वाढू लागल्यामुळे नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय पातळीवरील वाट मोकळी झाली. त्या संधीचे मोदींनी सोने केले. काँग्रेस म्हणजेच भ्रष्टाचार असे समीकरण रचून काँग्रेसमुक्त भारताचा जोरदार प्रचार मोदींनी केला. त्यावेळी त्यांना त्यांच्या पक्षातील राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ नेत्यांची साथ मिळाली नाही. पण तरीही मोदींनी एकहाती सगळी जबाबदारी स्वीकारून भाजपला केंद्रात पहिल्यांदाच बहुमत मिळवून दिले. त्याच वेळी दुसर्‍या बाजूला त्यापूर्वी दहा वर्षे युपीएचे नेतृत्व करणार्‍या काँग्रेसची मात्र पुरती वाताहात झाली. कारण इतकी वर्षे सत्तेत असणार्‍या पक्षाला विरोधी बाकांवर बसण्यासाठी जेवढ्या जागा लागतात, तितक्याही जागा २०१४ अणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकता आल्या नव्हत्या. त्यामुळे आपले पुढे काय होणार यावरून काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

काँग्रेसने देशाला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त केले हे मान्य असले तरी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष गांधी घराण्याचा गुलाम झाला हे वास्तव आहे. आज गांधी नसेल तर काँग्रेस पक्ष उभाच राहू शकत नाही, कार्यकर्त्यांनाही तशीच सवय लागलेली आहे. कारण काँग्रेसच्या प्रमुखपदी कुणी गांधी नसेल तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरच चढत नाही. सध्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आहेत, पण त्यांचा पक्षावर कितीसा प्रभाव जाणवतो, हे सगळ्यांना दिसत आहे. गांधी मंडळींनी अन्य काही आडनावांच्या लोकांना संधी दिली, पण पक्षाची मालकी आपल्या हातात ठेवली. काँग्रेस नेते लोकशाहीचा कितीही उद्घोष करीत असले तरी तो पक्ष गांधींच्या दावणीला बांधलेला आहे. त्याचे मालकी हक्क गांधींकडेच आहेत. तीच त्या पक्षाची मर्यादा आहे. गांधींनी काही बिगरगांधींना संधी दिली, पण ते त्यांचे आदेश मानणारे होते. ज्यांनी त्यांचे आदेश मानण्यास नकार दिला किंवा आव्हान दिले त्यांना कसे बाजूला करण्यात आले ते त्यांनाच कळले नाही. मध्यंतरी अशी परिस्थिती होती की, काँग्रेसला कुणी अध्यक्षच नव्हता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाल्यामुळे नाराज झालेल्या राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडून दिले. अनेक काँग्रेस नेत्यांनी लाख विनंत्या करूनही राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारायला तयार नव्हते. पक्षात अन्य तरुण नेते होते, पण त्यांना काँग्रेसश्रेष्ठी संधी द्यायला तयार नव्हते, कारण ते राहुल गांधी यांना स्पर्धक होऊ शकले असते. त्यामुळे त्यांना दूर ठेवण्यात आले. पक्षाचे अध्यक्षपद रिकामे ठेवण्यात आले. त्यावेळी काँग्रेसच्या वीस ज्येष्ठ सदस्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्षपद इतका दीर्घ काळ रिकामे ठेवणे योग्य नाही, असे कळवले होते, पण सोनिया गांधी यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. सोनिया यांना राहुल गांधी यांनाच पुढे आणायचे आहे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असला तरी त्यामुळे पक्षाचे नुकसान झाले.

- Advertisement -

प्रियांका गांधी यांना काँग्रेसने पुढे आणावे, असे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते वसंत साठे यांनी पहिल्यांदा सांगितले होते, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुढे ज्यांनी प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ, अशी भूमिका घेतली त्यांना पद्धतशीर गप्प बसवण्यात आले. काँग्रेसने जर प्रियांका गांधी यांना पुढे आणले असते तर आज जी काँग्रेसची अवस्था झाली आहे, तशी झाली नसती. त्यात पुन्हा आपली सध्या परिस्थिती ठिक नाही, आपण इतर पक्षांशी जमवून जुळवून घ्यायला हवे, अशीही काँग्रेस नेतृत्वाची मानसिकता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाडाव करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक झाले पाहिजे, असे राहुल गांधी विरोधकांना आवाहन करतात. त्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली, पण काँग्रेसलाही त्यागाची तयारी ठेवावी लागेल. काँग्रेस आज त्यासाठी तयार नाही, त्यामुळे इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाच्या लोकसभेच्या जागा घोषित करून टाकल्या, इतकेच काय महाराष्ट्रात इंडिया आघाडीच्या जाागांचा तिढा सुटलेला नाही. राहुल गांधी मोदींना हटवण्यासाठी शंख फुकत आहेत, पण त्यांना हटवा आणि मला तिथे बसवा, या त्यांच्या भूमिकेला इंडिया आघाडीतील पक्ष प्रतिसाद देताना दिसत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -