घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हार निळयाचाचि दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्नें म्हणोनि गारा । वेंचि जेवीं ॥
नीळमण्याचा दोन सराचा हार समजून जर कवड्या सर्पाला हाती धरले किंवा रत्न समजून गारा वेचून घेतल्या.
अथवा निधान हें प्रगटलें । म्हणौनि खदिरांगार खोळे भरिले । कां साउली नेणतां घातलें । कुहा सिंहें ॥
अथवा द्रव्याच्या ठेवा जमिनीतून वर येऊन उजेड पडला आहे, असे समजून खैराचे निखारे पदरात घेतले, अथवा आपलीच पडछाया पाण्यात पडली आहे, हे न समजल्यामुळे सिंह विहिरीत उडी टाकून ज्याप्रमाणे प्राणास मुकतो.
तेवीं मी म्हणौनि प्रपंचीं । जिहीं बुडी दिधली कृतनिश्चियाची । तिहीं चंद्रासाठीं जेविं जळींची । प्रतिभा धरिली ॥
त्याप्रमाणे प्रपंचात मी साकार दिसतो, तसाच आहेत. अशा कृतनिश्वयाने जे वागतात ते चंद्राच्या ऐवजी त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब धरण्याकरिता प्रयत्न करणार्‍याप्रमाणे फसतात.
तैसा कृतनिश्चयो वायां गेला । जैसा कोण्ही एकु कांजी प्याला । मग परिणाम पाहों लागला । अमृताचा ॥
त्याचप्रमाणे, संसारात मी आहे, असा जो त्यांचा कृतनिश्चय तो वाया जातो. जसा कोणी एखादा कांजी पिऊन अमृतापासून होणार्‍या सुखाचा लाभ इच्छितो.
तैसें स्थूलाकारीं नाशिवंतें । भरंवसा बांधोनि चित्तें । पाहती मज अविनाशातें । तरी कैंचा दिसे ? ॥
त्याप्रमाणे अंत:करणापूर्वक भरवशाने नाशवंत अशा स्थूलाकारालाच अविनाशी अशा बुद्धीने मला पाहतात, तर मी त्यांना कसा दिसेन?
अगा काई पश्चिमसमुद्राचिया तटा । निघिजत आहे पूर्विलिया वाटा। कां कोंडा कांडतां सुभटा। कणु आतुडे ? ॥
हे पाहा, कोणी पश्चिमसमुद्राच्या तटाला जाण्याच्या हेतूने पूर्व दिशेच्या समुद्राच्या वाटेला जाऊ लागला, तर त्याला पश्चिम समुद्र प्राप्त होईल कां ? किंवा हे महावीरा, कोंडा काडू लागले असता त्यात धान्य प्राप्त होईल का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -