घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जेथ आशेचिये लाळे । आंतु हिंसा जीभ लोळे । तेवींचि असंतोषाचे चाकळे । अखंड चघळी ॥
जी राक्षसी प्रकृती आशारूप लाळेत हिंसारूप जीभ लोळवून असंतोषरूप मांसाचे गोळे निरंतर चघळते.
जे अनर्थाचे कानवेरी । आवाळुवें चाटीत निघे बाहेरी । जे प्रमादपर्वतींची दरी । सदाचि मातली ॥
जी अनर्थरूप कानापर्यंत ओठ चावीत बाहेर निघते, जो प्रमादरूपी म्हणजे भूलरूपी पर्वताची मोठी माजलेली दरी आहे.
जेथ द्वेषाचिया दाढा । खसखसां ज्ञानाचा करिती रगडा । जे अगस्ती गवसणी मूढां । स्थूलबुद्धी ॥
जिच्या द्वेषरूप दाढा खसखसा चावून ज्ञानाचा चुराडा करतात व जी अगस्ती ऋषीला असलेल्या कुंभाच्या आवरणाप्रमाणे स्थूलबुद्धि लोकांना आसुरी मायेची गवसणी आहे.
ऐसें आसुरिये प्रकृतीचे तोंडीं । जाले गा भूतोंडीं । ते बुडोनि गेले कुंडीं । व्यामोहाच्या ॥
अशा प्रकारच्या त्या राक्षसी प्रकृतीच्या तोंडात जे बळी होऊन पडतात, ते भ्रांतिरूप कुंडात बुडून जातात.
एवं तमाचिये पडिले गर्तें । न पविजतीचि विचाराचेनि हातें । हें असो ते गेले जेथें । ते शुद्धीचि नाहीं ॥
याप्रमाणे ते तमोगुणांच्या खळग्यात पडले, ते विचाराच्या हाताला लागत नाहीत. हे असो. ते अशा ठिकाणाला गेले की जेथे त्यांचा पत्ताच लागत नाही.
म्हणौनि असोतु इयें वायाणीं । कायशीं मूर्खांचीं बोलणीं । वायां वाढवितां वाणी । शिणेल हन ॥
म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे. मूर्ख लोकांची कथा कशाला? तिच्या विस्ताराने वाचेला व्यर्थ शीण मात्र होणार आहे.
ऐसें बोलिलें देवें । तेथ जी जी म्हणितलें पांडवें । आइकें जेथ वाचा विसवे । ते साधुकथा ॥
श्रीकृष्ण असे म्हणाले, त्याप्रसंगी अर्जुन म्हणाला होय महाराज. (तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले) ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते ती साधुकथा ऐक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -