वाणी ज्ञानेश्वरांची

तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ॥
त्याप्रमाणे विचाराअंती मनातील विषय सहजच नाहीसे होतात आणि मग ज्ञानी पुरुषाला विचार करण्यासाठी फक्त तत्त्व अर्थात ब्रह्मच उरते.
म्हणौनि अनित्याच्या ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं । निष्कर्षु दोहींही । देखिला असे ॥
म्हणून, अनित्याचे ठिकाणी त्यांचा सत्य भाव नसतो; कारण नित्य आणि अनित्य या दोहोंचाही निर्णय त्यांस अवगत असतो.
देखैं सारासार विचारितां। भ्रांति ते पाहीं असारता । तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥
तू सारासार विचार करून त्यातील असारता हा भ्रम आहे, असे पाहा व सार हे स्वभावतः नित्य आहे असे समज.
हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु । तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाहीं ॥
हा त्रैलोक्याचा आकार ज्याचा विस्तार आहे, त्याच्या ठिकाणी नाम, रंग, रूप ही लक्षणे नाहीत.
जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु । तया केलियाही घातु । कदा नोहे ॥
तो सदैव सर्वव्यापक असून जन्ममरणातीत आहे; त्याचा जरी नाश करू म्हटले तरी तो कधीसुद्धा होणार नाही.
आणि शरीरजात आघवें । हें नाशिवंत स्वभावें । म्हणौनि तुवां झुंजावें । पंडुकुमरा ॥
आणि अर्जुना, शरीरमात्र स्वभावत:च नाशिवंत आहे, याकरिता तू युद्ध कर.
तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि शरीरातें । मी मारिता हे मरते । म्हणतु आहासी ॥
तू देहाचा अभिमान धरून व शरीरावर दृष्टी ठेवून मी मारणारा आणि हे कौरव मरणारे असे म्हणत आहेस;
तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥
पण, अर्जुना, त्यांतील तत्त्वार्थ तुला कळत नाही. जर योग्य विचार करशील, तर तू मारणार नाहीस व ते मरणारेही नाहीत.