घरमनोरंजनमराठी कलाकारांचं बाप्पाशी आहे खास नातं!

मराठी कलाकारांचं बाप्पाशी आहे खास नातं!

Subscribe

मुंबईत घर घेतल्यापासून मी गणपती बसवायला सुरुवात केली. यंदाचं हे चौथं वर्षं आहे. आई शाडूच्या मातीची मूर्ती चिंचवडच्या घरी बनवते आणि त्याची स्थापना कांदिवलीच्या घरात होते. त्यामुळे चिंचवड आणि मुंबईतील दोन्ही घरांशी बाप्पा जोडला गेला आहे. माझ्या घरी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीनं साजरा केला जातो. सजावटसुद्धा पर्यावरणपूरक, पुनर्वापर करता येईल, अशीच असते, गणपती बाप्पाला आपण मूर्तीच्या रूपात आणतो, परंतु खऱ्या अर्थांने बाप्पा या दिवसांत आपल्या घरी येतो, तो पाहुण्यांच्या रूपात. खूपच वेगळं वातावरण असतं घरी.  आमच्याकडे विसर्जन सुद्धा पर्यावरणपूरक पद्धतीनेच केले जाते. माझ्या घरात असलेल्या मोकळ्या भागात आम्ही बादलीत विसर्जन करतो.

– भूषण प्रधान

- Advertisement -

गणपती हे माझे आवडते दैवत असल्याने गणेश चतुर्थी माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या स्वतःच्या घरी मी अजून गणपती आणण्याची प्रथा सुरु केली नसल्याने मी अजूनही आईकडेच गणेशोत्सव साजरा करते. आमच्याकडची मूर्ती इको फ्रेंडली असते. सध्या ‘टी ट्री गणेशा’ मिळतो, ज्यात गणेशाची मातीची मूर्ती कुंडीत असते. विसर्जनाच्या वेळी फक्त पाणी टाकून ती माती सारख्या पातळीवर आणायची. त्यात एक बी असते. त्याचे नंतर झाड येते. मला ही संकल्पना खूप आवडली. त्यामुळे आमच्याकडे गणेशाची अशा पद्धतीची मूर्ती आणली जाते. सजावटही अगदी साधी असते. ज्यात थर्माकॉल, प्लॅस्टिकचा वापर अजिबात नसतो. नैवैद्यासाठी बाहेरून गोड पदार्थ आणण्यापेक्षा घरी गोडधोड पदार्थ बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि यात घरातील प्रत्येकाचा सहभाग असतो. या काळात एकंदरच घर आणि मन दोन्ही सकारात्मकतेने भरलेले असते. लहानपणापासूनच मला बाप्पाबद्दल विशेष ओढ आहे. कधीकधी अडचणीच्या काळात आपण डोळे बंद करून देवाची आठवण काढतो, तेव्हा सगळ्यात आधी माझ्यासमोर गणपतीचा चेहरा येतो.

- Advertisement -

– मयूरी देशमुख, अभिनेत्री

गणपती बाप्पा आणि माझं नातं स्पेशल आहे. मी मूळचा नाशिकचा असल्यामुळे नाशिकमध्ये नवश्या गणपती म्हणून गणपतीचं मंदिर आहे. नाशिकमध्ये असताना मी नेहमी तिथे जायचो. आता जेव्हा कधी मी नाशिकला जातो, तेव्हा मी आधी त्या मंदिरात जातो,  त्यामुळे आमचं नातं स्पेशल आहे, असं मी म्हणेन. बाप्पाच्या सगळ्याच मूर्ती मनाला भावतात. आमच्याकडे दोन गणपती बसवले जातात. एक माझ्या घरात आणि दुसरा माझ्या हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमधील गणपती दहा दिवसांचा असतो परंतु माझ्या घरातील गणपती हा वर्षभर असतो. त्याची वर्षभर पूजा होते. म्हणजेच मागच्या वर्षी आणलेला बाप्पा आम्ही या वर्षी विसर्जित करतो आणि या वर्षी आणलेला गणपती आम्ही पुढच्या वर्षी विसर्जित करणार.

 

– सुयोग गोऱ्हे, अभिनेता

माझ्या आयुष्यात बाप्पाचं स्थान हे सगळ्यात उच्च आहे. बाप्पा आणि माझ्या नात्याबाबत सांगायचे, तर त्या मागे एक कारण आहे. मी आठवीत असताना माझे आजोबा वारले  होते. तोपर्यंत मी तशी नास्तिक होते. माझा या गोष्टींवर फारसा विश्वासच नव्हता. मात्र आजोबा गेल्यानंतर मला काही गोष्टी आपसूकच जाणवू लागल्या आणि अचानक माझ्यात गणपती बाप्पाबद्दल ओढ निर्माण झाली. इतकी, की मी अक्षरशः गप्पा मारायचे बाप्पासोबत. त्यामुळे आई-बाबासुद्धा चकित झाले होते. आतापर्यंत देवाला न मानणारी मी, अचानक देवाविषयी इतकी भक्ती कशी निर्माण झाली माझ्यात? हे कसं झालं हे मला सुद्धा माहित नाही. परंतु बाप्पा आणि माझ्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे. सगळ्यांनाच गणपती खूप जवळचा वाटतो. माझ्यासाठी गणपती बाप्पा म्हणजे सकारात्मक ऊर्जा देणारा एक स्रोत आहे.

– सायली संजीव, अभिनेत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -