Ratris Khel Chale 3: …म्हणून सोडली रात्रीस खेळ चाले ३ मालिका, अपूर्वाने पोस्ट करत दिले स्पष्टीकरण

वरिष्ठांनी कारवाई केल्यानंतरही संबंधित काही नवख्या कलाकारांनी साधी दिलगीरी सुद्धा व्यक्त केली नाही

actress Apoorva nemlekar exit from ratris khel chale 3 serial due to payments dues and offensive behaviour from new artits
Ratris Khel Chale 3: ...म्हणून सोडली रात्रीस खेळ चाले ३ मालिका, अपूर्वाने पोस्ट करत दिले स्पष्टीकरण

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रात्रीस खेळ चाले ३ (Ratris Khel Chale 3)  मालिकेतील शेवंताने (Shevanta) प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र अचानक शेवंताने म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) मालिकेतून एक्झिट घेतली आणि प्रेक्षकांना धक्काच बसला. शेवंता हे पात्र एका उंचीवर घेऊन गेल्या नंतर अपूर्वाने मालिका का सोडली असा प्रश्न सर्वांनाच पडला. मात्र आता मालिकेतील शेवंता का बदलली याचं कारण समोर आले आहे. शेवंता या व्यक्तिरेखेसाठी अपूर्वाने तिचे १० किलो वजन वाढवले होते. तिच्या वाढलेल्या वजनावरुन सोशल मीडियावर तिला अनेक निगेटिव्ह कमेंट्स येत होत्या. त्या कमेंट्स ती फेस करत होती. मात्र मालिकेच्या सेटवर देखील काही नवख्या आणि ज्येष्ठ कलाकारांकडून तिची खिल्ली उडवण्यात आली आणि त्यामुळेच अपूर्वाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचे तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

टरात्रीस खेळ चाले ३ मालिकेच्या सेटवर काम करताना नवख्या कलाकारापासून ते ज्येष्ठ कलाकारांनी माझ्या वाढलेल्या वजनावर माझे विडंबण करत माझी खिल्ली उडवली. वरिष्ठांनी त्यावर कारवाई केली तरी देखील नव्या कलाकारांनी साथी दिलगिरी देखील व्यक्त केली नाही. माझी उघडपणे खिल्ली उडवली गेली. काही कमेंट्स मला जिव्हारी लागतील अशा जाणीवपूर्वक वारंवार केला गेल्याचा आरोप अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये केला आहे. वरिष्ठांनी कारवाई केल्यानंतरही संबंधित काही नवख्या कलाकारांनी साधी दिलगीरी सुद्धा व्यक्त केली नाही’, असे अपूर्वाने म्हटले आहे.

शेवंता या व्यक्तिरेखेतून बाहेर पडावे लागले हे दुर्देवी असून मालिका सोडण्याचा माझा निर्णय सर्वस्वी वैयक्तिक असूनआणखी काही नवी रोल्स मी करत राहीन,असे अपूर्वाने म्हटले आहे.

मालिकेमुळे माझे आर्थिक नुकसान झाल्याचे म्हणत अपूर्वाने प्रोडक्शन हाऊसवर देखील गंभीर आरोप केले आहेत. अपूर्वाने म्हटले आहे की, ‘रात्रीस खेळ चाले ३ मालिकेचे शुटींग सावंतवाडीत चालू होते. मी मुंबईहून १२ तासांचा ट्रेनचा प्रवास करुन जात होते. मला शुटींगसाठी बोलावून फक्त एक दिवस शूट करुन ३-४ दिवस काहीच शूट केलं जात नव्हतं. महिन्यातून ६-७ दिवसच काम लागत होत त्यासाठी मला वारंवार प्रवास करावा लागत होता त्यात माझा अमूल्य वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात होता’ असे अपूर्वाने म्हटले आहे.

‘प्रोडक्शनकडून मालिकेच्या तिसऱ्या सीजनसाठी आम्हाला तुमचे ५-६ दिवसच लागणार असल्याचे सांगितल्यावर मी नकार दिल्यावर चॅनेलकडून मला आणखी एक शो देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र ५-६ महिने झाले अद्याप ते आश्वासन पाळलं गेल नाही त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत’ असल्याचे अपूर्वाने म्हटले आहे.

या आधी देखील अपूर्वाने झी युवा वाहिनीवरील तुझं माझं जमतयं ही मालिका सोडली होती. त्यानंतर देखील अनेक चर्चा झाल्या होत्या. त्याविषयीचे स्पष्टीकरण देखील अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये दिले आहे. तिने म्हटले आहे की, ‘असाच प्रकार तुझ माझं जमतयं मालिकेच्या वेळी झाला. मालिकेचा शेवटचा चेक मिलाला नाही म्हणून चॅनेलकडून एकही पैसा बुडणार नाही असे आश्वासन दिलं गेलं अद्याप तो चेक मिळाला नाही’.

‘मी प्रमाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केले परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळत नसेल नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल अशा ठिकाणी काम करणे माझ्या तत्त्वात बसत नाही त्यामुळे मी या शोमध्ये न राहण्याचा निर्णय घेतल्याचे’ अपूर्वाने स्पष्ट केले आहे.

रात्रीस खेळ चाले ३ मालिकेत आता नव्या शेवंताची एंट्री होणार आहे. अभिनेत्री ‘कृत्रिका तुळसकर’ शेवंताची भूमिका साकारणार आहे. मालिकेतील नवी शेवंता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – Ratris Khel Chale 3 : ‘रात्रीस खेळ चाले 3’मध्ये नव्या शेवंताची एंट्री