Video: नेहा खानने सिद्धार्थ जाधवला नाचवले आपल्या तालावर!

अद्वैत दादरकरच्या खुमासदार सूत्रसंचालनामुळे रंगणारी ‘युवा डान्सिंग क्वीन’ ही स्पर्धा सध्या ‘झी युवा’ वाहिनीवर सुरू आहे. १४ ललनांचा सहभाग असलेली ही स्पर्धा आता खूपच लोकप्रिय ठरू लागलेली आहे. सगळेच स्पर्धक आपला अत्यंत जबरदस्त परफॉर्मन्स देत असल्यामुळे, परीक्षक सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांना परीक्षण करणे सुद्धा अवघड जात आहे. एनर्जीने पुरेपूर भरलेल्या सिद्धार्थ जाधव याची या मंचावरील उपस्थिती, ही या आठवड्यातील खासियत ठरली आहे.
नेहा खान हिने आपल्या दिलखेचक अदांनी या स्पर्धेत आपली निराळी छाप पाडलेली आहे.

तिच्या नृत्याचा जलवा पाहून प्रेक्षक आणि परीक्षक खूपच खुश आहेत. स्पर्धेतील एक महत्त्वाची स्पर्धक म्हणून तिने आपला ठसा उमटवला आहे. या आठवड्यातील भागात, ‘धुरळा’ या सिनेमातील कलाकार ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर उपस्थित होते. ‘पिया तू अब तो आजा’ या गाण्यावर नेहा खान हिने केलेला कॅब्रे डान्स सर्वांनाच खूप आवडला. या अप्रतिम नृत्याचा सिद्धार्थवर इतका प्रभाव पडला, की त्यानेही नेहासोबत नाचण्याची संधी सोडली नाही. ‘शिकारी’ या सिनेमात सहकलाकार म्हणून या दोघांनी काम केले होते. ही जोडी ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर पाहायला मिळाली. तसाच जल्लोष या मंचावर सुद्धा पाहायला मिळाला.